१२. भटकंती
त्या दिवशी घरी गेल्या गेल्या रात्री सगळे झोपल्यावर सुनिलला नवीन मिळालेली शक्ती वापरून पहायची इच्छा अनावर झाली. तो बरेचदा झोप येत नसली की गॅलरीत कानात हेडफोन लावून मोबाईलवर गाणे ऐकत बसायचा. तसाच आजही असेल म्हणून घरचे निवांत होते. तो बेडवरून उठून गॅलरीत आला. गॅलरीत नेहमी असणाऱ्या पोपटाची उणीव भासत होती. पिंजरा टांगलेल्या जागेकडे बघून तो क्षणभर अस्वस्थ झाला पण नव्या शक्तीला वापरून बघायची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. आहे त्याच जागेवरून त्याच्या दृष्टीला आता सगळी सृष्टी बघायला मिळणार होती. कुठे कुठे जाऊ आणि काय काय बघू असे त्याला झाले होते. घड्याळातील स्फटिकाला स्पर्श करून त्याने त्याच्या सर्व शक्ती कार्यरत केल्या. कुठे जाऊ? आकाशात? नको!आधी पृथ्वीवर काय काय असतंय ते तर बघतो, मग नंतर आकाश!
रात्रीचे अकरा वाजले होते. मनाच्या दृष्टीने विचार करत करत तो थोडे थोडे अंतर पुढे सरकू लागला. लोकल प्रवासाने वैतागून कामावरून घरी परतलेले थकलेले लोक दिसायला लागले. मात्र ही शक्ती वापरायची अजून सवय नसल्याने त्याच्या डोळ्यांवर प्रचंड ताण पडत होता. डोंबिवलीतील थिएटर्स, चहा दुकाने, गार्डन, भाजी मार्केट, कपड्यांची दुकाने, गणपती मंदिर, फडके रोड आणि त्यावर चालणाऱ्या तरुण मुली असे सगळे उभ्या उभ्या (घर बसल्या) बघतांना त्याला वेगळीच मजा येत होती. थोडे पुढे सरकून आता त्याची दृष्टी डोंबिवली स्टेशनवर आली, स्टेशनवरच रेंगाळली. स्टेशनवर एका प्लॅटफॉर्मवर एक जोडपे हातात हात घालून प्रेमाच्या गप्पा करत चालले होते. असाच कुणीतरी जोडीदार आता त्याला हवाहवासा वाटत होता. आतापर्यंत अभ्यास, जॉब आणि समाजसेवा करण्याच्या गडबडीत प्रेम करायचे राहूनच गेले होते. ते जोडपे निघून गेल्यावर दृष्टी शून्य नजरेने आपोआप रुळांवर स्थिरावली आणि तो विचार करू लागला. कॉलेजला असतांना एका मुलीकडे तो आकर्षित झाला होता आणि त्याने तिच्याशी मैत्रीही केलेली होती. पण ते फक्त तारुण्यसुलभ आकर्षण आहे की प्रेम आहे आणि सहजीवनाची ओढ आहे हे तो ठरवू शकत नव्हता आणि त्या मुलीकडूनही त्याला तसला काही प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नव्हते. त्यांचाही मित्रांचा ग्रुप असाच अनेकदा त्याच प्लॅटफॉर्मवरुन येजा करायचा तेव्हा हे दोघे ग्रुपच्या थोडे मागे चालत भान हरपून बोलत चालत राहायचे.अधूनमधून तो तिच्याशी फोनवर बोलायचा पण ते सहज मित्रांत असते तसे बोलणे असायचे. ती म्हणजे समिधा आणि तो हे इतर कॉलेज ग्रुप सोबत अनेकदा हॉटेलमध्ये जेवायला, चित्रपट बघायला जायचे. तिची आणि त्याची खाण्याची आणि चित्रपटांची आवडही बरीचशी सारखीच होती हेही त्या दोघांच्या लक्षात आले होते. बऱ्याच सामाजिक समस्यांवर आणि बातम्यांवर जेव्हा चर्चा व्हायची तेव्हाही त्यांचे विचार जुळायचे! आता समिधा काय करते आहे हे चेक करून बघायचा विचार त्याच्या मनात आला आणि ती ज्या उपनगरात राहते तिकडे दृष्टी वळवून आपण तिच्या घरात आपल्या "दूर" दृष्टीने शिरायचे का, तसे करता येईल का? अशा विचारांत असतांनाच समोरच्या रुळांवरून सीएसटीकडून आलेली एक एक्सप्रेस तुफान वेगाने सुनिलच्या एकदम डोळ्यांवरच आली, त्या इंजिनच्या आवाजाने तो दचकला आणि विचारांची तंद्री भंग पावून तो गॅलरीत उभ्या उभ्याच मागे धडपडला, त्याचा पाय रोपाच्या कुंडीला लागला आणि त्यात पाय अडकून धडपडून तो मागे लाकडी फळीवर पडला आणि ती फळी बाजूला पडून मोठा आवाज झाला आणि घरचे जागे झाले!!
तो पटकन भानावर येऊन टी शर्ट आणि पॅन्ट झटकत सावरत उठून उभा राहिला, फक्त थोडेसे खरचटले होते. त्याचे डोळे मात्र प्रचंड दुखत होते, थोडे सुजले होते. ही नवी 'दूरदृष्टी' देणारी शक्ती वापरणे वाटते तितके सोपे काम नाही याची जाणीव त्याला झाली!
आई गॅलरीत आली, "काय झालं बाळा, कसा काय पडलास?"
"काही नाही आई, असच सहज!"
"असंच, सहज? तरी मी नेहमी सांगते की कानात हेडफोन अडकवून चालत जाऊ नकोस, एके ठिकाणी उभा राहत जा किंवा खुर्चीवर बसून राहत जा, ऐकत नाही!"
"आता मी ऐकेल आई, झोप आता तू!"
तो घरात आला आणि त्याच्या बेडवर झोपला. ही शक्ती आता पुन्हा त्याला दिवसा वापरून बघायची होती. समिधाच्या मनात त्याच्याबद्दल काय आहे हे सुद्धा त्याला आता पडताळून बघण्यासाठी त्या शक्तीचा प्रयोग करायचा होता, पण...!!
^^^