आतला आवाज....!!
आपल्या मनाच्या आतील आवाज ऐकणे हा उत्तम संस्कार हे मानले तर खरं तर आपल्याला दोन मने असतात त्यापैकी एक मन उपजतच सुसंस्कारित असते, चांगले वाईट त्याला समजते. प्रत्येक प्रसंगी ते मार्गदर्शन करते मात्र आपले दुसरे मन लोभी, स्वार्थी असते. या दुसऱ्या वाईट मनावर चांगल्या मनाने मात करण्यासाठी संस्कार आवश्यक वाटतात. चुकीच्या संस्कारांमुळे वाईट मन जिंकते व ते सुसंस्कारित मनाला दाबून टाकते. पण सुसंस्कारित मन सतत जाणीव करून देते "तुझं चुकलंय, चुकतंय" मग अशा मानसिक द्वंद्वाची सुरवात होते.
बालकांच्या प्रत्येक अवस्थेचे आपण त्यांच्यावर नकळत सुसंस्कार करत असतो. मार्गदर्शन करत असतो. या जन्मोत्तर अवस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर शैशावस्था आणि किशोरवस्था नंतर येते ती कुमारवस्था.शैशावस्थेत मुलं आईवर पूर्णपणे अवलंबून असते, किशोरवस्थेत मुलांच्या भावनांना वळण लागते म्हणजे मनावर योग्य संस्कार त्या त्या अवस्थेत प्रत्येक कृती व आचार करायला लावतात. मात्र कुमारवस्थेमध्ये मुलांवर होणारे संस्कार महत्वाचे ठरतात या अवस्थेत मुले अमूर्त विचार करायला लागतात.अगदी "शंकर वैद्य"* यांच्या काव्यरचने प्रमाणे "दिवस तुझे फुलायचे, झोपळ्यावाचून झुलायचे" अशी अवस्था प्राप्त होणारी ही कुमारवस्था असते, मुलांचा मानसिक, भावनिक, सामाजिक विकास घडत असतो.व सर्व प्रकारच्या अमूर्त कल्पना उदा. शौर्य, आनंद, स्वार्थ, विश्वास विकसित होतात.त्यांचीस्वतःची अशी मते तयार होतात.ती कल्पनाविलासाकडे रमतात व वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात.त्यासाठी पालक व मुलांमध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे. त्यांना उपदेश न करता त्यांना थोडे स्वातंत्र्य द्यावे, त्यांच्याशी संघर्ष शक्यतो टाळावा, या वयात मुले गट करतात. त्यातून खूप काही शिकत असतात. त्यासाठी पालकांनी त्यांच्या विधायक प्रवृत्तीलावाव द्यावा, त्यांना योग्य तो मान देणे गरजेचे आहे. त्यांच्यावर विश्वास टाकणे, त्यांच्यात प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे. त्यांना दोष देणे टाळले पाहिजे.
मुलांवर उत्तम संस्कार होण्यासाठी पालकांचा त्यांच्याशी निकोप संवाद हवा कारण त्यांचं ते सुसंस्कारित मन कुठेतरी आरोळी देत असते, "आम्हाला समजून घ्या".
त्यांची कृती म्हणजे त्यांच्यात होणाऱ्या शारिरीक व मानसिक बदलांचे परिणाम असतात. पालकांनी त्यांचे ताणतणाव, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, स्वातंत्र्य हवेहवेसे करणे, तसेच स्वतःच्या मर्यादा, स्वतःची ओळख करून घेण्याची धडपड समजून घेतली पाहिजे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अनादर न करता,त्यांना कमी न लेखता त्यांच्या विकासाला भरपूर वाव दिला पाहिजे, कारण या मुलांना सुरक्षितता हवी असते.जिव्हाळा आणि प्रेम यासाठी मुले आसुसलेली असतात, अशा स्थितीत त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आपण मुलांवर अधिकच बंधने लादली तर ती बंडखोर बनतात, मुद्दाम ती आई-वडिलांच्या विरुद्ध कृती करतात. एखाद्या बाबतीत आपले पाल्य मागे पडत असेल तर त्यामागचे कारण समजून घेणे आवश्यक ठरते. या पालक-मुले यांच्या सुसंवादामुळे ती आपल्याशी मोकळेपणे बोलतात, काही मतभेद झाले तरी त्यांना आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य दिले गेले पाहिजे. तरच आपण आपल्या पाल्याचा विकास साधू शकू, त्याचे मन नकळत सुसंस्कारित होईल.
सुदृढ व्यक्तिमत्व विकास, उत्तम संस्कार,जबाबदरीने निर्णय घेण्याची क्षमता, विधायक कामाची आवड यासर्वांकरिता मुलांमध्ये पालकांचा सुसंवाद असणे गरजेचे ठरते. अशा या संवेदनक्षम, अशांत, नाजूक, वादळी अवस्थेतून मुलांना सुसंस्कारित करणे म्हणजे आपण पालकांनी त्यांना विश्वासात घेऊन सुसंवाद साधणे खऱ्या अर्थाने टॉनिक ठरेल. मग बघा आपली मुले कशी स्वतःहून आपला विश्वास संपादित करतात व आपल्या जवळ येतात ते.
प्रत्येक पालकाला आपले मुल सैरभैर झाले आहे का? याचा विचार करायला लागणार नाही ते आपोआपच सुसंस्कारित होईल या अशा भावी पिढीचा राष्ट्रकार्यासाठी उत्तम उपयोग करून घेता येईल, आवर्जून संस्कार करण्याची गरजच भासणार नाही हे पण तितकेच खरे. तुम्हाला काय वाटतं? *आपली मुले हीच आपली खरी संपत्ती असतात.*
©मधुरा धायगुडे