भगवान श्रीकृष्ण 9
प्रमाणबध्दता हवी
संगीत निर्माण करणे म्हणजे प्रमाण साधणे; कोठल्या तारा किती पिळाव्या, कोणते पडदे दाबावे हे सारे कळणे. प्रमाणबध्दता म्हणजे कलेचा आत्मा आहे. प्रमाणबध्दतेत सौंदर्य आहे. आपले नाक दोन हात लांब असले, किंवा कानच फार लांब असले तर आपण सुंदर दिसणार नाही. प्रमाणबध्दता पाहिजे. जीवनात संगीत निर्माण करणे, व्यवस्था निर्माण करणे, सुसंवाद निर्माण करणे, विसंवाद दूर करून सुसंवाद उत्पन्न करणे म्हणजेच सर्व प्रवृत्तींचा नीट मेळ घालणे. अंतःकरणातील वासना-विकार-मनोवृत्ती यांना प्रमाणात राखणे यालाच गीता 'योग' म्हणते. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत फार सुंदर रीतीने लिहिले आहे :-
''आहार तरी सेविजे । परी युक्तीचेनि मापे मळिजे ।
क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिति ॥
मापितला बोल बोलिजे । मितलिया पाउली चालिजे ।
निद्रेही मान दीजे । अवसरे एके ॥
जागणे जरी जाहले । तरी व्हावे ते मितले ।
येतुलेनि धातुसाम्य संचले । असेल सुख ॥
ऐसे युक्तीचेनि हाते । जे इंद्रिया वोपिजे भाते ॥
तै संतोषासी वाढते । मनचि करी ॥'' (अ.६ । ३४९-५२)
यालाच संयम म्हणतात. परंतु हे कठीण आहे. हे साधावयाचे कसे? प्रयत्नाने. रवीन्द्रनाथांनी एका कवितेत म्हटले आहे, ''देवा, तू कोकिळेला जेवढा आवाज दिला आहेस तेवढाच तिच्याजवळ मागतोस. कोकिळा फक्त कुऊ कुऊ करते. ते तुला पुरे होते. तू फुलाला जेवढा वास दिला आहेस, तेवढाच त्याच्याजवळ मागतोस. परंतु मनुष्याच्या बाबतीत तू निराळा वागतोस. कोळसे देऊन हिरे करा असे सांगतोस. मृत्यू देऊन अमृतत्व निर्माण करा, अंधार देऊन प्रकाश निर्माण करा, असे सांगतोस.'' असेच आहे. ईश्वराने कठीण काम आपल्यावर सोपवले आहे. याचाच अर्थ त्याचे आपणावर प्रेम आहे. तो आपणास तुच्छ मानीत नाही. माझी मानवबाळे महनीय गोष्टी करतील अशी त्या थोर पित्याची अपेक्षा आहे.
तुकारामांनी म्हटले आहे, ''इंद्रियांची दीने । आम्ही केली नारायणे॥'' नारायणाने आम्हांला इंद्रियांचे गुलाम करून ठेवले आहे व त्यांचे आम्ही धनी व्हावे असे तो इच्छितो. आमच्या हृदयांत गोंधळ आहे, तेथून तो संगीताची आम्ही निर्मिती करावी अशी अपेक्षा करतो. हे कठीण आहे. परंतु म्हणूनच करण्यासारखे आहे. हे करणे म्हणजेच कृष्ण जन्माला घालणे होय.
असा हा कृष्ण वाढत कसा जाईल? कर्म करीत गेल्याने, कर्म कसे करावे? कोणते कर्म करावे?