८. स्मृतिबंधन
काही वर्षांपूर्वी मुंबईत एके ठिकाणी -
"तू जेव्हा मला बाळ असताना पहिल्यांदा दूध पाजलं होतंस ना आई, ती फिलिंग, ती गोड भावना, तो मायेचा स्पर्श मी कधीही विसरू शकत नाही आई!", असं 'सायली प्रथमे' जेव्हा सर्वप्रथम म्हणाली होती तेव्हा आईला प्रचंड धक्काच बसला होता पण सायली विनोद करते आहे, आपली फिरकी घेते आहे असे वाटून ती सावरली आणि म्हणाली, "ए, काहीही काय? तुला आठवतं इतक्या लहानपणाचं?"
"अगं हो आई, मला सगळं जसंच्या तसं आठवतं, पिंकी स्वियर! अगदी गळा शप्पथ!!"
"काहीपण सांगून मला बनवू नकोस! पिंकी स्वियर बोलून मी इंप्रेस होईल असं तुला वाटत असेल तर ते चूक आहे!"
"अगं आई मी तुला अजून एक उदाहरण सांगते ते सांगितल्यावर तुझा नक्की विश्वास बसेल. मी बाळ असताना तू मला एकदा खेळवत होतीस आणि हवेत फेकून पुन्हा झेलत होतीस आठवतं?"
"त्यात काय विशेष प्रत्येकच बाळाला तसं आई-वडील खेळवतात!", चेहऱ्यावरील अस्वस्थता लपवत आई म्हणाली.
"अगं आई माझ बोलणं मी पूर्ण केलं नाही अजून! पुढचं ऐक! वर फेकता फेकता मी तुझ्या हातातून एकदा सटकले होते, पण बाजुच्या मऊ बेडवर पडले म्हणून जास्त मला लागले नाही पण तू प्रचंड घाबरली होतीस त्यानंतर मी कितीतरी वेळ रडत होते आणि तुही मला छातीशी धरून रडत होतीस, पण अजूनही तू ही गोष्ट घरात कुणालाही सांगितली नाही, आठवतं?"
आता मात्र आईचा आ वासला गेला. हे तंतोतंत खरे होते कारण ही गोष्ट कुणालाच माहीत नव्हती अगदी कोणालाही नाही! सायलीच्या वडिलांना सुद्धा नाही!
इतक्या लहानपणीच्या गोष्टी हीला आठवतात? पण आणखी मजा तर पुढे होती!
"पटलं ना आता? आणि त्यावेळेस दुपारचे 04:43 झाले होते!", असं म्हणून तिने आईला टाळी दिली आणि हसू लागली पण आईचा चेहरा मात्र प्रचंड आश्चर्याच्या भावनेतून बाहेर निघत नव्हता आणि टाळी घेतल्यावर पण आईचा हात तसाच हवेतच राहिला!
दुपारचे त्यावेळेस किती वाजले होते हे जरी आईच्या लक्षात नव्हते तरी तेव्हा दुपार होती हे मात्र आईला आठवत होते.
त्याच दरम्यान हे संभाषण सायलीचे बाबासुद्धा ऐकत होते कारण ते नुकतेच घरात आलेले होते पण दोघांचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. त्यांनाही खूप आश्चर्य वाटले.
मात्र ते खेळकर वृत्तीचे होते. सायली काहीतरी उलट सुलट सांगून तिच्या भोळ्या आईला बनवते आहे असे त्यांना वाटले. हातातली बॅग बाजूला ठेवून ते सोफ्यावर बसले आणि त्यांनी म्हटलं, "अच्छा असं आहे तर! मग मी आता तुला काही तरी विचारतो की तू नक्की सांग हं सायली!"
"अहो पप्पा, विचारा तर खरं!", वडिलांच्या अशा पावित्र्याचा काहीएक परिणाम न झालेली सायली म्हणाली!
