भगवान श्रीकृष्ण 8
कृष्णजन्म केव्हा होतो?
द्वेषमत्सरांनी त्रस्त झालेल्या अशा या गोकुळात शेवटी कृष्ण जन्माला येतो; नंद-यशोदेच्या पोटी तो जन्माला येतो, यशोदा म्हणजो यश देणा-या, कल्याण करणा-या वृत्ती. नंद म्हणजे आनंददायी वृत्ती. याचा अर्थ अंतःकरणातील सत्यप्रवृत्तींना जेव्हा तळमळ लागते, या झगडयातून शांती मिळावी असे वाटते तेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होतो ! ही उत्कंठा म्हणजेच कृष्णजन्माची उत्कंठा लागली, म्हणजे निम्मे काम संपले. रोगाची चिकित्सा सुरू झाली की रोग पळतो ! स्वातंत्र्याचा ध्यास लागताच गुलामगिरी पळते. अंतःकरणातील गोंधळाचा, बजबजपुरीचा वीट आला, श्रावणातील कृष्णपक्षातील भेसूर काळोखाचा तिरस्कार वाटू लागला, श्रावणातील रात्रीचे वादळ, मुसळधार पाऊस, मेघांचा गडगडाट, विजांचा चमचमाट हे जाऊन वातावरण शांत व्हावे, ही अविकासाची वादळी भेसूर हवा जाऊन वातावरण प्रसन्न व्हावे, अशी तळमळ लागते, नेत्रांतून पाणी येते, मन अस्वस्थ होते, अधीर होते, तेव्हा श्रीकृष्ण जन्मतो. या सर्व अव्यवस्थेत मला व्यवस्था लावता येऊ दे, या अंधारात मला ध्येयसूर्य, ध्येयध्रुव दिसू दे, असे कळकळीचे वाटणे म्हणजेच कृष्णजन्म होय.
रवीन्द्रनाथांनी गीतांजली म्हटले आहे, ''सारा दिवस माझा सतारीच्या तारा लावण्यात व त्या पिरगळण्यातच गेला, अजून सतार लागत नाही. तुला मी कसे बोलावू, काय गाऊन दाखवू?'' अशीच आपली स्थिती असते. सारे जीवन बेसूर असते. निरनिराळया इंद्रियांच्या, प्रवृत्तींच्या, मनोरथांच्या तारा नीट लावता येत नाहीत. ही हृदयतंत्री सातच तारांची नसून अनंत तारांची आहे. या तारा नीट लावून त्यांच्यात मेळ निर्माण करून संगीत निर्माण करणे हे श्रीकृष्णाचे काम आहे. मुरली वाजवणारा श्रीकृष्ण तो हाच होय. या आपल्या इंद्रियगोकुळात ध्येयश्रीकृष्ण या सर्व वासनामय, कल्पनामय तारांना कह्यात आणून, त्यांना खुंटयांना बांधून सर्वांना योग्य ते स्थान देऊन त्यातून दिव्य संगीत निर्माण करतो. अंतःकरणातील माझ्या कामक्रोधांचाही हा श्रीकृष्ण उपयोग करून घेतो. 'क्रोधो हि निर्मलधियां रमणीय एव ।' ज्या ज्या अंतःकरणात हा मेळ घालणारा योगरूप कृष्ण जन्मास आला त्याचा क्रोधही किती सुंदर असेल !
अव्यवस्थेतून व्यवस्था निर्माण करणारा, गोंधळातून संगीत निर्माण करणारा म्हणजे श्रीकृष्ण होय. अॅमील या थोर विचारकर्त्याने स्वतःबद्दल म्हटले आहे, ''माझ्या विरोधी संशयात्मक निराश अंतःकरणात खाली खोल दबून राहिलेले, अगदी जीवनाच्या आतील गाभा-यात असलेले एक लहान मूल आहे. ते मूल अदृश्य आहे. ते ध्येयावर श्रध्दा ठेवणारे, प्रेमावर, पावित्र्यावर, मंगलावर विश्वास ठेवणारे, सर्व दैवी गोष्टींवर, दिव्यतेवर श्रध्दा ठेवणारे असे आहे.''
आपल्या सर्वांच्या हृदयगाभा-यात हे बालक हा शंभू, हा मृत्युंजय, हा सदाशिव, हा श्रीकृष्ण असतो. तो दिसत नाही. परंतु असतो. कधी एखाद्या वेळेस त्याचा मंद सूर येतो. हे संगीत निर्माण करणारे लहान बालक म्हणजेच श्रीकृष्ण होय.
ह्या बालकाला वाढवले पाहिजे. या बालकाची आपण आई झाले पाहिजे. देव भक्ताची आई होतो. परंतु भक्तही देवाची आई होतो ! भक्त ध्येयबाळाला जन्म देतो व त्या ध्येयाचीच पुढे पूजा करतो. तुलसीदासांनी म्हटले आहे, ''देवा, तुझी-माझी नाती अनेक आहेत. मला ज्या वेळेस जे नाते योग्य वाटते ते मी मानतो.'' या ध्येयदेवाजवळ भक्त असाच वागतो. आधी ध्येयावर रुसतो, रागावतो, कधी त्याची पूजा करतो, कधी त्याला वाढवतो. आपण आपल्या ध्येयवादाचे आईबाप झाले पाहिजे, त्याला वाढवले पाहिजे. म्हणजे तो दिव्य मुरलीने हृदय शांत करील.