भगवान श्रीकृष्ण 12
आणि महाराष्ट्राची आवडती जनाबाई ! नामदेवांकडे संतमंडळी बसून भजन करीत आहेत, चर्चा करीत आहेत, आनंदरस लुटीत आहेत, परंतु जनाबाई दळणच दळीत बसे. दळणाचे काम सोडून ती चर्चा ऐकायला गेली नाही. जात्याचा खुंटा हाच भगवंताचा पाय. तो धरून आलेल्या संतमंडळींना सुंदर भाकर पाहिजे म्हणजे दळण. सुंदर दळण ती दळत होती. ते दळण म्हणजे काव्य होते. परमेश्वराची पूजा होती.
भूमितिशास्त्रज्ञ युक्लिड, व्याकरणकार पाणिनी, दळणारी जनाबाई मरणारा शूर बाजी-ह्या सा-यांनी परमेश्वराची पूजा केली व परमेश्वराला ती संग्राह्यच वाटली.
तेव्हाच उत्कृष्ट कर्म हातून होते, जेव्हा आपण त्या कर्माच्या आनंदातच बुडून गेलेलो असतो, जेव्हा आपण स्वतःला, कीर्तीला, मानाला, फळाला विसरून गेलेले असतो. योगवासिष्ठात म्हटले आहे, ''अनहवेदनं सिध्दि अहंवेदनमापदः ।'' अहंकाराची विस्मृती म्हणजेच सिध्दी. अहंकाराची जाणीव असणे म्हणजेच आपत्ती व अपयश. वेरूळची लेणी खोदणारे, अजिंठयाची चित्रे चितारणारे, दक्षिण हिंदुस्थानातील ती पाषाणमय महाकाव्ये-महागोपुरे बांधणारे-या सर्वांना स्वतःची विस्मृती पडली होती, म्हणूनच त्यांच्या हातांत मूर्तिकला सिध्दी घेऊन बसली होती. स्वातंत्र्याच्या झगडयात पडलेले जे आपण ते आपणही जर घरदार, आप्तइष्ट सर्व विसरू तर सिध्दी लौकर प्राप्त होईल. अजून आपण स्वीकृत कर्मात वेडे नाही म्हणून अपयश येत आहे.
पीतांबराचा तोबरा करी
अशा रीतीने कर्ममात्र पवित्र आहे, पतीला परमेश्वर मानून त्याचे धोतर नीट धुवून ठेवणारी, त्याला आवडेल अशी भाजी-भाकरी करणारी-अशी पत्नीच्या चेह-यावर केवढी प्रसन्नता असते ती पहा ! ती खरोखर मुक्तच असते. कारण पतीच्या सेवेत, समाधानात ती स्वतःचे सुख विसरते. तिला दुसरे सुखच नाही. समोर बसणा-या मुलांना देवाच्या बाळमूर्ती समजून आदराने-भक्तीने वागणारा गुरू ! तोही मुक्त आहे. ही समोरची मुले रद्दी, धोंडे, दगड, फत्तर नसून प्रताप, शिवाजी, भास्कराचार्य, रवीन्द्रनाथ यांच्यात आहेत, या दृष्टीने पाहणारा गुरू व त्याचे अध्ययनकर्म कशा त-हेचे असेल ! विवेकानंद कलकत्त्याला असणा-या एका महाराष्ट्रीय ब्राह्मण तपस्विनीकडे गेले होते. ती काही मुलामुलींना शिकवत होती, ती विवेकानंदांना सद्गदित होऊन म्हणाली,''हीच माझी पूजा. ही मुले, यांची सेवा, हाच माझा धर्म. या माझ्या भगवंताच्या मूर्ती आहेत.'' थोर शब्द, अर्थगंभीर शब्द ! एका शिक्षणशास्त्रज्ञाने म्हटले आहे, ''एक घटकाभर मुलांची सात्त्वि करमणूक करणे म्हणजे देवाशी सहकार्य करणे होय.'' देवाशी सहकार्य करणारा असा गुरू मुक्तच आहे. तोच त्याचा धर्म. तेच जप-तप. तेच संध्यास्नान. भारतीय युध्दाच्या वेळेस सूर्यास्त होताच सर्व क्षत्रिय संध्यावंदनाला जात. परंतु श्रीकृष्ण कोठे जाई? तो आपले घोडे पाण्यावर नेई. त्यांच्या अंगांत रुतलेली शल्ये काढी. त्यांना थोपटी. त्यांचा खरारा करी त्यांना घासदाणा देई. भगवान त्यात रमून जात. त्या कार्यात दिव्य आनंद त्यांना वाटे. आपल्या पीतांबराचाच तोबरा करून तो त्या घोडयांस दाणा चारी. कृष्णाची स्नान-संध्या तीच. ते कर्म त्याने उचलले होते. रामशास्त्री प्रभुणे यांनी पहिल्या माधवराव पेशव्यांना सांगितले ना, ''तुम्ही राज्याचा भार शिरावर घेतला आहे. आता त्याची अखंड चिंता वाहणे हीच तुमची स्नान-संध्या.'' तुकारामांनी म्हटले आहे, ''माझ्या विठोबाचे गान ! हेचि माझे संध्या-स्नान.'' जे कर्म करत असाल त्यातच रमा. तोच सकल धर्म आहे असे माना. त्या वेळेस त्या कर्माहून दुसरे काही पवित्रतम तुम्हांला नाही.