भगवान श्रीकृष्ण 6
नवधर्म
आपले सर्व विचार या गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहेत. एक नवधर्मच जणू त्याने दिला. या धर्माचा अधिकार यच्चयावत् सर्वांला आहे. या धर्माचे आचरण करून सर्व मुक्त होतील. वेदाचा रस्ता, ज्ञानाचा रस्ता 'स्त्री-वेश्य-शूद्रहिं' (९।३२) यांना बंद केला गेला होता, तो श्रीकृष्णांनी मोकळा केला. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत शेवटी म्हटले आहे की, ''वेद श्रीमंत आहे, परंतु तो कंजूष आहे. तो त्रैवर्णिकांसाठी आहे. त्याचे दार इतरांना खुले नाही. परंतु गीता ही सर्वांसाठी उभी आहे. हे पाहून वेद लाजला, भ्याला व तो चोरून गीतेत येऊन बसला व आपली अब्रू सांभाळता झाला.'' बाळपणीच्या यज्ञाच्या कल्पना या गीतेत श्रीकृष्णांनी अधिक स्पष्ट केल्या. वेदात सांगितलेले यज्ञ, ते हविर्भाग, त्या आहुती यांना अर्थ नाही; स्वर्गभोगाच्या आसक्तीने केलेली ही कर्मे ! ही तुच्छ आहेत.
अविवेकी वृथा वाणी बोलती फुलवूनिया ।
वेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे ॥ २।४२
जन्मूनिया करा कर्मे मिळवा भोग वैभव ।
भोगा कर्म-फळे गोड सांगती स्वर्गकामुक ॥ २।४३
अशा प्रकारचे जे यज्ञ, त्यांचा श्रीकृष्णाने धुव्वा उडवला. ''तिन्ही गुण वेद वेद त्यात राहे अलिप्त तू ।'' (२।४५) ''क्षीणे पुण्ये मृत्यु लोकास येती'' (९।२१) वगैरे वचनांनी या कर्मांची हीनता व विफलता दाखवली आहे. ''द्रव्ययज्ञाहुनी थोर ज्ञानयज्ञचि होय तो ।'' (४।३३) असे त्याने स्वच्छ सांगितले. आणि हा ज्ञानयज्ञ काय,-याचे अनेक ठिकाणी गीतेत वर्णन केले.
गीता कर्म करायला सांगत आहे. ''नेमिले तू करी कर्म, करणे हेचि चांगले ।'' (३।८) असे गीता पुकारीत आहे. परंतु गीता जे कर्म करायला सांगते, ते योगमुक्त कर्म होय. त्यात भक्ती व ज्ञान ही ओतली आहेत. भक्तिज्ञान ज्याच्यात ओतलेली आहेत, असे कर्म म्हणजे ज्ञानयज्ञच तो. अशा कर्माने शांती मिळते, श्रेय मिळते, मोक्ष मिळतो.