Get it on Google Play
Download on the App Store

लेखिका मेधा इनामदार (पुणे) यांचा अभिप्राय

सायन्स फिक्शन म्हणजे विज्ञान कथा हा साहित्यातला अत्यंत कठीण प्रकार आहे. मराठी साहित्यात तर विज्ञानकथा लेखक अगदीच मोजके आहेत. श्री जयंत नारळीकर, श्री निरंजन घाटे यांच्यासारख्या काही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखकांनी विज्ञानकथा कादंब-या लिहिल्या आहेत.

 

विज्ञानकथा लिहिणं सोपं नाहीच. संपूर्णपणे काल्पनिक विश्‍व निर्माण करायचं परंतु त्या विश्‍वातली वास्तवाची जाणीवही हरवू द्यायची नाही हे विज्ञानकथेचं वैशिष्ठय असतं. आयझॅक असिमोव्ह, रॉबर्ट हेईनलीन आणि आर्थर सी क्लार्क हे त्या काळातले अत्यंत श्रेष्ठ असे विज्ञानकथा लेखक होते.  त्यांनी निर्माण केलेल्या "रोबो सीरीज" आणि काल्पनिक ब्रहमांड या वैज्ञानिक संकल्पना इतक्या वास्तव ठरल्या की आज खरोखरीच रोबो माणसाच्या मदतीसाठी तयार आहेत. विज्ञानकथालेखकांनी पाहिलली अनेक स्वप्नं आज प्रत्यक्षात आलेली आपण अनुभवतो आहोत.

 

लेखकाची दृष्टी अत्यंत विशाल असते आणि विज्ञान कथालेखकाची दृष्टी तर त्याहूनही विशाल.

 

श्री निमिष सोनार यांनी लिहिलेली डिटेक्टिव्ह निगेटिव्ह ही कादंबरी त्यांनी मला वाचायला दिली. 255 पानांची ही दीर्घ कादंबरी खरोखरीच आगळीवेगळी आहे. सुरुवातीपासूनच पकड घेणारी आहे.

 

एका सामान्य कुटुंबात जन्मलेला असामान्य सुनील कळतनकळत त्याच्यातील असामान्यत्व जाणून घेतो. वेगवेगळे अनुभव घेत मोठा होतो. आसपास असणा-या निगेटिव्हिटीची लाल वर्तुळं त्याला दिसतात आणि मग हळूहळू त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडू लागतात. वेगवेगळया मिती आणि त्या मितीच्या रंगिनीसारख्या आभासी आकृती त्याला भेटतात. सायलीसारखी विशेष शक्‍ती असलेली मेमरी डॉल त्याच्या आयुष्यात येते.  डॉक्टर नेत्रा, हाडवैरी, निद्राजीता यासारख्या पॉझिटिव्ह शक्तींचा एक ग्रुप आणि व्हायरसिक, डिश अँटिनाडू, राऊटरन, वायरफायर यासारख्या दुष्ट शक्तींचा एक गट यांच्यातील संघर्ष निमिष सोनार यांनी उत्तम रीतीने रेखाटला आहे. विचित्र आकाराचे कृत्रिम प्राणी पक्षी, हिप्नोटाईज करणा-या बाहुल्या, या सर्वच कल्पना मुळापासून वाचण्यासारख्या आहेत.

 

प्लॅनेट ऑफ डायमेन्शन ही अत्यंत आगळीवेगळी कल्पना निमिष यांनी 'घडवली' आहे. या विश्‍वात वेगवेगळया मिती आहेत. आणि त्या सर्व मितींचे ज्ञान अद्यापही शास्त्रज्ञांना झालेले नाही हे आज सत्य असले तरीही भविष्यात कधीकाळी प्लनेट ऑफ डायमेन्शनची आभासी दुनिया वैज्ञानिकांना सापडेलही!

 

प्रतिसृष्टी निर्माण करुन इथल्याच लोकांना गुलाम म्हणून घेअून जाणारा व्हायरसिक. त्यासाठी त्याची चालू असलेली धडपड आणि नायकासह सर्वांनी त्याच्यावर मिळवलेला विजय या भोवती रचलेली ही कादंबरी आहे. चांगल्या वाईट प्रवृत्तींचा संघर्ष आणि अखेर सुष्टांचा विजय ही नेहमीचीच कल्पना निमिष यांनी मोठया कल्पकतेने मांडली आहे. कथेतील प्रत्येक पात्राचं नावही त्यांनी मोठया खुबीनं आणि रंजकतेनं ठरवलं आहे. निद्राजीता, व्हायरसिक, रंगिनी, स्मृतिका, अँटिक्लॅप ही आणि या कांदबरीत वापरलेली सगळीच नावं त्या पात्राचं वैशिष्ठय अलगदपणे वाचकासमोर उभं करतात.

