Get it on Google Play
Download on the App Store

३२. शक्ती प्रदर्शन

सुनिलच्या प्लॅन नुसार निद्राजीता आणि मेमरी डॉल या दोघी जणी काही स्वागत फायटर्स सोबत एका प्रवासी विमानाने लोहगांव विमानतळावरून मुंबईला रवाना झाले होते. त्यांना सुनिलने एक महत्त्वाचें काम दिले होते.

 

विमानतळावरून जी स्वागतची गाडी मुंबईसाठी रस्त्याने निघाली होती त्यात स्वागतच्या इतर दोन नेहमीच्या लेडीज फायटर होत्या. त्या दोघी जणी निद्राजीता आणि मेमरी डॉल नव्हत्या. त्यांच्यासोबत दोन आणखी स्वागत फायटर्स होते जे गार्ड च्या वेशात होते. फिमेल फायटर 1, 2  (FF1, FF2) आणि मेल फायटर 1, 2 (MF1, MF2). दोन्ही फिमेल फायटरनी निद्राजीता आणि मेमरी डॉलचा वेष घेतला होता.

 

एक मजबूत बांधणीची बाईक खडकी पासून त्या चौघांच्या मजबूत काळ्या निळ्या रंगाचे पट्टे असलेल्या कारचा संशय येणार नाही अशा प्रकारे अंतर ठेऊन पाठलाग करू लागली. बाईकवर मास्क घातलेले दोन जण बसले होते, दोघांनी मास्क सारखे वाटणारे हेल्मेट घातले होते ज्यातून त्यांचे फक्त डोळे दिसत होते आणि संपूर्ण शरीरावर मजबूत काळा कोट घातला होता. मागे बसलेल्या माणसाच्या हातात एक उपकरण होते ज्यात विविध लाईट्स ऑन ऑफ होत होते. त्याला एक जॉय स्टिक होती जी 360 डिग्री अँगलने फिरू शकत होती तसेच चार दिशांची चार बटणे होती आणि एक मोठे लाल बटन होते. ते उपकरण त्या माणसाने त्याच्या कोटाच्या आतमध्ये लपवले होते जेणेकरून ते कुणाच्या नजरेस पडू नये.

 

कार दृष्टीच्या टप्प्यात आल्यावर बाईकवरच्या मागच्या माणसाने एक बटन दाबले आणि बाईकच्या खालच्या बाजूचे काही कप्पे दोन्ही बाजूंनी उघडले आणि डाव्या उजव्या बाजूने एकेक यांत्रिक कुत्रा बाहेर पडला. दोन्ही कुत्रे बाईकच्या दिशेने पुढे वेगाने धावायला लागले.

 

त्यांच्यावर खऱ्या कुत्र्यांसारखे आवरण असल्याने ते खरे कुत्रेच वाटत होते. त्यांच्या हालचाली नीट बारकाईनं बघितल्या तरच समजू शकत होते की ते यांत्रिक कुत्रे आहेत. ते कुत्रे वेगाने कारचा पाठलाग करायला लागले. आता त्यांच्याशी स्पर्धा करायला चित्ता असता तरीही त्याला या दोघांनी मागे टाकले असते.

 

मागच्या व्हीडिओ कॅमेऱ्यातून चौघांना दिसले की दोन कुत्रे अमानवीय (की अप्राणीय?) वेगाने त्यांचा पाठलाग करत आहेत तेव्हा -

MF1: "मला वाटते हे कुत्रे खरे नाहीत. एक तर ते यांत्रिक असावे नाहीतर मानवी मेंदू असलेले पुनर्निर्मित प्राणी असावेत.

MF2: "मला पण त्यांच्या वेगामुळे त्यांच्यावर संशय येतोय की ते खरे नाहीत! नाहीतरी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा हल्ला आपल्यावर होणार हे आपण गृहीत धरले होतेच! आणि खरं सांगू का? आम्ही दोघे मूळचे पुण्यातलेच. लहानपणी याच रस्त्यावर मी स्कुटरने जायचो तेव्हा खऱ्या कुत्र्यांचा घोळका वेगाने मागे पाळायचा तेव्हा भीतीने अशी गाळण उडायची की काय सांगू?"

 

दोन्ही FF पैकी FF2 (मेमरी डॉलची डुप्लिकेट) कार चालवत होती आणि FF1 (निद्राजीताची डुप्लिकेट) पुढे तिच्या बाजूला बसली होती. FF1 म्हणाली, "आम्ही दोघीजणी मुंबईच्या! आणि एकमेकांच्या मैत्रिणी! तुम्हा दोघा MF सोबत प्रथमच आम्हाला काम करायला मिळतंय हे आमचं भाग्य. तुमचं दोघांचं नाव खूप ऐकलंय, त्या मानाने आम्ही ज्युनिअर आहोत पण स्वागत मध्ये जॉईन होण्याआधी मुंबईत आम्हीसुद्धा पालिस कॅम्पमध्ये खूप काळ ट्रेनिंग घेतलंय. त्यामुळे आता तुम्हा दोघांना आम्ही चांगली साथ देऊ! आणि बाय द वे, आम्ही लहानपणी असल्या कुत्र्यांना काय करायचो माहितीये? स्कुटरचा वेग कमी करून एक पाय जमिनीवर टेकवत राहायचो आणि दुसऱ्या पायांच्या सॅंडलची जोरदार लाथ कुत्र्यांना मारायचो, मग ते भेलकांडत भेलकांडत वुई वुई कुई कुई ओरडत रस्त्याच्या कडेला जाऊन आदळायचं. सॉलिड मजा यायची!"

 

FF2, "हो ना. असे नाही केले तर आपलीच स्कुटर सटकून आपण रस्त्यावर पडून अपघात होण्याची आणि जीवावर बेतण्याची शक्यता असते!"

 

ते कुत्रे प्रचंड वेगाने पाठलाग करतच होते.

MF1, "कुत्र्यांना गती आणि मूर्खांना प्रगती सहन होत नाही असे मी कुठेतरी ऐकले होते. आजपर्यंत भटक्या कुत्र्यांनी अनेक लहान मुलांना जखमी केले आहे!"

MF2, "महापालिकेने ठोस पावले उचलली पाहिजेत यांच्यासाठी नाहीतर..."

FF1, "महापालिकेचं सोड रे, या दोन कुत्र्याचं आपण काय करायचं ते ठरवा आधी नाहीतर..."

 

एवढ्यात कारचा वरच्या बाजूला हातोडा आपटल्यासारखा आवाज आला. तिघांनी दचकून वर पाहिले. दोन पैकी एक यांत्रिक कुत्रा उडी मारून गाडीच्या वर चढला होता आणि गुरगुर करत आपल्या तीक्ष्ण दातांनी गाडीला छतावरून छिद्र पडण्याचा प्रयत्न करत होता.

 

FF2 ने गाडी उजवीकडे डावीकडे वळवून गाडीला हेलकावे देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तो कुत्रा गाडीवरून खाली पडेल परंतु तसे झाले नाही कारण त्या कुत्र्याची चारही पाय गाडीला चुंबकासारखे चिटकले होते पण कारच्या नागमोडी हालचालीने ट्रॅफिकला अडथळा येऊन दोन रिक्षावाले त्या कार वर जाम चिडले. त्यांनी कार वर चाललेला एकंदरीत प्रकार पाहून ट्रॅफिक पोलिसांना फोन केला.

 

FF2 ने विमानतळावर डिटेक्टीव निगेटिव्हला फोन केला आणि म्हणाली, "सुनिल, इकडे आमच्यावर यांत्रिक कुत्र्यांचा हल्ला झालाय. न्यूज चैनल वाल्यांना ब्रेकिंग न्यूजची गरज आहे. पाठवा त्यांना. जगाला दिसू द्या. वाईट टीमला वाटत राहील की त्यांनी स्वागतच्या चार एजंटपैकी आणखी दोघांवर हल्ला केला आहे. न्यूज चॅनलवालेसुद्धा हेच सगळीकडे दाखवत राहतील. तेवढेच तुम्हा चौघांना तुमचे काम गुप्तपणे करायला उसंत मिळेल! तसेच तुझे तिकडचे काम झाले असेल तर इकडे आम्हाला ट्रॅफिकमध्ये शोधून दे नेमके या कुत्र्यांना ऑपरेट करणारे कोण आहेत ते?"

 

"सुनिलची दृष्टी इतर एका पाठलागात बिझी आहे. तोपर्यंत तुम्ही मॅनेज करा! बाकीचं न्यूज चॅनेलचं काम मी करतो", असे म्हणून हाडवैरीने विमानतळावरील अधिकाऱ्यांना सांगून न्यूज चैनल वाल्यांना आणि पोलिसांना फोन करायला सांगितले. सुनिलचा फोन हाडवैरीने घेतला होता कारण सुनिलची दृष्टी बिझी होती.

 

यांत्रिक कुत्र्याने गाडीचे टणक छत तीक्ष्ण दातांनी फोडले आणि तो त्याचा चेहरा आत मध्ये घालून गुरगुरू लागला. त्याचा जबडा MF1 ने दोन्ही हातानी धरला. चौघांनी संरक्षक पोषाख घातलेले होते तसेच हातमोजे घातले होते.

 

आसपासची ट्राफिक थांबवण्याचा प्रयत्न ट्राफिक पोलिस करत होते परंतु तेवढे सोपे नव्हते. शहर पोलीस अजून तिथे पोहोचणे बाकी होते परंतु संचेती हॉस्पिटलमधून परत निघालेल्या न्यूज चॅनल्सच्या व्हॅन्स आता तिथे पोचल्या आणि लाईव्ह शूटिंग करू लागल्या.

 

"अनघा, काय सांगशील? काय परिस्थिती आहे तिथे?"

"बघ ना किशोर! स्वागत टीमने या मोहिमेसाठी पाठवलेल्या चार जणांपैकी थोड्या वेळापूर्वी त्यांचा प्रमुख डिटेक्टिव्ह निगेटिव्ह जखमी झाला तो सध्या हॉस्पिटलमध्ये आहे, आणि त्यापैकी दोन लेडीज ज्या मुंबई चालल्या होत्या आता त्यांच्यावर हल्ला झाला आहे! एक आहे निद्राजीता आणि दुसरी मेमरी डॉल."

"अनघा, कॅमेरामन आणि तू थोडी दूर राहून शूटिंग कर!"

"कि कि किशोर का का काळजी करू नकोस. आम्ही का का काही अंतर राखून मग शू शू शूटिंग करत आहोत!", अनघा घाबरली होती.

"सध्या काय दिसते तुला अनघा तिथे?"

"किशोर एक भव्य कु कु कुत्रा त्या कारच्या टपावर चढला आहे आज त्याने गाडीचे छत फ फ फोडले आहे आणि आपला जबडा मध्ये घा घा घातला आहे! तो कुत्रा नक्कीच साधा कुत्रा नाही यांत्रिक कुत्रा असावा! त्याच्या अंगातून ठी ठी ठी .... ठिणग्या उडत आहेत."

"हे बघतांना तुझ्या मनात काय भ भ भावना आहे अनघा?", तिची बघून त्याचीही त त फ फ होऊ लागली.

"कि की ... किशोर! मला आता एकच वाटते आहे की अशा का का कामांसाठी तू फिल्डवर येत चल आणि मी तिथे स्टुडिओत ब ब बसून बातमी देत जाईन आणि तुझ्याकडून लाईव्ह अपडेट घेत जईन! हे असलं भ भ भयंकर झेपत नाही मला आता!"

किशोरची बोबडी वळलेलीच राहिली. तो म्हणाला," ठ ठ  ठीक आहे अनघा, प प पुढच्या वेळेस मी ज ज जाईन नक्की! डील!"

 

MF1 ने कारच्या छतावरील छिद्रातून तो जबडा वर ढकलला कारण तो कुत्रा आतमध्ये ओढला जात नव्हता. संपूर्ण ताकदीने तो जबडा वर ढकलून मग त्यातून MF1 कारच्या छतावर आला आणि त्या पाठोपाठ FF2 (निद्राजीताची डुप्लिकेट) छतावर चढली. ती कार नेहमीच्या कार पेक्षा भव्य आणि लांब होती. तिने जवळ असलेले दोन लोखंडी हातमोजे MF1 ला दिले आणि दोन स्वतः घातले.  आता निद्राजीता पूर्ण ताकदीने त्या कुत्र्याशी लढू लागली. त्याच्यातून अधून मधून ठिणग्या निघत होत्या आणि त्याची नकली त्वचा काही भागांत फाटून गळून पडत होती. त्या कुत्र्याने MF1 ला आलिंगन दिल्यासारखा विळखा घातला. MF1 भांबावला आणि त्याचा तोल जाऊन तो कारवरून रस्त्यावर पडता पडता वाचला. तोपर्यंत दुसरा कुत्रा वेगाने कारच्या पुढे आला आणि समोरच्या काचेवर त्याने धडक मारली आणि काच फोडण्याचा प्रयत्न करू लागला जेणेकरुन FF1 ला पुढचे दिसू नये.

 

पोलीस नेम धरून दोन्ही कुत्र्यावर स्टेनगनने गोळी मारण्याचा प्रयत्न करत होते पण वेगाने हालचाल होत असल्याने आणि इतर नागरिक किंवा चौघे स्वागत टीम मेंबर्स ला इजा होऊ नये याची खबरदारी घ्यावी लागत होती त्यामुळे ते अजून गोळी मारू शकले नव्हते. तसेच रस्त्यावरच्या ट्राफिक मध्ये नेमकं कोण आणि कोणत्या वाहनातून यांत्रिक कुत्र्यांना ऑपरेट करतंय हे ओळखणं अशक्य होतं. कारच्या मागून येणारी सर्व ट्राफिक रोखली तर? तर मग कुत्र्याशी रिमोटचा संपर्क तुटेल पण नेमके रिमोट ऑपरेट करणारे लोक कसे शोधणार? ट्राफिक थांबवल्यावर ते उलट्या मार्गाने निघून गेले तर? किंवा त्यांनी रिमोट कुठे फेकून दिले आणि नष्ट केले तर? तर ते पकडले जाणार नाहीत. आणि अशा प्रत्येक हल्ल्याच्या वेळेस ट्राफिक अडवत बसले तर गोंधळ होईल.

 

विमानतळावर सुनिल त्या माणसाचा पाठलाग करत होता तोपर्यंत टिव्हीवरचे यांत्रिक कुत्र्यांचे लाईव्ह प्रक्षेपण बघून हाडवैरी विचार करत होता, "जर परिस्थिती त्या चौघांच्या नियंत्रणात नाही आली त्या मला बचावासाठी जावे लागेल!"

 

FF1 कार चालवतांना काचेतून समोरचे न दिसल्याने सुरुवातीला भांबावली पण तिने पुढचा एक इमर्जन्सी कॅमेरा ऑन केला आणि त्यातून ती पुढे बघून कार चालवू लागली. तेवढ्यात त्याने गाडीचे वायपर पुढच्या पायांनी तोडून टाकले. कार वेगाने धावतच होती. FF2 ने आपला हात संपूर्ण ताकदीने MF1 ला विळखा घातलेल्या कुत्र्याच्या जबड्याच्याआत घातला आणि त्याच्या आतमध्ये असलेल्या वायरी आणि इलेक्ट्रॉनिक सामान ओढून बाहेर काढले. त्यामुळे त्याची पकड ढिली झाली आणि तिने त्या कुत्र्याचे चारही पाय आपल्या एकाच हातात धरले आणि शेपटी दुसऱ्या हातात धरली. दरम्यान MF1 ने काचेवरचा कुत्रा काच फोडण्याच्या बेतात असतांना, त्या आधीच पूर्ण ताकदीने वर ओढला.

 

दरम्यान सुनिलने त्या माणसाचा दृष्टीने पाठलाग थांबवला आणि दृष्टी या घटनेकडे वळवली. त्याला थोड्याच वेळात गर्दीत बाईकवरचे कुत्रे ऑपरेट करणारे दोघेजण दिसले कारण त्यांच्या डोक्यावर प्रखर ज्वालाचे लाल वर्तुळ होते. नंतर दृष्टी कोटाच्या आतमध्ये नेऊन त्याला ते रिमोट दिसले. हे हाडवैरीला सांगून सुनिल पुन्हा त्या मनपा जवळच्या माणसाचा पाठलाग करू लागला. हाडवैरीने कॉल करून त्या बाईकचे वर्णन FF1 ला सांगितले. FF1 ने हा निरोप गाडीच्या छताला पडलेल्या छिद्रातून मोठ्या आवाजात छतावरच्या दोघांना सांगितला. हाडवैरीने हाच निरोप पोलिसांना कॉल करून पण सांगितला. कारच्या छतावरील दोघांनी दोन्ही कुत्र्यांना शेपटी धरून गोल फिरवले आणि सरळ गर्दीतील त्या बाईकवर जोराने भिरकावले. बाईकवर ते दोन्ही कुत्रे एकापाठोपाठ आदळले आणि बाईकचा तोल जाऊन दोघेजण खाली पडले. इतर वाहने बाजूला होऊन थांबली. कुत्रे बाईकवर आदळून बाईकचा प्रचंड स्फोट झाला. रस्त्यावर खराब होऊन पडलेले रिमोटकडे बघत जखमी अवस्थेत भांबावलेले ते दोघे उठून पळू लागले कारण त्यांना हे कळत नव्हतं की त्यांचा पत्ता गाडीवरील दोघांना लागला कसा?

 

जवळच मुंबईला जाणारा रेल्वे ट्रॅक होता, एक ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली होती, वेगाने पळत पळत ते दोघे त्या ट्रेन ला जाऊन लटकले. पोलिसांनी त्यांची व्हॅन बाजूच्या रोडने त्या ट्रेनला समांतर चालवायला सुरुवात केली. त्यांच्या मागोमाग चौघे स्वागत फायटर्सची गाडी जाऊ लागली. गाडीच्या छतावर FF2 अजूनही उभी होती. जमलं तर त्या ट्रेनच्या डब्याला लटकलेल्या दोघांच्या अंगावर उडी मारून त्यांना खाली जमिनीवर पडता यईल का या शक्यतेचा ती विचार करत होती.

^^^

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह

Nimish Navneet Sonar
Chapters
१: जन्मापासून सुरुवात २. जाणीव ३. सुगावा ४. ती दिसली ५. सायन्स फेस्टिव्हल ६. पुलावरचा घात ७. एक नवी सुरुवात ८. स्मृतिबंधन ९. पहिले प्रेम १०. ताकामिशी क्योदाई ११. दूरदर्शन १२. भटकंती १३. नरिमन टर्निंग पॉईंट १४. सुटका १५. संकट १६. तो आणि ती १७. प्रवास सुरू १८. जहाजावर १९. चाहूल २०. उलगडा २१. पाठलाग २२. परिवर्तन २३. सुपर नेचर कडे २४. सुपर नेचर २५. तयारी २६. वाईट हेतू २७. आव्हान २८. प्लॅनिंगचा मुखवटा २९. प्रस्थानम् ३०. पुन्हा पुलावरचा घात? ३१. दिसतं तसं नसतं ३२. शक्ती प्रदर्शन ३३. चकवा ३४. त्यांना आमंत्रण ३५. हाडाचा लढवैय्या ३६. नरिमन ऍक्शन पॉईंट ३७. तो येतोय ३८. युद्ध आमुचे सुरू ३९. प्लॅन्डी ४०. अपहरण ४१. गीता आणि नीता ४२. महायुद्ध ४३. वादळ शांत! लेखकाचे मनोगत लेखक परिचय प्रकाशनपूर्व आलेल्या इतर काही प्रतिक्रीया लेखिका मेधा इनामदार (पुणे) यांचा अभिप्राय राहुल दवे (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना अक्षर प्रभू देसाई (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना आदित्य भागवत, ठाणे यांचा अभिप्राय सिद्धेश प्रभुगांवकर, पुणे यांचा अभिप्राय