भगवान श्रीकृष्ण 11
हृदय ओतले असेल ते काव्य
देवाच्या दृष्टीने उच्चनीच काही नाही. लघु-गुरू, श्रेष्ठ-कनिष्ठ काही नाही. एखाद्या झाडणा-याने झाडण्याच्या कामात सर्व हृदय गोवले असेल, हे देवाचे अंगण मी झाडतो आहे, माझ्या राजराजेश्वराचे अंगण झाडतो आहे या भावनेने घर झाडले असेल, त्या वेळेस इतर सर्व गोष्टींची विस्मृती जर त्याला पडली असेल, तर ते झाडण्याचे-सडासंमार्जनाचे कर्म किती थोर आहे ! एखाद्या महान कवीने लिहिलेले काव्य व हे संमार्जन ही कामे देवाला सारखीच पूज्य व पवित्र वाटतील.
बुकर टी. वॉशिंग्टनची गोष्ट आहे ना? तो गरीब होता. एका श्रीमंताकडे काही काम मागावयास गेला. त्याने त्याला खोली झाडण्याचे-स्टी-रूम झाडण्याचे-काम दिले. बुकर टी. वॉशिंग्टनने ती खोली किती स्वच्छ झाडली ! पुनःपुन्हा हाताने पुसून मळ आहे का पाही व पुन्हा पुशी. आरशासारखी त्याने ती खोली केली. तो धनी प्रसन्न झाला, बुकर टी. वॉशिंग्टनचे ते झाडण्याचे काम का तुच्छ होते? हलके होते? कोण म्हणेल? त्यात सारा जिव्हाळा ओतला आहे, त्यात हृदय आहे. ते काव्य आहे. बुकर टी. वॉशिंग्टन कवी झाला होता व झाडण्याचे काव्य निर्माण करीत होता.
कार्लाईल म्हणतो ना, ''आपण सारे कवीच आहोत.'' मग ते काव्य कोणत्याही रूपाचे असो. चित्र काढण्याचे असो, गाण्याचे असो, खादी विणण्याचे असो, भाकर भाजण्याचे असो, महाग्रंथ लिहिण्याचे असो, मुलांना शिकवण्याचे असो-ही सारी कर्मे काव्ये होत. शेतकरी भूमी नांगरून तिला सस्य-श्यामल व सुंदर करतो, माळी भूमीला फळाफुलांनी नटवतो. ती महाकाव्येच आहेत ! कोठलेही कर्म अव्यंग करणे, निर्दोष, परिपूर्ण करणे; त्यात कुचराई, ढिलेपणा न करणे; त्या कार्याला मनात तुच्छ न लेखून ते करणे, म्हणजे ते काव्य आहे. ते थोर आहे. ती ईश्वराची पूजा आहे. कर्म म्हणजे पूजा, असे कार्लाईल म्हणे. तेच गीतेनेही सांगितले आहे.
शिवाजीमहाराज गडावर सुरक्षित पोचल्याची खूण म्हणून अजून पाच तोफा कशा ऐकू येत नाहीत, म्हणून चिंतेने खिन्न झालेला थोर वीर बाजी-त्याचे प्राण, कंठागत प्राण घुटमळत राहिले होते. बार ऐकताच, ''आता मी सुखाने मरतो, माझं काम झालं.'' असे तो म्हणाला त्याचे ते कर्म किती परिपूर्ण होते!
भूमितीचा जनक जो युक्लिड तो समुद्रकिना-यावर वाळूमध्ये भूमितीचे सिध्दान्त व प्रमेये सोडवण्यात तल्लीन झाला होता, आणि शत्रूंनी त्याचे शिर कापून नेले ! तो स्वतःच्या कर्मात किती एकरूप झाला होता ! ती पूजा होती.
भगवान पाणिनी वनामध्ये शिष्यांना व्याकरणाचा पाठ देत होते. इतक्यात समोरून विशाला व्याघ्र आला. व्याघ्र पाहताच शब्दब्रह्मची उपासना करणारा हा ऋषी न घाबरता आनंदला. त्या महान आचार्याला वस्तुपाठ शिकवण्याला वस्तु मिळाली. व्याघ्र शब्दाची व्युत्पत्ती त्यांनी जी सांगितली होती ती समोर व्याघ्राला पाहून ते प्रत्यक्ष सांगू लागले. 'अय व्याघ्रः-व्याजिघ्रतिं स व्याघ्रः (ज्याचे घ्राणेंद्रिय विलक्षण तीक्ष्ण आहे तो व्याघ्र)' अशी वाघाकडे बोट करून ते शांतपणे, आनंदाने व्युत्पत्ती प्रतिपादू लागले. परंतु शिष्य केव्हाच पळून गेले होते. आणि व्याघ्रानेही झडप घालून पाणिनीस गिळंकृत केले ! स्वकर्मातील केवढी ही तल्लीनता; जी जी वस्तू भेटेल, मिळेल ती ती माझ्या कर्मातील साधन करीन, तिला पवित्र मानीन अशी ही वृत्ती आहे. पाणिनींची व्याकरणविद्या म्हणजे त्यात सारे जीवन होते. ती ईश्वराची पूजा होती.