 

जलजीवा ही देखील एक नवीन संकल्पना त्यांनी 'घडवली' आहे. सागराच्या लाटांनी मानवी रुप घेऊन माणसांना संकटातून सोडवण्यासाठी मदत करणे ही कल्पनाही खूपच निराळी आहे. हे जलजीवा जल, बर्फ आणि वाफ या तीनही रुपांचा योग्य वेळी योग्य तसा वापर करु शकतात ही निमिष यांच्या विलक्षण कल्पनाशक्तीची प्रचीती आहे हे निश्‍चित!

 

अत्यंत गुंतागुंतीचा असा हा संघर्षाचा आणि विजयाचा खेळ निमिष यांनी सुंदर मांडला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! अनेक ठिकाणी विज्ञानविषयक संकल्पनाही त्यांनी सोपेपणाने समजावून सांगितल्या आहेत. त्यामुळे हा सारा लेखकाच्या कल्पनेचा खेळ असूनही वास्तवावर आधारित आहे असं वाटत राहतं आणि हेच या कादंबरीचं यश आहे. निमिष यांची भाषा सिनेमॅटिक आहे. वाचताना ते सारं काही प्रत्यक्ष समोर घडतं आहे असा भास वाचकाला होत राहतो.

 

आणखी एका गोष्टीबद्दल निमिष यांचे मनापासून कौतुक करावेसे वाटते की पुस्तकाचं आकर्षक मुखपृष्ठचित्र आणि त्याच्या अत्यंत नाविन्यपूर्ण जाहिरातीचे व्हिडीओही त्यांनी स्वतः बनवले आहेत. त्यामुळे पुस्तक वाचण्याविषयीची उत्सुकता नक्कीच जागृत होते.

 

एक चांगली कांदबरी विज्ञानविश्वाला दिल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन. आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा !

 

--- मेधा इनामदार, लेखिका

403, अ जे अँवहॅन्यू, कर्वेनगर, पुणे

फोन 9370063245

(पुरुषोत्तम, महाराणी पद्मिनी, सीमांत, किशोर कथा, गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद, सोनेरी परीकथा,  वैज्ञानिकांच्या कथा, आपली मुले आणि आपण यासारख्या अनेक पुस्तकांच्या चतुरस्त्र लेखिका)

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह

Nimish Navneet Sonar
Chapters
१: जन्मापासून सुरुवात २. जाणीव ३. सुगावा ४. ती दिसली ५. सायन्स फेस्टिव्हल ६. पुलावरचा घात ७. एक नवी सुरुवात ८. स्मृतिबंधन ९. पहिले प्रेम १०. ताकामिशी क्योदाई ११. दूरदर्शन १२. भटकंती १३. नरिमन टर्निंग पॉईंट १४. सुटका १५. संकट १६. तो आणि ती १७. प्रवास सुरू १८. जहाजावर १९. चाहूल २०. उलगडा २१. पाठलाग २२. परिवर्तन २३. सुपर नेचर कडे २४. सुपर नेचर २५. तयारी २६. वाईट हेतू २७. आव्हान २८. प्लॅनिंगचा मुखवटा २९. प्रस्थानम् ३०. पुन्हा पुलावरचा घात? ३१. दिसतं तसं नसतं ३२. शक्ती प्रदर्शन ३३. चकवा ३४. त्यांना आमंत्रण ३५. हाडाचा लढवैय्या ३६. नरिमन ऍक्शन पॉईंट ३७. तो येतोय ३८. युद्ध आमुचे सुरू ३९. प्लॅन्डी ४०. अपहरण ४१. गीता आणि नीता ४२. महायुद्ध ४३. वादळ शांत! लेखकाचे मनोगत लेखक परिचय प्रकाशनपूर्व आलेल्या इतर काही प्रतिक्रीया लेखिका मेधा इनामदार (पुणे) यांचा अभिप्राय राहुल दवे (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना अक्षर प्रभू देसाई (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना आदित्य भागवत, ठाणे यांचा अभिप्राय सिद्धेश प्रभुगांवकर, पुणे यांचा अभिप्राय