२४. सुपर नेचर
सुपर नेचर बेट म्हणजे पृथ्वीचा असा भाग होता की जिथे निसर्गाचे आणि विज्ञानाचे नियम थोडे वेगळे होते आणि काही नियम वैज्ञानिकांनी वाकवले होते. जसे की तेवढ्या भागात सगळीकडे असणाऱ्या सजीव आणि निर्जीव गोष्टींवरून परावर्तित होणारी किरणे ही परावर्तित झाल्यावर कमजोर होतील अशी त्यावर प्रक्रिया केलेली होती. ही प्रक्रिया तिथे असलेल्या विशिष्ट मॅग्नेटिक फिल्ड मुळे शक्य होती. म्हणजे ती किरणे परावर्तित झाल्यावर फारच थोडे अंतर कापू शकत होती आणि प्रवास करून ठराविक अंतरावर थांबत होती आणि त्यापेक्षा दूर अंतरावरील इतर कुणा माणसाच्या डोळ्यांपर्यंत किंवा कोणत्या कॅमेऱ्यापर्यंत पोहोचतच नव्हती. म्हणजे त्या बेटाभोवती जणू काही एक अर्धवर्तुळाकार असे अदृश्य कवच तयार झाले होते ज्या कवचाच्या आत काय आहे हे कवचाच्या बाहेरून कुणालाही दृष्टीस पडणे शक्य नव्हते.
त्या अर्धागोलकार अंतरापर्यंत येऊन थांबलेल्या किरणांच्या तयार झालेल्या पातळीवरून मग आजूबाजूच्या समुद्राच्या पाण्यावरून परावर्तीत होऊन आलेले किरण मग इतरांच्या दृष्टीस पडत. म्हणजे बेटाच्या ठिकाणी समुद्राचे पाणीच आहे असे दिसायचे पण जणू काही एखाद्या भिंगातून तेवढ्या समुद्रात आपण बघतोय असे वाटायचे. मात्र बेटावर आत असणाऱ्यांची दृष्टी बाहेर जाण्यात काही अडचण नव्हती कारण त्या अर्धगोलाकार आवरणाबाहेरील कोणत्याही वस्तूंवर पडून परावर्तित झालेली किरणे बेटावर असलेल्या लोकांच्या डोळ्यांपर्यत पोहोचण्यास काही अडचण नव्हती.
तसेच बेटावरच्या विशिष्ट नैसर्गिक आणि वैज्ञानिक वातावरणामुळे बाहेरची रडार वेव्हज येथे प्रवेश करू शकत नव्हती. ती वेव्हज त्या विशिष्ट अर्धगोल वातावरणात शिरली की इतकी कमजोर होऊन जात की पुन्हा वेव्हज पाठवणाऱ्या उपकरणाकडे परत पोहोचूच शकत नव्हते. जरी एखाद्या बॉम्ब किंवा तत्सम वस्तूचा काही कारणास्तव हल्ला झालाच तर अर्धगोल अदृश्य कवचावर ते आपटून हवेतच नष्ट होऊ शकेल अशी व्यवस्था होती. त्या अदृश्य कवचाचा खालचा समुद्राजवळाचा काही भाग टीमचे जहाज आले की फक्त तिथल्या यंत्रणेद्वारे मोकळा करता यायचा आणि जहाज आत गेले की बंद व्हायचा. इतर जहाज वेगाने आले तर ते कवचावर आदळले जाऊन नष्ट होत. स्वागत टीमचे कम्युनिकेशन गॅजेट्स ज्या टेलिकॉम वेव्हज वापरत होत्या त्या मात्र त्या अर्धगोल कवचातून आरपार जाऊ शकत होत्या. थोडक्यात एका अर्धगोल अदृश्य कवचाच्या आत हे बेट सुरक्षित होते आणि अदृश्य होते.
या बेटावरील तंत्रज्ञ टीम आता टीमसाठी वेगळ्या धाटणीची, सुरक्षित आणि विविध यंत्रणांनी सज्ज अशी दोन हेलिकॉप्टर्स बनवण्यात व्यस्त होती. या बेटावर नैसर्गिक नियम पण बदललेले होते जे वनस्पती, प्राणी, कीटक, जीव जंतू, जलचर प्राणी वगैरे सगळ्यांना लागू होते. जसे की या बेटावर प्रत्येक जीव जंतूंच्या जगण्याचा कालावधी इतर जगापेक्षा जवळपास दुप्पट होता. इथली संपूर्ण हवा शुद्ध होती. इथे जवळपास जगातील सर्व प्रकारचे प्राणी आणि सर्व प्रकारची झाडे, वनस्पती उगवत होती आणि वाढू शकत होती कारण इथे असलेल्या वातावरणातील हवेत एक आणखी असा एक पोषक तत्व असलेला वायू होता जो संपूर्ण पृथ्वीवर कुठेही आढळून येत नव्हता. त्याचे नाव होते किर्मोटो.
त्या बेटावर असलेल्या छोट्या नद्या, तलाव, तळे यात असलेले पाणी वेगळ्याच गुणधर्माने युक्त होते. ते पाणी कधीही दूषित किंवा अशुद्ध होत नव्हते. समुद्राचे पाणी विशिष्ट चॅनेलद्वारे थोडे थोडे या बेटावर येऊ दिले जात होते आणि ते या बेटावर आले की इथल्या वातावरणाने शुद्ध होत होते. किर्मोटो वायूमुळे आणि इतर शुद्ध वातावरणामुळे तिथे अशा काही वनस्पती आणि झाडे उगवायची ज्यांची फळे एकदा खाल्ली की त्यातून आठ दिवस पुरतील अशी शरीराला आवश्यक अशी पोषक तत्वे मिळत. मग आठ दिवसानंतरच भूक लागत असे. तसेच तिथल्या तळ्यातील वेगळे असे अतिशुद्ध पाणी ग्लासभर पिले तरी पुढील आठ दिवस शरीरातील पाण्याची गरज भागत असे. त्या पाण्याला ते अमूर्तजल म्हणत. तिथे रबरसारखा लवचिक आणि काचेसारखा पारदर्शक धातू पृथ्वीच्या पोटात सापडायचा ज्याचे नाव होते झिरकोडीयम! तो द्रव आणि वायू मध्येही रुपांतरीत करता यायचा.
येथे जगभर असलेल्या सर्व प्राणी पक्षी कीटक जलचर तसेच वनस्पती यांना पोषक वातावरण तर होतेच पण जगात इतरत्र कुठेही न आढळणाऱ्या अशा अनेक वनस्पती आणि प्राण्यांचे प्रकारही होते. त्यांच्यासाठी इथे एक वेगळा अभयारण्यासारखा भाग आरक्षित होता. तिथे ते सगळे गुण्या गोविंदाने रहात होते. इथे असलेल्या अनेक छोट्या मोठ्या पर्वतांच्या आतमध्ये कित्येक नैसर्गिक गुहा होत्या. त्यापैकी काही गुहांमध्ये अनेक वैज्ञानिक आपल्या सुसज्ज प्रयोगशाळेत विविध प्रयोग करायचे. अर्थात तेथील निसर्गाला काही इजा पोहोचू नये याची ते दक्षता घेत असत.
तिथे वडासारखी दिसणारी पण वडापेक्षा प्रचंड मोठा आकार असलेली झाडे होती. त्यावर नैसर्गिकरित्या ट्रीहाऊसेस तयार झाली होती. त्यातच आणखी बदल करून तिथे असणारी सर्वजण राहत होती.
आता जहाजवरून आलेले सर्वजण रिकाम्या असलेल्या ट्रीहाऊसेस मध्ये राहणार होते. त्या बेटावर अनेक ट्रीमॅन म्हणजे झाड मानव रहात होते! त्यांना कुणी या बेटावरचे नियम तोडतांना आढळले तर ते मानवांना वेगवेगळ्या शिक्षा करायचे.
ही आणि आणखी अशी अनेक आश्चर्ये त्या बेटावर चौघांची वाट बघत होती. त्यांच्या मनात अनेक प्रश्नांची मालिका तयार होत होती. तसेच जगभर घडत असलेल्या घटनांबद्दल मनात संभ्रम होता आणि मानवतेला त्यापासून वाचवण्याची जबाबदारी त्यांचेवर आलेली होती.
^^^