भगवान श्रीकृष्ण 5
अन्यायाचा काळ
कृष्ण हा मुक्ती देणारा आहे. बध्दांची बाजू घेणारा आहे. जरासंधाने ९६ राजे तुरुंगात घातले होते व एका दावणीने त्यांना बांधले होते. ते सारे कृष्णाने मुक्त करवले. जरासंधाचा वध करवला. शिशुपालाचा उच्छेद केला. साम्राज्यमदाने चढलेल्यांचा नक्षा उतरवला. कौरवांनी पांडवांस लुबाडले; हे पाहून तो पांडवांचा सखा झाला व त्यांना धीर देता झाला. त्यांची बाजू उचलून धरता झाला व कौरवांचा नाश करता झाला. दुस-यास जो अन्यायाने लुबाडील, नाडील, पायांखाली चिरडील त्यांचा कृष्ण हा काळ होता. जे पददलित, वंचित त्यांचा तो वाली होता. उठा, मीही तुमच्याबरोबर येतो. रडू नका. हातपाय गाळू नका, असे अभयवचन देणारा, आश्वासन देणारा, प्रोत्साहन देणारा तो होता.
जो जो संकटात असे त्याला श्रीकृष्णाचे स्मरण होई. तो कृष्णाला हाक मारी. मारली जाणारी गाय असो, छळली जाणारी पांचाली असो, त्यांना आता एक श्रीकृष्ण दिसे. आणि निरपेक्ष सहाय्य तो करी. त्याचा मोबदला मागत नसे. द्रौपदीने एक पान दिले तरी त्याला ढेकर येई व म्हणे, ''तू मला सारे दिलेस!'' बिंदू घेऊन तो सिंधू देणारा होता. पोहे खाऊन सुदामपुरी देणारा होता. असा निःस्वार्थी, फलेच्छारहित, परंतु लोकसंग्रहाचे, अति त्रासाचे काम करणारा हा महापुरुष युगपुरुष होता. जिवंत, त्यागमयी, यज्ञमयी मूर्ती होती.
जीवनाचे सार गीता
अशा या परम ज्ञानी कर्मवीराने आपल्या जीवनाचे सारही आपणास दिले आहे. जीवनाची सफलता कशाने आहे हे त्याने सर्व मानवजातीला सांगून ठेवले आहे. आपल्याला संदेश देऊन ठेवला आहे. हा संदेश म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. हा लहानसा ग्रंथ, परंतु याला तुलना नाही. वामनाच्या तीन पावलांत सर्व ब्रह्मांड मावले त्याप्रमाणे या सातशे श्लोकांत सर्व तत्त्वज्ञान आले आहे. सर्व थोर विचार आले आहेत. येथे भक्ती आहे, कर्म आहे, ज्ञान आहे, योग आहे. सर्वांना येथे स्थान आहे. सर्व तत्त्वज्ञानांचे सूर येथे एकत्र आणून परमेश्वराने-या श्रीकृष्णाने मधुर संगीत निर्माण केले आहे. गीता म्हणजे धर्मविचारांचा लहान कोश आहे, येथे सर्व आहे. गीता ही श्रीकृष्णाची मुमुक्षूला, पुरुषार्थ प्राप्त करू इच्छिणा-याला देणगी आहे.