Get it on Google Play
Download on the App Store

भगवान श्रीकृष्ण 16

देवाला पत्रीच प्रिय
देवाला फुलांपेक्षा, हारांपेक्षा पत्रीच जास्त आवडते. विष्णूला तुळशीपत्र. शिवाला बिल्वपत्र. मंगलमूर्तीला दूर्वादल यांचीच अत्यंत आवड आहे. यातही अर्थ आहे. आपण बहुजनसमाज शेकडा ९९ लोक बारीकसारीक कर्मे, लहान लहान कर्मेच करीत राहणार. महात्मा गांधी, रवीन्द्रनाथ यांच्या कर्मपुष्पांप्रमाणे माझ्या कर्मपुष्पांला सौंदर्य, रंग, सुगंध नसेल. माझी कर्मे ही वासहीन पाने आहेत, परंतु तीच देवाला जास्त प्रिय आहेत. ही पाने मात्र टवटवीत, सतेज, हिरवीगार असू देत म्हणजे झाले. आणि फुले तरी झाडाला नेहमी कोठे असतात? नेहमी पानेच आहेत, एखादे वेळेस फुले, आपल्या सत्कर्माची, रोजच्या बारीकसारीक कर्माची पानेच सुंदर, तजेलदार जर अर्पण करीत गेलो, तर एक दिवस पुष्पांप्रमाणे त्याहूनही सुंदर कर्मे आपल्या जीवनतरूवर फुलतील व ती वाहता येतील. ती पुष्पे केव्हा मिळतील तेव्हा ती मिळोत. भगवंताला पत्रीही प्रिय आहे. खरे पाहिले तर पत्र व पुष्प दोन्ही त्याला समानच आहेत.

श्रीकृष्णाने प्रथम गोकुळातील वणवे विझवले. तेथे व्यवस्था निर्माण करून दिली. तेथले असुर नाहीसे केले. तेथे प्रेम निर्माण केले. गायीची भक्ती शिकवली. मग यज्ञधर्म दिला. गोकुळात विजय मिळवून मग तो बाहेरच्या जगात क्रांती स्थापावयास, बाहेरच्या जगातील असुरसंहार करावयास, बाहेरच्या जगातील पददलितांस वर उठवण्यास, बाहेरच्या बजबजपुरीत व्यवस्था निर्माण करण्यास, बाहेरच्या जनतेस नवधर्म शिकवण्यास, गोपाळांना शिकवण्यास, स्त्रिया, वैश्य, शूद्रांस उध्दारण्यास गेला. मनुष्य स्वतःच्या गोकुळात, स्वतःच्या अंतरंगात जेव्हा स्वराज्य स्थापील, तेथे संगीत, सुसंबध्दता, सुसंवाद निर्माण करील, तेथले असुर दूर करील, वणवे विझवील-थोडक्यात, स्वतःचा स्वामी होईल, तेव्हाच त्याला जगातही काही करता येईल. ज्याने घर सुधारले नाही, त्याला बाह्य जग काय सुधारता येणार? ज्याने स्वतःला जिंकले नाही, तो दुस-यांस काय जिंकणार? ज्याला स्वतःला शांती नाही, तो दुस-यास काय देणार? जो स्वतः पडलेला, तो दुस-यास कसा उठवणार? स्वतःला शिकवल्यावर मग जगाला शिकवता येईल. स्वतःच्या गोकुळाचे स्वर्गभुवन केल्यावर इतर सारे जगतही आपणास सुखमय करता येणे शक्य आहे.