कोतिव रंग काळा....!!
"एकमेकांत मिसळूनि बनतात रंग सारे
मग माझ्या तच हा भेदभाव का रे
मी काळा अशुभ म्हणूनि तर व्यापले जग सारे "
मकरसंक्रातीचे निमीत्त काळ्या रंगाचा मान वाढवते.
काळा रंग म्हणजे निषेध, काळा रंग म्हणजे अशुभ, काळा रंग म्हणजे नकारात्मकता नैराश्य दुष्टता कपट असे मानवी गुणांचेही वर्णन करुन दाखवणारा काळा रंग
पण संक्रांत हा असा एक सण आहे, ज्या दिवशी काळ्या रंगातील ड्रेस घाला नाहीतर साडी नेसा, कुणी काही म्हणत नाही. उलट काळा रंग कसा शोभून दिसतोय याचंच कौतुकच होत असतं
मग इतर वेळेस हा काळा रंग अशुभ कसा कारण काय असावा ह्यामागील कार्यकारण भाव खर तर हा शब्द खूप मोठा होईल पण मग इतर वेळेस हा काळा रंग अशुभ कसा अस मनात आलं ...मग काळ्या शार रंगाच्या भोवती मनातील हे प्रश्नचिन्ह ...??
पौराणिक आधार या दिवशी शनी महाराजांना भेटण्यासाठी रवि सूर्य जे त्याचे पिता आणि माता छाया येतात त्याचा अन् काळा रंग घालण्याचा आधार तर..
विज्ञानाच्या भाषेत काळा रंग उष्णता शोषून घेतो त्यामुळे शरीराचे तापमान कायम राखण्यास या थंडीत मदत होते म्हणून संक्रातीला काळ्या रंगाचे महत्व ..
विज्ञानाच्या अंतरंगात सप्तरंगाची छटा परावर्तित होते त्यात हा काळा रंग बेरंग म्हणून दिसत नसला तरी ...
हा काळा रंगच आपल्या अस्तित्वाची खरी पहिली ओळख ओळख आईच्या गर्भात असताना ह्या काळ्या रंगाचीच घट्ट मैत्री असते हे रंगबिरंगी जग बाहेर आल्यावर समजते.मग हा रंग अशुभ कसा... एवढेच नव्हे तर आपल्या ज्ञानग्रहणाची सुरुवात ही ह्या काळ्याशार रंगाने रंगवलेल्या पाटीने श्री या धुळाक्षराने होते ...शिक्षकांकडे दोनच रंग पांढरा खडू अन् काळा फळा यात अनेकांचे आयुष्य घडवण्याची ताकद असते तो हा काळा रंग ...... काळा रंग मानवी मनाचे अंतरंग श्रीराम श्रीकृष्ण सावळा विठुमाऊलीचा रंगही काळाच तरीही आषाढीकार्तिकेला त्या सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ असते ...अगदी आई जगदंबेची मूळ मूर्ती काळ्या पाषाणातीलच आपल्या ला श्रध्देने जवळ करतेच कि मग काळा रंग अशुभ कसा ...
सवाष्णीने काळ्या रंगाचे कपडे इतर शुभप्रसंगी होमहहवनाला अशी ही प्रथा वातावरणातील अग्नी प्रज्वलित केल्यामुळे उष्णता वाढलेली असते काळा रंग उष्णताग्राही असल्याने अशा रंगाची साडी अजून शरीराचे तापमान वाढवून त्रास होवू शकेल असाच अर्थ ही घेता येईल फक्त संक्रातीला मात्र या नववधू व बाळांसाठी हाच काळा रंग अन् त्यावर उठून दिसेल असा पांढरा रंग हलव्याचे दागिने रुपात घातला जातो हळदीकुंकू बोरन्हाण या समारंभात हे दिसून येते.म्हणजे अगदी निषेध ही ह्या काळ्या रंगाचा केलेला नाहीच त्यालाही इथे त्याचे स्थान आहेच .रात्री च्या अंधारात आकाशातले ते तारे काळ्याशार रंगावरच लुकलुकताना दिसतात त्या रात्री च्या अंधकारातच उद्याचा उःषकाल दडलेला काळ्या रंगाची महती सांगणारी अशी असंख्य उदाहरणे....
मानवी मनाची संवेदना जपणारा दुःखाच्या अंधारातून सुखाचे क्षणांची चाहूल देणारा ..प्रश्नचिन्हाला उत्तराची जोड मिळेपर्यत सोबत करणारा एखाद्या चित्रकाराच्या आर्त भावनेला सप्तरंगाकडे घेवून जाणारा असा हा काळा रंग शुभ कि अशुभ ??
अगदी काळ्या चंद्रकळेवर काव्य करताना समोर दिसतात तेच लुकलुकणारे तारे महाराष्ट्र ची महाराणी पैठणी वैविध्य रंगात खुलून दिसते तशीच ही काळी चंद्रकळा महाराष्ट्राची छोटी राजकन्याच म्हटले तर वावगे ठरणार नाही ...जी सौंदर्य खुलवते या संक्रातसणाचे असेही ..असा हा काळा रंग शनी ग्रहाची गंभीरता दर्शवणारा नैराश्यावर आनंदाची लकेर उत्पन्न करणारा तर संघर्षानंतरच्या विजयाची जाणीव करुन देणारा हा काळा रंग आयुष्याचा खरा मित्र...!!
अजूनही खूप लिहता येईलही..पण मनातील शब्दांनाही मर्यादा देणारा हा काळा रंगच.... करतो ही मनाची पाटी कोरी शब्दांना उधळून पुन्हा नव्याने... कोतिव असे कोरले जाणारे स्मरणीय मनातले शब्द पुन्हा शोध घेतात या काळ्या रंगाच्या साक्षीने मांडण्यासाठी .... ....!!
© मधुरा धायगुडे