Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण तेरावे

हरिद्रेच्या तटाकडे एकटक पाहत बाबा नेमीनाथ काहीवेळ गप्प राहिले आणि पुढे बोलू लागले.

“याच नदीच्या तीरावर छोट्या सरकारांची चिता जाळली होती. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. जेमतेम १५ -१६ वर्ष वय असेल धाकट्या वहिनी सरकारांचे त्यावेळी... लग्न होऊन त्यांच्या मनगटावर बांधलेल्या हळकुंडाचे धागेदेखील सैल झाले नव्हते, हातावर काढलेल्या मेंदीचा रंगही उडाला नव्ह्ता. आपल्याच खोलीच्या सज्जेतून डोळ्यादेखत आपल्या पतीचे प्रेत जळताना पाहून त्या कोवळ्या हृदयाला किती वेदना झाल्या असतील याची कल्पनाच करवत नाही. विधात्याचे विधान इतके क्रूर का बरे अस्रावे?

सात आठ दिवस मोठ्या सरकारांनी अन्नपाणी सोडून दिलं होतं. थोरल्या वहिनी सरकार पुष्पलतादेवी यांनी भरपूर मनधरणी केल्यावर त्यांनी पाणी प्राशन केले.

“ कमीतकमी त्या कवळ्या पोरीचा तरी विचार करा. लग्न काय प्रकार आहे हे कळायच्या आताच वैधव्य वाट्याला आलं तिच्या! बिचारी वैजयंती” पुष्पलतादेवी

“ काय वैधव्य? माझा बंकट....” असं म्हणून अत्यंत कडक शासक असलेले व्यंकटअप्पय्या चूडामणी हेब्बार एखाद्या लहान मुलाप्रमाणे हुंदके देऊन रडू लागले. मग ते काही क्षण थांबले, “ वैजयंती आपल्या कन्येसारखीच आहे. तिच्यावर मी वैधव्य आजीबात लादणार नाहीये.”

“कसं शक्य आहे ते? आपण जमीनदार असलो तरी आपण हिंदू आहोत. सामाजिक बंधनांचे भान आपल्याला ठेवावच लागेल.” पुष्पलतादेवी समजावणीच्या सुरात म्हणाल्या.

“ नाही.. बिलकुल नाही. असला समाज आणि शास्त्र मला आजीबात मान्य नाही. वैजयंती पांढरे कपाळ घेऊन, केशवपन करून, लाल अलवण नेसून संपूर्ण आयुष्य जगणार? इतक्या सुंदर कन्येवर असा अन्याय केला तर पाप पुण्याचा हिशोब होईल तेव्हा तिथे वरती चित्रगुप्ताला काय उत्तर देणार आम्ही? आम्ही हे होऊ देणार नाही.” असे म्हणून  व्यंकटअप्पय्या सरकार त्यांच्या कक्षात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालू लागले. मग त्यांनी हाक मारली

“ देविदाssस...”

“जी सरकार..” देविदास आला आणि समोर उभा राहिला              
 
“ राजपुरोहितांना पाचारण करा...”

“जशी आज्ञा!”

काही वेळातच राजपुरोहित हजर झाले.

“आमची वैजयंतीला सामान्य विधवा स्त्रियांप्रमाणे वागणूक देण्याची इच्छा नाही. यावर एखादा शास्त्रसंमत उपाय सांगावा!” सरकार

“क्षमा सरकार, परंतु असा उपाय......” राजपुरोहित

यावर सरकारांनी राजपुरोहीतांकडे जळजळीत कटाक्ष मात्र टाकला आणि त्यांना जे काही समजायचे होते ते समजले...

“ ....आहे .एक उपाय शास्त्रसंमत आहे. अट एकच त्यांनी आयुष्यभर आपल्या कुलदेवतेची आणि श्रीकृष्णाची उपासना करून जीवन व्यतीत करावे ” राजपुरोहित

सरकारांनी क्षणभर विचार केला. “ हरकत नाही..या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी.”    

योगिनीच्या रुपात वैजयंतीचे सौंदर्य मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे कोमल आणि तेजस्वी दिसत होते. परंतु हळूहळू त्या नवयौवनेला आपले आयुष्य केवळ शून्य आहे याचा पुरेपूर प्रत्यय येऊ लागला. चंदनाचे खोड सहाणेवर उगाळल्याप्रमाणे ती तिचे आयुष्य ध्यान, चिंतन, पूजा अर्चना करण्यात खर्ची घालू लागली.

देवी कुष्माण्डा आणि पंचायतनातील इतर सर्व देवांचे पूजन करण्यात विशेषत: मदनगोपाळ मंदिरात वैजयंती जास्त रमत असे. विधवा प्रथा मोडीत काढली असता निंदा करणारे सर्व ग्रामस्थ अवाक झाले. वैजयंती पतीच्या निधनानंतर देखील पतिव्रता सिद्ध झाली. वर्षभर उपवास, व्रतवैकल्ये आणि अनुष्ठान करू लागली. बागेतून फुले तोडून आणण्यापासून सोवळ्याने नैवेद्य बनवण्यापर्यंत सर्व पवित्र कामं ती स्वत: करू लागली. तुळशीची सहस्त्र कोवळी पाने, पारिजातकाची नाजूक फुले गोळा करून त्यांची सुंदर माळ ती तयार करीत असे आणि त्रिभंगी मुद्रेत उभ्या मदनगोपाळाच्या गळ्यात घालून मुरलीधराकडे एकटक पाहत असे.

क्रमश: