प्रकरण नववे
दुसऱ्या दिवशी पाऊस थांबला होता पण चांगली उघडीक आली नव्हती. पश्चिमेकडून थंडगार वारे वहात होते. वातावरण आल्हाददायक होते. सिद्धरामय्याने ओळखीच्या एकाला सांगून आधीच बैलगाडीची सोय केली होती. सकाळी सकाळी लवकरच दोघे बैलगाडीने उल्लालकडे रवाना झालो. विठ्ठलची शाळा बुडू नये म्हणून तो बरोबर आला नव्हता.
बैलगाडी दिवसभर चालत होती. शचीदेवीने आंबोळ्या आणि चटणी असा डबा बरोबर आणला होता. दुपारी सावल्या पायाखाली पडू लागल्या तेव्हा ते एका ओहोळाजवळ थांबले. गाडीवान बैलांना चारापाणी देई पर्यंत राम आणि शचीने जेवण उरकून घेतलं. शचीने काही आंबोळ्या गाडीवानाला दिल्या. त्याने सोबत भाकरी कालवण आणलं होतं. ते तो जेवला. जेवण झाल्यावर १० मिनिटे आराम करून त्यांनी लगेच पुढचा प्रवास सुरु केला.
एकमेकांशी गप्पा मारत मारत तो खडतर प्रवास कधी पूर्ण झाला हे दोघांच्या लक्षातच आलं नाही. उल्लाल गावाच्या पंचक्रोशीत बैलगाडीने प्रवेश करताच बैल पुढे जायला थोडे त्रास देऊ लागले. माणसांपेक्षा जनावरांना नकारात्मक उर्जा अगोदर जाणवते असं म्हणतात. वातावरण तसं थोडं नकारात्मकच वाटत होतं. हवा पडली होती. आकाशात मळभ आलं होतं. एक प्रकारचं उदासीन वातावरण पसरलं होतं.
“समोर ती मोठ्ठी आमराई दिसत्ये न? त्याच्या थोडं पुढे सुरु होतं उल्लाल.” शचीने समोर बोट दाखवत सांगितलं.
त्या आमराईमध्ये एखाद्या अतृप्त आत्म्याचा वास असावा असं लांबून पाहून रामला वाटलं. त्या आमराईच्या समोरून एक ओहोळ वाहत होता त्यावर फक्त माणसांनी चालत जाऊन पुढे जाता येईल असं एक सुपारीच्या लाकडाचं आणि बांबूच अरुंद साकव बांधलं होतं. त्यावरून बैलगाडी पुढे जाणे शक्य नव्हतं. ते बैलगाडीतून उतरले आणि पायी पुढे निघाले. बैलांना बांधून ठेवण्याची गावात सोय होईल असे शचीने सांगितले. गाडीवानाने बैलगाडीवरून बैलांना मोकळे करून काळजीपूर्वक साकवावरून पलीकडे आणले. बैलगाडी साकवाच्या अलीकडे एका नीरफणसाच्या झाडाजवळ उभी करून ठेवली होती.
काळाच्या विराट पावलांनी पायदळी तुडवलेले उल्लाल गावाची हतश्री कंगाल परंतु विनाकारण गर्विष्ठ वाटत होती. अगदी छोटेसे गाव, जेमतेम ४०-५० घरं असतील. ब्राम्हण आणि सारस्वतांची दूरवर पसरलेली हिरवी शेतं, शेतांच्या बांधांवर नारळी पोफळीची उंच उंच झाडे. गावाच्या तिन्ही बाजूला वेढलेल्या डोंगरांवर ऐन आणि किंजळ यांसारख्या निरुपयोगी मानल्या जाणाऱ्या झाडांची एकमेकांचे हात धरून गावाभोवती फेर धरून उभी असल्यासारखी गर्दी होती. गावात मधोमध अर्धवट बांधून ठेवलेले मातकट, हिरवट पाण्याने तीन पोखर तलाव होते. याच डोंगरातून उगम पावणारी हरिद्रा नदी! पात्र लहानसच परंतु गावाच्या सीमेपासून जराशी दुरून वाट वळवून गेल्यासारखी प्रथम दक्षिण आणि नंतर पुन्हा पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे वहात जात होती.
गावात प्रवेश करतानाचा मावळतीकडे झुकणारा सूर्य आता मावळला होता. अंधुक प्रकाशाचं रुपांतर आता निबिड अंध:कारात झाले होते. शांतता आणखीनच निरव होत गेली. अचानक त्या निरव शांततेला भेदणारी खर्जातील आवाजातील एक आरोळी ऐकू आली.
“यल्लू आईच्या नावानं चांगभलं....!”
“ कोण? कोणाचा आवाज आहे हा” रामने चालता चालता मागे वळून विचारले.
“एक साधू महाराज आहेत. नेमीनाथ ब्रम्हचारी! वयोवृद्ध आहेत. १०० च्या आसपास वय असेल. गेली ७०-८० वर्ष या गावात राहत आहेत. हरिद्रा नदीच्या किनारी लहानशी झोपडी आहे त्यांची. देवीचे भक्त आहेत. दिवसभर आपल्या झोपडीत ध्यान करत बसतात. संध्याकाळ झाली कि भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडतात. असं म्हणतात ते मोठे सिद्ध पुरुष आहेत पण आजपर्यंत त्यांचा चमत्कार कोणीही पहिला नाहीये. पण खूपच सज्जन आहेत. त्यांचा आवाज खूपच कारुण्यपूर्ण आहे. देवीचे सच्चे उपासक आहेत हे मात्र नक्की!”
“समक्ष भेट होईल का?” राम
“ हो. का नाही. नक्कीच आमच्या घरी रोज भिक्षा मागायला येतातच ते. तेव्हा तुमची भेट होईलच.”
शचीदेवीच्या माहेरी फक्त चार लोकं होते. तिची आई, दोन मोठे भाऊ आणि एक लहान बहिण. वडील वारले त्याला बराच काळ लोटला होता. आई साक्षात अन्नपुर्णेचा अवतार होती. साधा स्वभाव, गोड बोलणे आणि उदार वागणूक. शची देवीने आपल्या वाड्यातच एका खोलीत रामची राहायची सोय केली.
क्रमश: