प्रकरण दहावे
रात्रीचं जेवण उरकून हात तोंड धुवून राम त्याच्या खोलीत गेला. दिवसभराच्या प्रवासामुळे त्याचे संपूर्ण अंग दुखत होते. त्याला झोपायची इच्छा तर होती पण का कोण जाणे त्याचा डोळा लागत नव्हता. तो रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर अस्वस्थपणे आडवा झाला होता.
“यल्लू आईच्या नावानं चांगभलं....!”
सकाळच्या पहिल्या प्रहरी त्याच्या कानावर नेमीनाथ बाबांचा ओळखीचा आवाज पडला. तो पलंगावरून उठून धावत धावत दिंडी दरवाजापाशी पोहचला. नेमीनाथ बाबा दरवाजात उभे राहून मंद स्मित करीत होते. पहिल्या दृष्टिक्षेपातच रामने ते मोठे सिद्ध पुरुष आहेत हे ओळखले. त्यांनी वयाची शंभरी गाठली होती तरी त्यांचे शरीर धष्टपुष्ट होते. गोरापान वर्ण होता, डोक्यावर जटासंभार, लांब पांढरी दाढी, भव्य दिव्य कपाळ त्यावर भंडाऱ्याचा मळवट आणि मधोमध लाल भडक गोल कुंकू! साधनेने प्राप्त त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसून येत होते गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या आणि अंगावर एक हुर्मुजी वस्त्र परिधान केले होते एकूणच बाबा नेमीनाथ एक अद्भुत आणि अध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते.
तो हात जोडून त्यांच्यापाशी गेला आणि त्यांच्या पायावर त्याने डोके ठेवले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते पुन्हा उलट पावली चालू लागले. त्या दोघांमध्ये कोणताही शाब्दिक संवाद झाला नाही परंतु आज्ञाधारक शिष्याप्रमाणे राम देखील त्यांच्या मागे मागे चालू लागला.
साधारण अर्धा मैल अंतर चालून गेल्यावर ते हरिद्रेच्या तटावर थांबले जेथे त्यांची पर्णकुटी होती. पर्णकुटीच्या बाजूला केळी, कदंब यांची गर्द झाडी होती. समोरच एक बगीचा होता ज्यात कृष्ण, चुडा, केतकी, कुंद, जपाकुसुम अशी फुले फुलली होती. वातावरण अगदी शांत आणि सुगंधी होतं. फक्त हरिद्रेच्या वाहत्या पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता. बाबांच्या पाठोपाठ रामने त्या कुटीत प्रवेश केला. तिळाच्या तेलाचा दगडी दिवा अहोरात्र प्रज्वलित केला होता. तिकडे प्रवेश करताच रामच्या आत्म्याला एक अनिर्वचनीय शांतता लाभली.
बाबा त्यांच्या मृगजिनावर पद्मासनात बसले आणि राम त्यांच्या समोर उभा राहिला.
“ उल्लालच्या जमीनदारांची कथा भलीमोठी आहे....”
अंतर्यामी असलेल्या बाबा नेमीनाथ यांना रामचे उल्लाल मध्ये येण्याचे प्रयोजन न समजले असते तर नवलच म्हणायला हवं होतं.
क्रमश: