Get it on Google Play
Download on the App Store

१४. सुटका

 

रात्री झोपण्यापूर्वी सहज चॅनेल बदलले असता सेट मॅक्सवर "जानी दुश्मन- एक अनोखी कहानी" सुरु होता आणि गुहेत तपस्या करत असलेल्या अमरीश पुरीच्या नकळत मनीषा कोईराला आणि अरमान कोहली हे प्रेमात धुंद होऊन गुहेच्या छतावर जोराजोरात पाय आपटत नाचत होते आणि गाणे म्हणत होते- "जिंदगी मैं तुझी पे लुटाऊंगा, मैं तो मर के भी तुझको चाहूंगा, आजा ओ sss आजा!" नंतर गुहेला छतावर मोठे भगदाड पडते आणि ते दोघे अमरीश पुरीच्या अंगावर पडतात मग तो त्यांना शाप देतो आणि त्यांची ताटातूट होते मग पुनर्जन्म वगैरे!

उदित नारायणच्या दर्दभऱ्या आवाजाने भारलेलं ते गाणं ऐकून सायलीला सूर्यप्रतापसोबत घालवलेले क्षण आठवले, तिचे मन अचानक मागचे सगळे आठवून नकारात्मक विचारांकडे ओढले गेले.  तिने रिमोटने टीव्ही तडकाफडकी बंद केला आणि डोके दाबून धरले, "ओह गॉड! काय हे? हे बॉलिवूडवाले प्रेमकथांवर वर्षानुवर्षे असंख्य चित्रपट बनवतच राहतात, आणि प्रेमभंग झालेल्यांच्या जखमांच्या खपल्या निघतील अशी दर्दभरी गाणी बनवतच राहतात!"

 

"झोपेच्या गोळ्या खरं तर मी टाळायला हव्या. मी डॉक्टर आहे, त्याचे दुष्परिणामही मला माहिती आहेत. मी त्या घेणे टाळत आले असले तरीही आता मला वाटतंय की त्या घ्यायला हव्यात!"

 

तिने ड्रावरकडे हात नेला आणि ते ओढायला लागली तेवढ्यात तिचे हात हलके झाले आणि हळूहळू तळहात, पंजे, मनगट हलके व्हायला लागले आणि त्याजागी तिला हिरव्या रंगाचे 0 आणि 1 हे बायनरी आकडे दिसायला लागले. तिचे शरीर संपूर्णपणे हलके पोकळ होत जाऊन काळसर पार्श्वभूमीवर हिरवे 0 आणि 1 हे असंख्य आकडे  खालून वर, वरून खाली, आणि इकडून तिकडे असे पाण्यासारखे वाहत होते. समोर हातात एक बाहुली घेतलेली आणि असंख्य मेमरी कार्ड्स, हार्ड डिस्क, मॅग्नेटिक टेप्स, मेंदूतील नसा आणि विविध भाग, न्यूरल नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट यासारख्या अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम मेमरी स्टोरेज डिव्हाईसने बनलेली नग्न स्त्री आकृती उभी होती. आणि आजूबाजूला सगळीकडे फक्त विविध अक्षरे, आकडे तरंगत होती.

 

"काळजी करू नकोस, तुझ्या न विसरण्याचा समस्येचे समाधान माझ्याकडे आहे! मी आहे मेमरी डायमेंशन किंवा स्मृती मिती जीव किंवा स्मृतिका!"

 

जसे सुनिलला मिती जीव म्हणजे काय याबद्दल रंगमितीने समजावून सांगितले होते तसेच सायलीलाही तिच्या या मितीने सगळे समजावले. सायलीने नंतर तिची थोडक्यात कथा तिला सांगितली आणि सूर्यप्रतापकडून प्रेमात मिळालेला धोकाही सांगितला.

 

"तुला विसरायचे आहे ना ते?"

"होय, अगदी उतावीळपणे विसरायचे आहे!"

"मग ऐक, तुला मी नवीन शक्ती देते. ती कोणती आणि कशी काम करेल त्या आधी तुला काहीतरी सांगणे आवश्यक आहे!'

"काय?"

"तुला जन्मापासूनच्या सगळ्या गोष्टी चिरकाल आठवतच राहतील हे नक्की पण मेंदू हा आकारानुसार शेवटी कधीतरी फुल होईलच किंवा भरून जाईल. त्याला अजून वेळ आहे पण नको असलेल्या गोष्टी कशा काढून टाकायच्या हे तुला आता शिकवलेच पाहिजे नाहीतर ऐन वेळी कुठेही कधीही तुझी मेमरी फुल झाली तर तुझ्या मेंदूतील नैसर्गिक RAM (वर्तमानकाळातील घडत असलेल्या गोष्टींसाठी कार्यरत असलेली तात्पुरती मेमरी) आणि ROM (कायमचा साठा) या दोन्ही फुल होऊन तू हँग होशील, कॉम्प्युटर होतो तशी! असं झालं तर कदाचित तुझा मृत्यू ओढवू शकतो!"

"बापरे, कठीण आहे! मग उपाय काय?"

"ही मेमरी डॉल किंवा डेटा डॉल घे", असे म्हणत तिने तिच्या हातातील बाहुली सायलीला दिली.

"माझे बाबाही मला लाडाने हेच म्हणतात- डेटा डॉल!"

स्मृतिका हसली.

"ते डेटॉल ने हात धुतल्यासारखं फिलिंग येतंय, त्यापेक्षा मेमरी डॉल ठीक आहे नाही का?"

दोघीही खळखळून हसल्या.

"मेंदूच्या मेमरीत लक्षात राहणाऱ्या गोष्टींचे आपण आपल्या सोयीसाठी चार भागांत वर्गीकरण करू! सजीव, निर्जीव, संवेदना आणि भावना! चारपैकी कोणत्याही प्रकारातील एखाद्या गोष्टीला त्यातील ऑब्जेट असे म्हणू! आता तुझ्या सूर्यप्रतापला आपण सजीव ऑब्जेक्ट म्हणू. त्या ऑब्जेटचा इतर कोणत्या चार भागात संदर्भ आहे? निर्जीव भागात त्याच्याशी संबंधित अशा गोष्टी ज्यांना बघितल्यावर तुला त्याची आठवण येईल, सजीव भागात त्याची आठवण करून देणाऱ्या इतर सजीव गोष्टी येतील तर संवेदना म्हणजे पंचेंद्रियाला होणाऱ्या सर्व संवेदना या भागात त्याच्यामुळे जागृत झालेल्या सर्व संवेदना उदाहरणार्थ स्पर्श वगैरे तसेच संबंधित ऑडिओ व्हिज्युअल फोटोग्राफीक संवेदना आणि शेवटी भावना या भागात येईल त्याच्यासाठी तुझ्यामध्ये असलेली प्रेमभावना, द्वेषभावना, प्रेमभंगाची भावना वगैरे!"

"होय, हे खरं आहे!"

"आता पुढे ऐक! एका भागातील ऑब्जेक्टचा संबंध इतर भागांतील ज्या ज्या ऑब्जेटशी येईल ते सर्व डिलीट होतील नैसर्गिकरित्या! म्हणजे कॉम्प्युटरच्या भाषेत सांगायचे तर डेटाबेस ऍडमिन हा डेटाबेस टेबल्समध्ये विशिष्ट माहिती टाकण्यासाठी किंवा काढण्यासाठी जशा क्वेरी कमांड वापरतात तशाच! मग काय होईल? तुला सर्व काही आठवेल पण त्यात जिथे जिथे सूर्यप्रताप आणि त्याच्याशी संबंधित ऑब्जेट असतील तिथे तिथे काळी आकृती किंवा पोकळी दिसेल, संबंधित भावनांच्या वेळी पोकळी जाणवेल म्हणजे कोणतीही भावना नसेल! आलं लक्षात?"

"हो, सांग लवकर, उशीर नको! पण या डॉलचं यात काय काम?"

"अगं, यापुढे तीच तर तुझी जिवलग मैत्रीण असणार आहे! तिच्या केसांना तुझे केस जोड!"

"अरे वा वा! हे तर अगदी स्टीव्हन स्पिलबर्गच्या अवतार पिक्चर सारखं वाटतंय!"

"होय, तसंच काहीतरी! पण इथे तुझे आणि बाहुलीचे केस हे यूएसबी केबल सारखे डेटा ट्रान्सफर करतील, पण नैसर्गिकरित्या! डेटा ट्रान्सफर करण्यापुरतेच फक्त केस जोडणे आवश्यक राहील!"

"अरे वा! हे तर लय भारी काम होणार! अगदी मस्तच!"

"आहे ना भारी! तर पुढे ऐक! जवळ आणले की तुमच्या दोघांचे केस आपोआप ओढले जाऊन जोडले जातील!मग सूर्यप्रताप सोबतचे सगळे प्रसंग सुरवातीपासून शेवटपर्यंत आठव आणि 'सर्व सूर्यप्रताप संबंधित ऑब्जेटस नष्ट कर' असे या बाहुलीला सांग! तुझ्या केसांतून तिच्या केसांद्वारे तिच्यात ते सर्व ट्रान्स्फर होऊन सेव्ह होईल!"

पुढे ती म्हणाली, "अशा प्रकारे इतर सुद्धा काही अनावश्यक गोष्टी कायमस्वरूपी तू तुझ्या मेंदूतून डिलीट करू शकतेस! दोन विशिष्ट तारखांमधले सर्व प्रसंग घटना डिलीट होऊ शकतात! इतर बिनकामाची माहितीसुद्धा डिलीट होऊ शकते! हे तुझ्या सोयीनुसार वापर! तशा कमांड बाहुलीला दे! कमांड देतांना शब्द काळजीपूर्वक वापर नाहीतर गडबड होईल! पुन्हा ती माहिती बाहुलीकडून परत घ्यायची असल्यास केस जोडून रिव्हर्स असे म्हण आणि बाहुलीला कमांड दे! आता येते मी! पुढे कधी माझी गरज पडल्यास बाहुलीचे केस ओढ, मी येईल! बाहुली हरवू नकोस, कायम जवळ ठेव! ही म्हणजे तुझी बॅकप हार्ड डिस्क आहे! आणि एक लक्षात ठेव. तुझ्या या शक्तीबद्दल तू तोपर्यंत कुणाला सांगू नकोस जोपर्यंत तुझे अंतर्मन तुला सांगत नाही की ती व्यक्ती खरी आणि निर्मळ आहे आणि खरंच त्या व्यक्तीला तुझ्या शक्तीची गरज आहे!"

असे म्हणून स्मृतिका गेलीसुद्धा!!

आणि सायली बाहुलीसह पुन्हा बेडवर होती.

आणि लगेचच सायलीने सूर्यप्रताप ऑब्जेटला मेंदूमधल्या सर्व विभागातून डिलीट करून बाहुलीत ट्रान्स्फर केले आणि तिची प्रेमभंगाच्या आठवणीतून सुटका झाली.

तिने आनंदाने टीव्ही लावला आणि गाण्यांचे चॅनेल लावले तेव्हा त्यात गाणे सुरू होते: "आज मैं उपर, आसमाँ नीचे.. आज मैं आगे, जमाना हैं पिछे ss"

^^^

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह

Nimish Navneet Sonar
Chapters
१: जन्मापासून सुरुवात २. जाणीव ३. सुगावा ४. ती दिसली ५. सायन्स फेस्टिव्हल ६. पुलावरचा घात ७. एक नवी सुरुवात ८. स्मृतिबंधन ९. पहिले प्रेम १०. ताकामिशी क्योदाई ११. दूरदर्शन १२. भटकंती १३. नरिमन टर्निंग पॉईंट १४. सुटका १५. संकट १६. तो आणि ती १७. प्रवास सुरू १८. जहाजावर १९. चाहूल २०. उलगडा २१. पाठलाग २२. परिवर्तन २३. सुपर नेचर कडे २४. सुपर नेचर २५. तयारी २६. वाईट हेतू २७. आव्हान २८. प्लॅनिंगचा मुखवटा २९. प्रस्थानम् ३०. पुन्हा पुलावरचा घात? ३१. दिसतं तसं नसतं ३२. शक्ती प्रदर्शन ३३. चकवा ३४. त्यांना आमंत्रण ३५. हाडाचा लढवैय्या ३६. नरिमन ऍक्शन पॉईंट ३७. तो येतोय ३८. युद्ध आमुचे सुरू ३९. प्लॅन्डी ४०. अपहरण ४१. गीता आणि नीता ४२. महायुद्ध ४३. वादळ शांत! लेखकाचे मनोगत लेखक परिचय प्रकाशनपूर्व आलेल्या इतर काही प्रतिक्रीया लेखिका मेधा इनामदार (पुणे) यांचा अभिप्राय राहुल दवे (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना अक्षर प्रभू देसाई (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना आदित्य भागवत, ठाणे यांचा अभिप्राय सिद्धेश प्रभुगांवकर, पुणे यांचा अभिप्राय