पद २
गजवदना रे गजवदना रे।
गजवदनारे नमितों ॥ ध्रु० ॥
तुजविण आना । आणिना मी ध्याना ।
नाम संकटीं तें दुजे वदना रे ॥१॥
गौरीहरप्राणा। लंबोदरघाणा ।
हातीं धरितोसी दिव्यरदना रे ॥ २॥
ब्रह्माविष्णु ध्याती। योगी भोगी गाती ।
यांच्या करितोसी दुःखकदना रे ॥ ३ ॥
सिद्धीबुद्धी अंकी । त्रिभुवन जिंकी ।
ऐसें सामर्थ्य त्या देसी मदना रे ॥ ४ ॥
मध्वनाथचित्तीं । वाटे तुझी खंती ।
येसी धांवोनिया राजसदना' रे ॥५॥
नमितों तुजला गजवदना रे ॥