Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण एकोणिसावे

बळीच्या म्हणण्यावर मोठ्या सरकारांना विश्वासच बसत नव्हता.

“ती त्यांच्याकडून आत्म्याच्या मुक्ती विषयी आणि वैधव्यातील कठोर संयमित आचरणावर धर्मोपदेश ऐकत असेल. तिथे अशाच गोष्टी घडत असाव्यात.” मोठे सरकार

“सरकार! तिथे गाणी गायली जातात. बसंत-बहार, ललित आणि विहाग-राग.” बळी

“मग ती धुप आरती, कीर्तन वगैरे करत असावी. संध्याकाळी देवाची प्रार्थना करत असेल. भगवंताचे आवाहन करून ती तिच्या जीवाच्या उद्धाराची कामना करत असावी.”

त्या रात्री मोठे सरकार रात्री झोपू शकले नाही. वैजयंती देवीची विटंबना ही बाब अजिबात विश्वासार्ह वाटत नव्हती. तरुण भिक्षूची वागणूक त्यांच्याशी संपूर्णपणे सभ्य आणि गोड होती. कलिमलनाथ यांचे ते उत्तम शिष्य होते, ते गेली तेरा वर्षे कठोर नियम व संयम पाळत होते त्यामुळे संशयाची बाब अधिकच अविश्वसनीय होती.
शिवाय तरुण संन्यासी शिल्पकार होता. त्याच्या हातात कला होती. फावल्या वेळात तो काळ्या दगडावर छिनी आणि हातोडी सारखी अवजारे वापरून देव-देवतांच्या मूर्ती कोरत असे.

मोठ्या सरकारांचे गुरु कलिमलनाथ यांच्याविषयी वेगळा विचार करणंही पाप होतं. त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता. त्या वेळी त्या महान साधकाच्या मृत्युशय्येजवळ मोठे सरकारही स्वत: येऊन बसले होते.

तेव्हा कलिमलनाथ त्यांच्या कानात म्हणाले

“व्यंकटप्पय्या चुडामणी हेब्बर, माझी जाण्याची वेळ समीप आली आहे. जोपर्यंत पूजेत व्यत्यय येत नाही तोपर्यंत तुमच्या राज्यात चामुंडा देवीचा मान राखला जाईल. मला आशा आहे की माझा परमशिष्य आणि संन्यासी डामरनाथ कापालिक देवीची पूजा करण्यात कोणतीही कसूर करणार नाही.”

अमावास्येच्या भयंकर काळ्या कुट्ट रात्रीच्या गहन निस्तब्धतेचा भंग करणारे गीत ऐकू येत होते. असे वाटत होते जणू काही कीटक, पतंग,पशु पक्षी सगळेच अगदी तल्लीन होऊन एकाग्रचित्ताने ते दैव दुर्लभ संगीत ऐकत होते.

वैजयंती देवी हळू हळू मंदिराच्या पायऱ्या चढून पंचवटीच्या व्यासपीठाजवळ पोहचली. त्या व्यासपिठावर बसलेला डामरनाथ गायन करत होता.त्याचे डोळे बंद होते. जणू काही तो साधनेत तल्लीन झाला होता. देवी वैजयंती त्याच्या पायापाशी येऊन बसली. तिच्या दोन्ही डोळ्यातून ती अश्रू ढाळत होती. तिच्या येण्याने डामरनाथाची तंद्री भंग पावली.

तो भारदस्त आवाजात म्हणाला "जय भवानी! जय शिवशंकर...”

वैजयंतीने त्याच्या पायांना हाताने स्पर्श केला. अचानक त्याला तो मऊ हातांचा स्पर्श जाणवला आणि तो चकित झाला.

"हे काय? वैजयंती देवी, तुम्ही पुन्हा इकडे? मी तुम्हाला अनेकवेळा सांगितले की इथे येऊ नका."

“पण हे गीत आणि स्वर मला वेड लावतात, डामरनाथ. मी स्वतःला थांबवू शकत नाही. तूम्ही गाऊ नका तर मी पण इथे येणार नाही.” तिचे ओठ थरथरत होते आणि डोळे भरून आले होते. ती उठून उभी राहिली.

"कधी? मी कुठे गात होतो? गुरुदेवांनी मला गाण्यास मनाई केली आहे. याबाबत मला ताकीदही देण्यात आली होती.” डामरनाथ

"तुम्हाला माहीत नाही. पंचवटीच्या या आसनावर बसून तुम्ही रोज रात्री मधुर आवाजात गाता आणि त्या गीताची मोहिनी मला इथे यायला भाग पाडते.”

"मी एक तंत्रसाधक आहे. मला पिशाच्च सिद्धी प्राप्त आहे आणि तेरा वर्षांपासून अखंडपणे मी शवसाधना करतो आहे. तू मला पथभ्रष्ट करायचा चंग बांधला आहेस.” डामरनाथ

“मग हे तरुण साधू, ऐक. मी तुला आत्मसमर्पण केले आहे. संपूर्ण दहा वर्षे विधवांसाठी समाजाने आखून दिलेल्या कठोर परित्यागाचे नियम पाळल्यानंतर ज्या दिवशी मी तुझ्या तोंडून स्त्रीची अवज्ञा करणारे शब्द प्रथम ऐकले, त्या दिवशी का ते माहित नाही पण मी तुला हरवण्याची प्रतिज्ञा केली.

हे तरुण साधका ऐक. तू शक्तीचा उपासक आहेस आणि स्त्री हा शक्तीचा अवतार आहे म्हणून तुझ्या तोंडून स्त्रियांची निंदा शोभत नाही. तू तर स्त्रियांची पूजा करायला हवी. स्त्री प्रेमाला पात्र आहे उपेक्षेला नाही. पुरुष निर्माता आहे तर स्त्री प्रेयसी आहे. त्या प्रेमाचे प्रतीक जे भगवंताच्या रूपाने व्यक्त होते.” वैजयंती

"शांत हो आणि मंदिराच्या सीमेच्या बाहेर जा. स्त्री ही पुरुषासाठी अस्तव्यस्तता आहे. अशांती आहे. तू माझे ध्यान, धारणा, समाधी, निष्ठा, आचार आणि साधना यांच्यात खंड पडण्याचे काम करत आहेस. माझ्या कष्टाची साधना आणि कर्तृत्व तुझ्यामुळे क्षीण होणार आहे. तुझी नारीसुलभ संमोहन शक्ती मला पथभ्रष्ट करून माझे अध:पतन सुरु झाले आहे. मी भोलेनाथ शंकराची पूजा करतो आणि नकळत माझ्या गीतातून  श्रीकृष्णाच्या वियोगात आसुसलेल्या राधेची व्यथा व्यक्त होऊ लागते. तू सर्व काही विस्कळीत करतेस. तू येथून जा." एवढे बोलून डामरनाथ उठून उभा राहिला.

वैजयंती देवी शांत, दृढ आणि खंबीर आवाजात म्हणाली

“संन्यासी महाराज, यात दोष कोणाचा? मी आधी तुमच्यावर प्रेम केले नाही. तुम्ही इथे का आलात? तुम्हाला इथे येण्यासाठी कोणी प्रवृत्त केले?"

“वैजयंती देवी! मी संसारत्याग केलेला संन्यासी आहे. संन्यासी म्हणजे जगासाठी मृत आणि स्वतःसाठी मृत. आता माझ्या उपासनेची वेळ आली आहे.” असे म्हणत डामरनाथ तलावाच्या पाण्यात उतरला.

वैजयंती क्षणभर डामरनाथाकडे एकटक बघत राहिली नंतर उठून उभी राहिली आणि हळूहळू मंदिराच्या सीमेच्या बाहेर गेली.

क्रमश: