भगवान श्रीकृष्ण 7
हृदयात श्रीकृष्ण
श्रीकृष्णाकडे आता मी निराळयाच दृष्टीने पाहू लागतो. गोकुळात व्यवस्था करणारा, प्रेम निर्माण करणारा, मुरली वाजविणारा यांचे निराळेच आता मला दर्शन होऊ लागते. हा कृष्ण माझ्या हृदयातच मला दिसायला लागतो. गोकुळात कृष्णा वाढला. हे कोठले गोकुळ ! 'गो' या शब्दाचा अर्थ गाय आहे, तसाच इंद्रिय असाही अर्थ आहे. गायी जशा हिरवे हिरवे रान पाहून दूरवर चरत जातात, त्याप्रमाणे मोहक, आकर्षक वस्तू दिसली की इंद्रियेही पतंगाप्रमाणे त्याकडे धावत जातात ! गोकुळ म्हणजे इंद्रियांचे कुळ, इंद्रियांचा समुदाय. या इंद्रियांच्या शेकडो प्रवृत्ती असतात. त्यात एकवाक्यता नसते. अंतःकरणात गोंधळ असतो, वणवे असतात. अंतःकरणाच्या शुध्द भावनेच्या यमुनेत अहंकाराचे कालिये ठाणी देतात. अधासुर, दंभासुर निर्माण होतात. अंतःकरणाची तगमग होते. आरडाओरड, गदारोळ, धांगडधिंगा माझ्या हृदयांगणात मला ऐकू येतो. माझे हृदयमंथन चालू असते. आपण समुद्र-मंथनाची गोष्ट वाचतो. हे समुद्रमंथन म्हणजे रूपक आहे. हे समुद्रमंथन म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या हृदयात रात्रंदिन चालणारे हृदयमंथन होय. या हृदयसागरावर अनेक वासनांच्या, विकारांच्या, मनोरथांच्या ऊर्मी उसळत असतात आणि या मंथनातून या सागरतीरावर नाना प्रकारच्या वस्तू येऊन पडतात. आपल्या या हृदयात काय नाही? यातून लक्ष्मी निर्माण होते, चंद्र निर्माण होतो, यातून दारू निर्माण होते, अप्सरा निर्माण होतात, विष निर्माण होते ! काय निर्माण होत नाही? ज्या वेळेस विषयवासना हृदयात उंचावतात तेव्हा आपण अप्सरा निर्माण करतो. ज्या वेळेस प्रेमसागर उचंबळतो तेव्हा चंद्र निर्माण होतो. जेव्हा आपण लोकांना वाक्ताडन करतो, त्यांच्यावर जुलूम करतो तेव्हा चाबूक आपल्या हृदयातून निर्माण होतो. जगाला बोंब मारायला लावतो, हाय हाय करायला लावतो, तेव्हा शंख निर्माण होतो, असे हृदयमंथन सुरू असते. त्यामुळे आपणास शांती नसते. अमृत मिळाल्याशिवाय दैवी वृत्तींना शांती नाही. आसुरी वृत्तींना सुरा मिळाल्याने, अप्सरा मिळाल्याने, लक्ष्मी मिळाल्याने आनंद होईल; परंतु सद्वृत्तींना अमृत पाहिजे असते.
रात्रंदिवस युध्दाचा प्रसंग
श्रीकृष्णाला सोळा हजार नारी होत्या असे आपण ऐकतो. माझ्या मनात असे येते की, या सोळा हजार नारी म्हणजे आपल्या मनोवृत्तीच होत. जोपर्यंत आपले ध्येय ठरत नाही, मार्ग ठरत नाही, कोठे जावयाचे ते ठरत नाही, तोपर्यंत आपली स्थिती अशीच असते. वाङमयसेवक व्हावे, इतिहाससंशोधक व्हावे, धर्मवीर व्हावे, संत व्हावे, खादीसेवक व्हावे, अस्पृश्योध्दाराला वाहून घ्यावे, मल्ल व्हावे, उत्कृष्ट खेळाडू व्हावे, ग्रामसंघटना करणारा व्हावे, ज्योतिषशास्त्रज्ञ व्हावे, क्रांतिकारक व्हावे, सत्याग्रही व्हावे-व्हावे तरी काय? ह्या शेकडो प्रवृत्ती अंतःकरणाला ओढतात व आपण एक प्रकारे निष्क्रिय होतो. ''माझ्याकडे चल, माझ्याकडे ये'' अशा आरोळया, असा आग्रह या सर्व प्रवृत्ती करीत असतात. याशिवाय, अन्य प्रवृत्ती असतातच. सुखभोगाच्या, विलासाच्या, ऐषारामाच्या, द्वेष-मत्सराच्या, जसजसा मनुष्य वाढत जातो, सुसंस्कृत होतो तसतशा त्याच्या प्रवृत्ती वाढतात. रानटी माणसाला खाणे-पिणे, झोपणे अशा थोडयाच प्रवृत्ती असतील. त्याच्यापेक्षा सुधारलेल्या माणसाला जास्त असणार. कृष्णाच्या काळात सोळा हजार प्रवृत्ती असतील. आज विसाव्या शतकातील माणसास वीस हजार असतील, व तिसाव्या शतकातील माणसास तीस हजार असतील! जीवन जसजसे विकसित होत जाईल, गुंतागुंतीचे होत जाईल तसतशा या प्रवृत्ती वाढत जाणार. अंतःकरणात अशा प्रकारे प्रवृत्तींचा धुमाकूळ चाललेला अतो. परस्परविरोधी असे हे झगडे चाललेले असतात. तुकारामांनी म्हटले आहे, ''रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग ! अंतर्बाह्य जग आणि मन-'' रात्रंदिवस बाह्य आचार आणि अंतर्विचार यांत सारखा झगडा आहे.