"बरं सांग तू पाच वर्षाची असताना आपण तुझ्यासाठी कोणतं खेळणं आणलं होतं जे लाल रंगाचं होतं?"
"मी 5 वर्ष चार महिन्याची असताना संध्याकाळी साडेपाच वाजता तुम्ही माझ्यासाठी एक लाल रंगाची पिगीबँक आणली होती! मी त्या पिगीबँक मध्ये एकदा वाळू भरून ठेवली होती आठवतं ना?"
आता आश्चर्य व्यक्त करण्याची पाळी सायलीच्या वडिलांची होती पण त्यांनी ते चेहऱ्यावर जास्त न दाखवता काहीतरी विचार केला आणि पुन्हा सायलीला विचारलं, "सांग बरं तुझं सायली हे नाव मी ठेवलं की मम्मीने?"
सायली सांगू लागली, "पप्पा सोप्पंय ते, सांगते की मी! त्या दिवशी मी पाळण्यामध्ये लोळत खेळत पडले होते. चार-पाच दिवसांची होते मी! हात-पाय हलवत होते. छताकडे बघत बसले होते. फिरणारा पंखा मला खूपच आवडत होता. त्यावेळेस छतावर पंख्याच्या बाजूला एक बारीकसा कोळी लटकत होता. त्याला कोळी म्हणतात हे मला तेव्हा चार दिवसांची असताना जरी माहीत नव्हते तरी आता मोठी झाल्यावर मला ते समजले की तो कोळी होता. बरं ते कोळ्याचं सोडून द्या कारण थोड्यावेळानंतर तो फॅन मध्ये अडकून मेला होता. ते असो!"
मग सायली पुढे म्हणाली, "तर मी सांगत होते की तुम्ही आणि मम्मी दोघांनी बाजारातून पप्पांनी आणलेले '2000 मुलींची नावे' हे पुस्तक वाचत होतात आणि तुम्ही दोघांनी प्रत्येक नाव वाचून बघितलं आणि त्यातले आईने दहा आणि तुम्ही पंधरा नाव निवडले. त्यादिवशी तारीख होती 5 मार्च. वेळ होती रात्री 7:15 pm. आणि मग आईने एक आणि तुम्ही एक असे दोन नाव फायनल केले. आईने जुईली आणि तुम्ही सायना. आणि दोघे नावं एकत्र करून तुम्ही माझे नाव ठेवले सायली!"
पप्पांना आणि मम्मीला दोघांनाही चक्कर येऊन खाली पडण्याचे बाकी होते पण त्यांनी इकडे तिकडे हाताने सोफा, भिंत वगैरेचा आधार घेत स्वतःला सावरले आणि खाली पडण्यापासून वाचवले.
आणि सायली मात्र आणखी बोलतच होती ती म्हणाली, "पण मला तेव्हा लहानपणी चीड येत होती तुमच्या दोघांची, कारण मला त्यावेळेस कळत नव्हतं की तुम्ही माझ्याशी खेळायचं सोडून हे काय गप्पा मारत आहात? म्हणजे माझ्याकडे लक्ष देत नाही आहात. पण आता मोठी झाल्यानंतर आणि शब्द अर्थ कळायला लागल्यानंतर मला कळलं की तुम्ही माझ्यासाठी नावे शोधत होतात! मला लहानपणापासूनच सगळं जसंच्या तसं पाहिजे तेव्हा आठवतं मम्मी आणि पप्पा!"
"अग पण हे कसे शक्य आहे?"
"माझ्या दृष्टीने ही खूप सहज आणि नॉर्मल आहे पप्पा! फक्त एवढेच आहे की ते मला जे जे आठवतं त्याचे मोठे झाल्यानंतर! जन्म होतांना मला काय वाटलं ते पण मी आठवू शकते, सांगू?"
"नको, नको!", एकमुखाने एकचवेळी तिचे आई वडील म्हणाले होते. त्या दिवशी एवढे धक्के त्यांना पुरेसे होते, आणखी नको होते!
* * *
सायली इयत्ता दुसरी मध्ये असताना हे सगळे घडले होते. तिने आतापर्यंत हे सगळं अनुभवलं पण शेवटी आई वडिलांना सांगायचं ठरवलं. वयाच्या मानाने वैचारिकदृष्ट्या ती खूप मॅच्युअर झाली होती.
सायलीला तिच्या आई वडिलांनी मराठी मीडियम मध्ये टाकले होते. आपल्या मातृभाषेतूनच आपण चांगले शिक्षण घेऊ शकतो हा त्यांना गाढ विश्वास होता. जागतिक भाषा इंग्रजी असली आणि इंग्रजीचे महत्त्व जरी वाटत असले तरी दहावीनंतर मातृभाषा शिकलेला माणूस जगातील इतर कोणतीही दुसरी भाषा चांगल्या पद्धतीने आत्मसात करू शकतो हेही त्यांना माहिती होते.
सायली अगदी लहान असतानाच्या सर्व घटना अशा पद्धतीने त्यांना सहजपणे सांगितल्यानंतर ते सायलीला डॉक्टरकडे घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांनीही तिच्या बऱ्याच टेस्टस् घेतल्या. त्यांचे नाव होते डॉक्टर व्योमकेश विटे!
त्यांनी एक मोठ्ठे बोर्ड बोलावले. त्यावर शंभर वेगवेगळ्या रंगाचे शंभर वेगवेगळे अकार होते आणि त्यापैकी अर्ध्या आकारात वेगवेगळ्या रंगानी नंबर्स आणि अर्ध्या आकारात विविध शब्द लिहिलेले होते. हे चित्र तिला त्यांनी अर्धा मिनिट दाखवले. सायलीने वरच्या रांगेतून डावीकडून सुरू करून प्रत्येक आकाराकडे दोन दोन सेकंद नजर फिरवली आणि शेवटच्या रांगेत उजवीकडे खाली तळाशी येऊन थांबली आणि डॉक्टर म्हणाले, "सायलीच्या उलट दिशेने वळवा आता हे चित्र!"
ते चित्र खोलीत एके ठिकाणी कोपऱ्यात आणून सायलीला दिसणार नाही अशा पद्धतीने उलटवण्यात आलं, इतरांना मात्र ते दिसत होतं.
मग डॉक्टरांनी विचारले, "चौथ्या रांगेतील डावीकडून पाचवा आकार आठव?"
सायली म्हणाली, "पिवळ्या रंगाने सत्तावीस आकडा लिहिलेला जांभळ्या रंगाचा त्रिकोण!"
डॉक्टर सहीत उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित!!
अगदी बरोबर आणि अचूक होतं ते उत्तर!
आणि मग तिने पटापट सर्वच आकार आणि त्यांचे रांगेतील स्थान, रंग, शब्द किंवा संख्या म्हणून दाखवले.
आणखी वेगवेगळ्या टेस्ट करून मग डॉक्टर म्हणाले की, "हिला अगदी दुर्मिळ असलेला हायपर थिमेशिया हा एक आजार किंवा मेडिकल कंडीशन किंवा डीसऑर्डर झालेला आहे. किंबहुना नुसत्या साध्या हायपर थिमेशिया मध्ये अगदी तंतोतंत सर्वच प्रकारच्या गोष्टी आठवत नाहीत पण हिला त्याहीपेक्षा जास्त तीव्रतेचा हायपर थिमेशिया झाला आहे आणि हा त्याहीपेक्षा खूप दुर्मिळ असतो त्याला नाव आहे: हायपर मेमरी ईमप्रिंट अँड रिकॉल डीसऑर्डर HMIARD (हमियार्ड) किंवा मराठीत तुम्ही त्याचे सुटसुटीत नाव "अतिस्मृतीबंधन" असे ठेऊ शकता!"
सर्वजण श्वास रोखून ऐकत होते.
