Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण चौदावे

व्यंकटअप्पय्या सरकारांनी इंग्रज अधिकाऱ्यांचा खूप अपमान केला होता. त्यामुळे कमिशनर चवताळला होता. ब्रिटीश सरकारने त्यांना बरेच अधिकार दिलेले होते ते अधिकार हिरावून कसे घेता येतील याची कमिशनर जुळवाजुळव करत होता.

कोणत्याही क्षणी ऑर्डर येऊ शकली असती त्यामुळे मोठे सरकार चिंताग्रस्त होते. त्या दिवशी दरबाराचे कामकाज सकाळपासून सुरु होते. बरीच गर्दी झाली होती. मोठे सरकार बसलेले होते.
      
“नमामि शंकर शिव हर शंकर..शिव शंकर शंभो....हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो....!”

अशी आरोळी ठोकत हुर्मुजी वस्त्रे परिधान केलेला एक संन्यासी हातात कमंडलू घेऊन आला. त्याचा जटासंभार बराच जड होता. वाड्याच्या आवारात प्रवेश करताच तो एका जागी स्थिर उभा राहिला. आपल्या झोळीतून त्याने पंचमुखी शंख बाहेर काढला आणि फुंकला. त्या शंखाच्या गंभीर ध्वनीने दरबार आणि संपूर्ण वाडा दुमदुमला. सर्वजण धावत धावत बाहेर आले. मोठे सरकार देखील दरबारातून बाहेर आले होते.

तो चंडिका मंडपासमोर उभा राहून एकसारखा शंखनाद करीत होता. त्याच्या मुखमंडलावर एक दिव्य आभा शोभत होती. उंच धिप्पाड शरीर, गोरा वर्ण, जास्वंदीच्या रंगाचे लाल डोळे संन्याशाचे असे भारावून टाकणारे रूप पाहून सर्वजण मंत्रमुग्ध होऊन उभे राहिले. काहींनी चंडिका मंडपात जाऊन त्या संन्याशासमोर मातीतच लोटांगण घातले. संन्याशाने आपल्या कमंडलूमधून त्या सर्वांच्या अंगावर पाणी शिंपडले आणि तो म्हणाला

“ओम शांती...ओम शांती...”

मग तो चालत चालत मोठ्या सरकारांच्या समीप गेला.

“ मन शांत ठेवा, धाकट्या भावाचा झालेला अकाली मृत्यू आणि कन्येसमान धाकट्या सुनेवर आलेल्या अकाली वैधव्यामुळे आपले हृद्य दु:ख आणि संताप यांनी भरले आहे याची मला पूर्ण कल्पना आहे”

सरकार त्या संन्याशाकडे आता आशेने पाहू लागले तसं तो पुढे बोलू लागला.

“माझे नाव कलिमलनाथ कापालिक आहे. देवीचा आदेश मिळाल्यामुळे बंग देशातून मी तुमच्या राज्यात आलो आहे. म्लेंछ अधिकाऱ्यांचा आपण अपमान केला आहे ज्यामुळे तुमच्यावर मोठे संकट येणार आहे. तुमच्या चहू बाजूना शत्रू आहेत.”

हे सर्व कलिमलनाथाला कसे समजले याचे मोठ्या सरकारांना आणि जमलेल्या व्यक्तीना आश्चर्य वाटत होते. तो संन्यासी नक्कीच एखादा सिद्धपुरुष आहे याची सर्वांना खात्री पटली. सरकार त्याच्यापुढे नत मस्तक झाले.

“ कृपया आज्ञा करावी. मी आपल्या शब्दाबाहेर नाही.” सरकार      

“मला थोडीशी भूमी दान करा. मी देवी चामुंडेची प्रतिष्ठापना करेन. तुमच्या सर्व शत्रूंचा नाश होईल आणि तुमच्या मनाला शांती लाभेल. ” कलिमलनाथ गंभीरपणे म्हणाला

वाड्याच्या समोरच्या भूखंडावरच चामुंडा देवीचे मंदिर बनवण्याचे निश्चित केले गेले. दीपावलीतील अमावास्येच्या मुहूर्तावर कलिमलनाथाने रात्रभर त्या भूमीवर तांत्रिक क्रिया केली आणि ती जमीन देवीच्या नावावर उत्सर्ग केली.

दुसऱ्याच दिवशी मंदिर निर्माण करण्यास सुरुवात केली गेली. मूर्ती प्रतिष्ठापना करण्याच्या वेळी १०१ बकऱ्यांचा बळी दिला गेला. अकरा दिवस यज्ञ चालू होता. यज्ञाहुतीच्या अखेरच्या दिवशी मंदिराच्या गर्भगृहात देवी चामुंडेची काळ्या पाषाणातील अत्यंत सुबक प्रतिमेची स्थापना केली गेली. नंतर मंदिराच्या दक्षिण दिशेला तलाव निर्माण केला गेला.

मंदिर आणि तलाव यांच्या मधोमध पंचमुंडी आसन आणि काही अंतरावर पंचवटीची स्थापना करण्यात आली. चारही दिशांना फळे आणि फुले यांचे वृक्ष लावले गेले.

नवरात्री अगोदर कलिमलनाथाच्या आज्ञेनुसार मोठ्या सरकारांनी एक मासापर्यंत ब्राम्हण आणि निर्धन व्यक्तींना भोजन देऊ केले. नवरात्रीमध्ये सप्तशतीचे पठन केले. अशाप्रकारे उल्लालच्या चंडिका मंदिराचे निर्माण कार्य पार पडले.   

क्रमश: