Get it on Google Play
Download on the App Store

३६. नरिमन ऍक्शन पॉईंट

 

मुंबईला पोहोचल्यावर काही स्वागत टीम मेंबर्सला घेऊन निद्राजीता साध्या वेशात पण आणखी दुसरा एक चेहऱ्याला फिट बसणारा म्हणजेच एक नवीन चेहरा वाटणारा मास्क घालून नरिमन पॉईंट जवळ जाऊन पोहोचली. सायलीपण साध्या वेशात आणि आणखी एका वेगळ्या चेहऱ्यासहित सुनिलने तिला दिलेल्या मिशनवर काम करायला मुंबईत एके ठिकाणी गेली होती.

 

अणुशास्त्रज्ञ रणवर्धन हस्तक आणि डॉक्टर रजक हडपकर यांची घरे नरिमन पॉईंट परिसरात होती. त्या घरांना आधीपासूनच पोलीस पहारा होताच. टीव्ही चॅनल वाले आधीपासूनच तिथेही ठाण मांडून बसले होते. परिस्थिती कशी हाताळायची याचा प्लॅन निद्राजीता करत होती आणि स्वागतच्या स्पेशल कम्युनिकेशन नेटवर्कद्वारे पुण्यातील सुनिल आणि हाडवैरीच्या संपर्कात होती.

 

तिकडे इसरो आणि नासा यांनी अवकाशात टेहळणी सुरू केली होती. दुर्बिणीतून तेथील सायंटिस्ट नव्या प्रतिसृष्टी ची जागा शोधण्यात व्यस्त होते. सुनिलने त्याच्याकडे दूरदृष्टी आहे हे जाहीर केले नव्हते पण तो आधीच वाईट टीमच्या रॉकेट लॉंचरच्या दिशेने अंतराळात बऱ्याच दूरवर जाऊन आला होता पण नंतर त्याच्या डोळ्यांना प्रचंड थकवा आला होता. अंतराळात गेल्या काही महिन्यांत कोणता तारा लोप पावला आहे त्या दिशेने इसरो आणि नासा आपल्या संशोधनाचा रोख ठेवत होत्या. जमलं तर सगळ्या दिशांनी वेगवेगळ्या सॅटेलाईट्सद्वारे पाठवलेले फोटो तपासण्याचा प्रयत्न सुरू होता. वेळ मिळेल तसे सुनिल कधी एका तर कधी दुसऱ्या दिशेने अंतराळात जाऊन पोहोचत होता.

 

अवकाशातील अंधारातही त्याला नीटपणे दिसायचे कारण त्याला सगळे निगेटिव्ह कलर्स दिसत. हवे तेव्हा तो स्फटिकाला स्पर्श करून गरजेनुसार आपली दृष्टी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशी बदलू शकत होता. पण ते अदृश्य गोलाकार स्तंभातून वर जाणारे रॉकेट्स आणि निर्माण होत असलेली प्रतिसृष्टी अजून काही त्याच्या दृष्टीस पडली नव्हती कारण दिशा नीट सापडत नव्हती. नाहीतर त्या रॉकेट्समध्ये असलेले निगेटिव्ह कण त्याला दिसू शकले असते.

 

संपूर्ण भारतात या घटनेमुळे आणि वाईटच्या व्हीडिओमुळे रेड अलर्ट सारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. जनता सावध झालेली होती पण आवश्यक कामासाठी बाहेर पडावेच लागत होते. आणि बेस्ट बस, मुंबई लोकल या मुंबईच्या रक्तवाहिन्या कधीही बंद ठेऊ शकत नसल्याने त्या सुरू होत्या, त्यामुळे गर्दी होतीच फक्त फार तर नेहमीपेक्षा कमी होती असे म्हणता येईल.

 

नरिमन पॉईंट परीसरात साधारण नऊ वाजेच्या आसपास मारिन ड्राईव्ह जवळच्या खडकांवर हजारोंच्या संख्येने खडकांच्या रंगाच्या एकसारख्या दिसणाऱ्या ज्या मांजरी आणि बोके टपून बसले होते ते तिथून चढून प्रचंड संख्येने रस्त्यांवर आले. तिथे असे दिसत होते की जणू काही काळसर रंगाच्या जाड समुद्राच्या लाटा चिडून समुद्रातून निघून डांबरी रस्त्यावर पसरल्या आहेत.  क्षणभर तिथे असलेल्या लोकांना काय होतंय हे समजलंच नाही आणि मग अचानक हाहाकार माजला. घबराट पसरली. गोंधळ सुरू झाला. पळापळ सुरू झाली. अचानक डांबरी रस्त्यांवर मोठ्या आकाराच्या क्रूरपणे दात ओठ खाणाऱ्या मांजरी दिसायला लागल्या. त्या वाघाच्या डरकाळी पेक्षा मोठ्या आवाजात म्यांव म्यांव करायला लागल्या. त्यात मानवी मेंदू असलेल्या आणि यांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या मांजरी होत्या.

 

त्याच दरम्यान अरबी समुद्रात पाण्यामध्ये दूरवर काहीतरी हालचाली सुरू झाल्या होत्या. त्या हालचाली अजून शहरापासून दूर होत्या. अथांग समुद्रात होत्या पण त्या वेगाने शहराकडे येत असल्याचे जाणवत होते.

 

रस्त्यावर जाणाऱ्या कार्सच्या मध्ये अचानक करड्या रंगांच्या मांजराचा मोठा घोळका शिरल्याने गाड्यांनी करकचून ब्रेक्स दाबले आणि गाड्या स्लिप होऊन उलटल्या. काही डिव्हायडरला धडकल्या.

 

हे निद्राजीताला आणि स्वागत टीमला कळताच ते तिकडे धावले, आणि हे तिने सुनिलला सांगितले. त्याच सुमारास पुण्यात  गणेशखिंड रोड आणि मनपा भवन जवळ मधमाशा, कावळे, पतंग, भुंगे, चिमण्या, घारी, कबुतरं, टोळ, नाकतोडे अशा अनेक पक्ष्यांनी आणि किटकांनी मोठा थवा बनवून एकदम या भागात हल्ला केला. आकाशात काळे ढग जमा होतात त्यापेक्षा जास्त अंधारून आले. सगळीकडे हलकल्लोळ माजला. पीएमटी बस चालकांना समोर दिसेनासे झाले. बस आजूबाजूच्या भिंतींवर आदळल्या. समोरच्या काचा फुटल्या. गाडीतले प्रवासी घाबरून खाली उतरले आणि सैरभैर धावायला लागले, आजूबाजूला मिळेल त्या घरात, बिल्डिंगमध्ये, हॉटेलमध्ये आसरा घ्यायला सुरुवात केली.

 

निद्राजीता, हाडवैरी आणि DN तिघांनी एकमेकांना सूचना दिल्या की आता जे काही समोर येईल त्याचा प्रतिकार करायचा, लोकांना वाचवायचे आणि हितेन, रजक दोघांना त्यांच्या घरातून पळू द्यायचे नाही. सायली तिच्या नेमून दिलेल्या कामात गुंतली असल्याने तिला बाहेर सुरू झालेल्या या गोष्टींबद्दल अजून सांगितले नव्हते. जलजीवा लवकरच पुणे आणि मुंबईत येणार होते. जलजीवांचा "झिरकोडीयम" मिश्रण केलेला पाऊस पडला की त्यातून सगळीकडचे बोन्साय ट्री मेन मूळ रुपात येणार होते.

 

मांजरांचा अचानक हल्ला झाल्याने स्वागत टीम आणि निद्राजीता प्रथम गडबडले पण नंतर सावरले. काही स्वागत फायटर्स रणवर्धन आणि रजक यांच्या बंगल्यांबाहेर थांबले. निद्राजीता आणि इतर मांजरींनी हल्ला केलेल्या मरीन ड्राईव्ह परिसराकडे पळाले. वाईट टीमचा प्लॅन होता की सगळेजण या अचानक हल्ल्याने गडबडले की रजक, हितेन यांना घरातून शिताफीने अपहरणाचा बनाव करून गाडीतून खंडाळ्याला आणायचे...

 

एका भव्य मांजराने निद्राजीतावर उडी मारली. निद्राजीताला पण त्या मांजरीसारखीच लढण्याची वृत्ती आपोआप प्राप्त झाली. तिच्यात तशी शक्ती होती.  मांजरीने तिला चारही पायांनी घट्ट धरून पुढच्या पायांनी बोचकायला सुरुवात केली. आणखी चार पाच मांजरांचा घोळका चारही बाजूंनी उडी मारून निद्राजितावर धावून आला. एका बोक्याने तिच्या जोराने थोबाडीत मारली. थोडा वेळ सुन्न झाले. दातांवर आघात झाल्याने ती डगमगली आणि मग सावरली. नंतर त्यापेक्षा दुप्पट वेगात तिने त्या बोक्याला थोबाडीत मारले. तो बोका हसायला लागला आणि म्हणाला, "बोका बनायच्या आधी अंडरवर्ल्ड मधला फेमस गुंड होतो मी. त्याचा मेंदू आतमध्ये आहे माझ्या. गावरान छत्री नाव होतं माझं!"

"गावरान छ्त्री? अच्छा!! तरीच म्हटलं हा बोका कसा ओळखीचा वाटतोय! तेच मी विचार करत होते की अचानक हा गुंड अंडरवर्ल्ड मधून गायब कसा झाला? सतरा गुन्हे आहेत ना रे नावावर तुझ्या? खूप माजलेला होता तू नाही का? आणि आता तर काय बोका बनला. अजून माज चढलेला दिसतोय तुला!"

"ए भवाने, माज कुणाचा उतरवतेस? अब तो तुझे मौत के घाट उतारने का समय आ गया है!"

प्रचंड वेगाने निद्राजीताने त्याच्या माजलेल्या चेहऱ्यावर वेगाने एक थोबाडीत ठेवली. त्याचा माजलेला चेहरा सुजला. सुजलेल्या चेहऱ्यावर पटापट वार ती करतच राहिली तोपर्यंत इतर मांजरी बोके तिला सुचू देत नव्हते. तिच्या अंगावर ते ओरखडे मारू लागले. त्यापैकी दोन तीन मांजरी गावरान छत्रीच्या गर्लफ्रेंड होत्या. त्या चवताळून म्हणाल्या, "आमच्या छत्रीला मारतेस? एवढी हिम्मत?"

"अरे वा? गावरान छत्रीच्या तुम्ही गावरान छपरी पोरी! नालायक कुठल्या!", असे म्हणत निद्राजीताने हवेत उडी मारली आणि वेगाने गोल गोल फिरत सगळ्यांना हवेतच अनेक थापडा, बुक्के, लाथा मारल्या. गावरान छत्री सहित ते सर्वजण उलटेपालटे होऊन वेगवेगळ्या रस्त्यावरच्या वाहनांवर पडले. इतर स्वागत फायटर्स पण मांजरांच्या घोळक्यांशी अविरतपणे लढत होते.

 

वाईट टीमने गुंड लोकांच्या मानवी मेंदू पासून हे सगळे प्राणी बनवले होते आणि स्वतःला मात्र बेरोजगार लोकांचा कैवारी म्हणवून घेत होते.

 

समुद्रातून आता वेगळ्याच दिसणाऱ्या पांढऱ्या फेसळणाऱ्या लाटा वेगाने शहराकडे आल्या. लाटांमध्ये दोन हात दिसू लागले, मग चेहरा तयार झाला आणि मग समुद्राच्या पाण्यापासून त्यांचे पाय वेगळे झाले आणि त्या लाटांनी हळूहळू मानवांचे रूप घेतले. ते पाणीच होते पण मानवरूपात!  जलजीवांचे आगमन झाले होते!!

 

त्या शेकडो लाटांनी माणसांचे रूप घेतले आणि नंतर त्या बर्फात रुपांतरीत झाल्या. आता मरीन ड्राईव्ह परिसरात बर्फाचे बनलेले मानव म्हणजे जलजीवा दिसत होते. गरजेनुसार जलजीवा वाफ, पाणी आणि बर्फ या रुपात हवे तेव्हा रूपांतरित होऊ शकत होते. तसेच वातावरणातील तापमानाच्या बदलानुसार स्वतःची अवस्था बदलू देणं किंवा न देणं याच्यावर जलजीवांचे नियंत्रण होते. वाफ बनून वेगाने मांजरांच्या घोळक्यात जाऊन त्यांना वेढून जलजीवा पुन्हा बर्फात रुपांतरीत होऊ लागले म्हणजे तेवढा घोळका बर्फात बंदिस्त होऊन थिजला. त्यांच्या विघातक हालचाली पण तिथेच थिजल्या. असे अनेक  मांजरांना आणि बोक्यांना बंदिस्त केलेले  थिजलेले बर्फगोळे सगळीकडे दिसायला लागले.

 

पण मांजरांच्या संपूर्ण संख्येला जलजीवा पुरेसे नव्हते. त्यासाठी आणखी जलजीवा लागणार होते. काही जलजीवा बर्फ मानव रुपात मांजरींना उचलून फेकू लागले तर काही गरम वाफ बनून मांजरींना भाजून काढू लागले.

 

मांजरी आणि बोके हमरीतुमरीवर आल्या. किंचाळू लागल्या. रस्त्यावरील, आजूबाजूच्या हॉटेल्स, घरे याठिकाणी घुसून उच्छाद मांडू लागल्या. आव्हान आणखी कठीण होऊन बसले. काही न्यूज चॅनेलवाले या ठिकाणी येऊन पोहोचले आणि लाईव्ह टेलिकास्ट करू लागले. हे प्रक्षेपण आयते बघत बघत वाईट टीम आपल्या खंडाळ्याच्या गुहेतील आपल्या ठिकाणावर छोट्याश्या आक्रमणाने स्वागत टीमची काय हालत झाली आहे हे बघून हसत होते. बरेच कॅमेरामन जखमी झाले. पण तरीही जीवावर उदार होऊन त्यांनी शूटिंग आणि पत्रकारांनी वार्तांकन सुरूच ठेवले.

 

जलजीवांच्या आगमनाची वार्ता निद्राजीताने सुनिलला कळवली. सुनिलने लगेच सायलीलाही कॉन्फरन्स मध्ये घेतले. आता ते आवश्यक झाले होते. पुण्यातही अशाच प्रकारचे उडणाऱ्या पक्षांचे हल्ले झाले असल्याचे सुनिलने सांगून तिथली परिस्थिती थोडक्यात सांगितली. सुनिल त्यावेळेस पुण्यातील मनपा भवन जवळ काही स्वागत टीम मम्बर्स सोबत उभा होता आणि हल्लेखोर उडणाऱ्या पक्षी कीटकांना तोंड कसे द्यायचे या विचारात होता. दरम्यान शनिवार वाड्याजवळून एक हत्ती वेगाने वाहने तुडवत मनपा भवन कडे येऊ लागला होता. सुनिलला अजून याची खबर नव्हती कारण तो फोनवर बोलण्यात मग्न होता.

निद्राजीता म्हणाली, "सुनिल, हे प्राणी संख्येने खूप आहेत. जलजीवा आलेत खरे आणि त्यांच्यामुळे खूप मदत होतेय पण आपण कमी पडतोय असे वाटते. अनेक निरपराध नागरिक मारले जात आहेत!"

सुनिल पुढे म्हणाला, "ऐका ऐका तुम्ही दोघीजणी! पुण्याला हाडवैरीने पकडलेले ते दोघे वाईट टीमचे सदस्य ज्यांना हाडवैरीने स्वागत टीमला सामील होण्यासाठी तयार केले आहे ज्यांची वाईट टीम मधली नावं आहेत राऊटरन आणि वायफायर. त्यांचेकडून जस्ट आताच मला एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे!"

सायली सारंग सोबत मुंबईतील ऑफिसमधील आपला प्रयोग पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत होती तर निद्राजीता एका आडोशाला येऊन बोलत होती.

सायलीने विचारलं, "काय माहिती मिळाली आहे?"

सुनिल म्हणाला, "हे जे प्राणी पक्षी कीटक हल्ला करतात त्यात एक मोडस ऑपरेंडी असते. किंवा प्रोग्रामिंग आहे असं म्हण हवं तर! प्राण्यांच्या घोळक्यात फक्त दोन चार जण मानवी मेंदू असलेले स्मार्ट प्राणी असतात, बाकीचे मात्र त्यांच्याच सारखी बाह्य त्वचा असणारे पण आतमध्ये यांत्रिक असलेले प्राणी असतात. त्यांच्यात मोशन सेन्सर असते, म्हणजे मानवी प्राण्यांची हालचाल बघून त्यांची कॉपी करणे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर शहरात ते सोडत असलेल्या यांत्रिक प्राण्यांचे कंट्रोल करणारे इतर मानवी प्राणी आणि तेवढे रिमोट कंट्रोल डिव्हाईस हे त्यांचेकडे नाही. तसेच नुसते मानवी प्राणी पण सोडायचे म्हटले तर त्यांचेकडे ते तेवढ्या संख्येने नाहीत!"

निद्राजीता म्हणाली, "ओह, म्हणजे त्यांचा मुख्य मानवी प्राणी जर ओळखता आला आणि त्याला मारले तर इतर यांत्रिक प्राणी आपोआपच निष्क्रिय होतील! मग त्यासाठी तुला एकाच वेळेस सगळीकडे दूरदृष्टीने लाल वर्तुळ डोक्याभोवती असलेल्या प्राण्यांकडे लक्ष ठेवावे लागेल  आणि आम्हाला फोनने सूचना द्याव्या लागतील जेणेकरून आम्ही त्यांना मारू शकू. पण एकाच वेळेस सगळीकडे पुण्यात मुंबईतल्या सगळ्या भागात लक्ष देऊ शकत नाहीस.."

सायली मध्येच सुनिलला तोडत म्हणाली, "आणि म्हणूनच सुनिल... तू सांगितलेला प्रयोग करण्यात मी अविरत गुंतले होते आणि तो अर्ध्या तासातच यशस्वी होणार आहे!"

^^^

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह

Nimish Navneet Sonar
Chapters
१: जन्मापासून सुरुवात २. जाणीव ३. सुगावा ४. ती दिसली ५. सायन्स फेस्टिव्हल ६. पुलावरचा घात ७. एक नवी सुरुवात ८. स्मृतिबंधन ९. पहिले प्रेम १०. ताकामिशी क्योदाई ११. दूरदर्शन १२. भटकंती १३. नरिमन टर्निंग पॉईंट १४. सुटका १५. संकट १६. तो आणि ती १७. प्रवास सुरू १८. जहाजावर १९. चाहूल २०. उलगडा २१. पाठलाग २२. परिवर्तन २३. सुपर नेचर कडे २४. सुपर नेचर २५. तयारी २६. वाईट हेतू २७. आव्हान २८. प्लॅनिंगचा मुखवटा २९. प्रस्थानम् ३०. पुन्हा पुलावरचा घात? ३१. दिसतं तसं नसतं ३२. शक्ती प्रदर्शन ३३. चकवा ३४. त्यांना आमंत्रण ३५. हाडाचा लढवैय्या ३६. नरिमन ऍक्शन पॉईंट ३७. तो येतोय ३८. युद्ध आमुचे सुरू ३९. प्लॅन्डी ४०. अपहरण ४१. गीता आणि नीता ४२. महायुद्ध ४३. वादळ शांत! लेखकाचे मनोगत लेखक परिचय प्रकाशनपूर्व आलेल्या इतर काही प्रतिक्रीया लेखिका मेधा इनामदार (पुणे) यांचा अभिप्राय राहुल दवे (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना अक्षर प्रभू देसाई (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना आदित्य भागवत, ठाणे यांचा अभिप्राय सिद्धेश प्रभुगांवकर, पुणे यांचा अभिप्राय