डॉक्टर पुढे म्हणाले, "खरे तर याला आजार म्हणता येणार नाही कारण याचा फायदाच तिला होणार आहे, पण एक मात्र आहे की जसे चांगले तसे वाईट प्रसंग सुद्धा तिला आठवत राहतील. काही वेळेस आयुष्यात सुखाने जगण्यासाठी काही गोष्टी विसरून जाणं आवश्यक असतं पण ही काहीही विसरणार नाही. अशा मुलांची एक विशेषता असते ती म्हणजे अशी मुले आपली मातृभाषा अगदी लवकर आणि अस्खलितपणे बोलायला लागतात! आणि त्यानंतर इतर भाषा! अशी मुलं कितीही भाषा शिकू शकतात! हिला लिखित तसेच फोटोग्राफिक अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी तंतोतंत आठवतील. म्हणजेच पाहिलेला प्रत्येक प्रसंग, चित्र तसेच वाचलेले प्रत्येक शब्द, अक्षर, वाक्य, रंग, वास, संगीत, अनुभवलेल्या भावना हे सगळं नेहमी तंतोतंत आठवेल!"
आता सायलीच्या आई वडिलांना लक्षात आले की तिला आतापर्यंत प्रत्येक परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क का मिळाले तसेच ती आपल्याला लहानपणीचे प्रसंग का सांगू शकली ते!
कालांतराने विटे डॉक्टरांनी इतर काही डॉक्टरांना बोलावून घेतले (ज्यात एक अमेरिकन आणि एक युरोपियन डॉक्टर होता) आणि त्यांच्या समोर सायलीला बरेच प्रश्न विचारले कारण मेडिकल हिस्टरीमध्ये अनेक देशांमध्ये आढळलेली ही प्रथमच भारतातील अशी एक केस होती.
सायलीच्या आई-वडिलांच्या विनंतीवरून त्यांनी डॉक्टरांना याबाबत जास्त कुणाला सांगू नये ही विनंती केली कारण सगळीकडे गवगवा झाल्यानंतर सायलीला धोका निर्माण होईल किंवा ती अचानक प्रकाशझोतात आल्यानंतर तीचे जगणे मुश्कील होईल हे त्यांना माहिती होते, त्यामुळे विटे डॉक्टरांनी त्यांची विनंती मान्य केली. शेवटी राईट टू प्रायव्हसी म्हणजे गोपनीयतेचा अधिकार सर्वांनाच आहे.
विटे डॉक्टर त्यांचे फॅमिली डॉक्टर होते. त्यामुळे सायलीवर जे काही मेडिकल मॅगझिनमध्ये लेख लिहिण्यात आले त्यात तिचे नाव बदलण्यात आले तसेच तिचा पत्ता किंवा तिच्या बद्दल इतर माहिती गोपनीय ठेवण्यात आली!
विटे डॉक्टरांनी एक सल्ला मात्र सायलीच्या आई-वडीलांना दिला तो असा की हिला नक्की मोठेपणी डॉक्टर बनवा कारण तिची प्रखर स्मृती किंवा मेमरी अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकेल हे नक्की!!
तिच्या रोग निदान करण्यामध्ये कसलीच चूक होणार नाही कारण ती प्रत्येक गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करू शकेल आणि कोणतीच गोष्ट तिला आठवणार नाही असे होणार नाही! हा विचार सायलीच्या आई-वडिलांना पटला असे त्यांनी डॉक्टरांना सांगितले. याबाबत जास्त कुणाकडे वाच्यता केली गेली नाही फक्त घरात सायलीचे आई वडील आणि तिचा मोठा भाऊ यांनाच याबद्दल माहिती होते. तर अशीही सायली प्रथमे! तिचा मोठा भाऊ होता सुमित!!
सुमितचे मात्र म्हणणे वेगळे होते. सायलीने शिक्षक व्हावे असे त्याला वाटे. कोणतेही पुस्तक हातात न घेता, कसलीही चूक न होऊ देता सायलीने गणित, भूगोल, इतिहास आणि सायन्स यासारखे विषय शिकवावेत अशी त्याची इच्छा होती. गणितातील, विज्ञानातील विविध सूत्रे, इतिहासातील तारखा, घटनाक्रम तसेच अचूक भौगोलिक माहिती ती चिरकाल लक्षात ठेऊ शकणार होती.
शिक्षक एक पिढी घडवतो आणि डॉक्टर जीव वाचवतो. दोघांचेही समाजासाठी सारखेच महत्व आहे. तसे पाहिले तर अशी अनेक क्षेत्र आहेत जिथे सायली सारख्या स्ट्रॉंग मेमरीची गरज भासते. सॉफ्टवेअर, अवकाश संशोधन वगैरे सारख्या अनेक क्षेत्रात तिच्या मेमरीचा उपयोग होऊ शकणार होता.
सायलीच्या वडिलांच्या मनात मात्र वेगळाच विचार रुंजी घालत होता, "अशी काही क्षेत्रे आहेत जिथे काही गोष्टी गुप्त ठेवण्याची गरज असते जसे आर्मी किंवा आर्मीशी संबंधित अनेक गोष्टी जसे शस्त्र आणि विस्फोटक निर्मिती तसेच गुप्तचर संस्था, सीआयडी, सीबीआय येथे बऱ्याच गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. समजा सायलीच्या या विशेष शक्तीचा देशासाठी उपयोग केला तर?"
आर्मीमध्ये असलेल्या एका दूरच्या नातेवाईकाला त्यांनी एकदा सहज विचारले की, "समजा अशी एखादी व्यक्ती जीची अमर्याद गोष्टी अमर्यादपणे लक्षात ठेवण्याची क्षमता आहे त्याचा आर्मीत काय उपयोग होऊ शकतो?"
त्याने अनेक शक्यता सांगितल्या, आर्मीत सगळीकडेच उपयोग होईल पण गुप्तचर विभागात जास्त उपयोग होईल असे सांगितले पण त्याने फायद्यापेक्षा धोक्याच्याच जास्त शक्यता वर्तवल्या.
त्या म्हणजे- "अनेक गुप्त गोष्टी सहज लक्षात ठेवण्यासाठी त्या व्यक्तीचा उपयोग होईल खरं आणि हवी तेव्हा ती महिती सहज उपलब्धसुद्धा होईल, पण त्या व्यक्तीला इतरांपासून नेहमीच गुप्त ठेवणे शक्य होणार नाही आणि ती व्यक्ती शत्रूच्या ताब्यात सापडली तर सगळेच सिक्रेट शत्रूच्या ताब्यात जाण्याची शक्यता जास्त असणार! आणि त्या व्यक्तीच्या जीवाला सतत धोका असणार!!"
त्यामुळे वडिलांनी तो विचार रद्द केला!
* * *
प्रत्येक गोष्ट पूर्णपणे आठवत असल्यामुळे आणि सर्वांना हे कळू नये असे ठरल्यामुळे, परीक्षेमध्ये मुद्दामहून काही प्रश्नांची उत्तरे येत असूनसुद्धा ती रिकामे सोडून देत होती किंवा काही प्रश्नांची चुकीची उत्तरे लिहीत होती पण त्यातही शक्यतो वर्गात मात्र पहिली येईल असा तिचा प्रयत्न असायचा, त्यामुळे आपल्यात अशा प्रकारची सुपर मेमरी आहे हे तिने कुणालाही कळू न देण्याची दक्षता घेतली होती. कोणतेही क्विज शो मध्ये किंवा इतर स्पर्धेत भाग घेताना सुद्धा तीने ही काळजी घेतली होती.
एखादा चित्रपट बघितला किंवा पुस्तक वाचले की ते संपूर्ण जसेच्या तसे सायलीच्या लक्षात राहायचे. एखाद्या फोटोंचा अल्बम एकदा पहिला की ते फोटो जसेच्या तसे तिच्या लक्षात रहात. एकंदरीत सायली ही एक "स्टोअर हाऊस" झाली होती म्हणजे पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, मेमरी कार्ड सारखी चालती बोलती स्मार्ट मेमरी स्टोरेज डिव्हाईस झाली होती. चालताबोलता डेटाबेस झाली होती. सुमित तिला बरेचदा "दि डेटाबेस गर्ल!" म्हणायचा तर आई वडील तिला "डेटा डॉल" म्हणत!
"कौन बनेगा करोडपती" मध्ये तिने अकरावीत कॉलेजमध्ये असताना भाग घेतला तेव्हा तिला जवळपास प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पाठ होते कारण त्यासाठी तयारी म्हणून भराभर तिने सामान्य ज्ञानाची अनेक पुस्तके वाचून काढली होती. मध्येच एका पाचव्या प्रश्नाचे उत्तर तिला देता आले नाही कारण त्याबाबत एकदाही तिने माहिती वाचलेली नव्हती पण लाईफलाईन मदतीला धावून आली. कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने एक करोडच्या प्रश्नाला उत्तर माहिती असूनही उरलेली तिसरी लाईफ लाईन म्हणजे फिफ्टी फिफ्टी घेतली आणि मग दोन पैकी एक अचूक उत्तर दिले आणि शेवटी एक करोड रुपये जिंकले, सात कारोडच्या प्रश्नाचे उत्तर तिला आले नाही. ते तिने वाचलेले नव्हते. मग एक करोड मधून टॅक्स कापून उरलेली रक्कम सरकारने तिला दिली. ती तिने तिच्या मेडिकलच्या शिक्षणासाठी राखून ठेवली आणि उरलेली रक्कम तिने अनाथ मुलांसाठी द्यायचे ठरवले.
* * *
बांद्र्याच्या सायन्स फेस्टिवलमध्ये सायली गेली होती तेव्हा प्रत्येक सेक्शन मधला प्रत्येक एक्सपिरिमेंट आणि उपकरण तिने जसाच्या तसा लक्षात ठेवला होता. तिथे कॅमेऱ्याला बंदी होती तरीही हरकत नव्हती कारण सायलीने यथायोग्य सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्याचे वर्णन परत घरी सगळ्यांना केले होते. पण सायलीचे पप्पा आणि तिचा भाऊ यांना प्रत्येक गोष्टीसाठी सायलीवर अवलंबून राहायची सवय लागली होती. मग ते पाढे असो की रोजच्या जीवनातले गणिती आकडेमोड असो की टेलिफोननंबर लक्षात ठेवणं किंवा मग विविध ठिकाणचे पत्ते पाठ करणं असो की मग जन्मतारखा असोत!
मात्र एक गोष्ट तिच्या नजरेतून सुटली नव्हती आणि ती म्हणजे जेवढा वेळ ती सायन्स फेस्टिवलमध्ये होती आणि आतमध्ये जाण्यासाठी रांग लावून उभी होती तेवढा संपूर्ण वेळ तिच्या आजूबाजूला एक वेगळाच मोठ्या आकाराचा हिरवा-लाल भुंगा घोंगावत होता. तो तिच्या नेहमी आसपास रहायचा. तिने अनेक वेळा त्याला हाकलले पण तो भुंगा काही तिची पाठ, कान आणि चेहरा सोडेना. सायन्स फेस्टिवल बघून झाल्यानंतर तिने बाहेर निघताना तो भुंगा उडत जाऊन दूर कुणातरी माणसाजवळ जाऊन त्याच्या भोवती घोंगावत असलेला तिला दिसला. कालांतराने ती ही गोष्ट "विसरून गेली" असे म्हणता येणार नाही पण या गोष्टीकडे तिने दुर्लक्ष केले होते!!
^^^