महात्मा गौतम बुद्ध : || चार || 8
या धर्माला प्रकट केल्यानेच जगाचा उद्धार होईल, जगाची दु:खातून सुटका होईल. ते म्हणतात, ‘जगातील सारे जीव स्वत:चा गुंतागुंतीची विविध रुपे बाजूला करतील.’ सर्वांना मोक्ष आहे. त्या परम दशेप्रत सारे पोचतील. बुद्ध एकदा सर्वज्ञ, सर्व शक्तिमान असा परमेश्वर नसतील मानीत. परंतु एक गोष्ट ते सांगतात, की तुमच्या नैतिक धडपडीच्या बाबतीत हे विश्व उदासीन नाही. हे विश्व तुमच्या नैतिक प्रयत्नांस उचलून धरणारे आहे. जे आहे त्यापेक्षा अधिक चांगले प्राप्त करुन घेण्याची जी आपली धडपड, तिला धर्माचा पाठिंबा आहे. ऋतसत्याचा आधार आहे. या नामरुपात्मक अखंड प्रवाहाच्या पाठीमागे एक सत्यता आहे. तिच्यावर श्रद्धा ठेवणा-यांस ती उत्तर देते. धर्म म्हणजे केवळ अमूर्त कल्पना नव्हे, शून्य नव्हे. या इंद्रियगम्य जगाला निश्चित स्वरुप देणारी, आधारभूत असणारी एक सत्यता खाली खोल मुळाशी आहे. या दृश्य जगातील सारे जरी नाशिवंत असले, तरी असे काही आहे, की जे अविनाशी आहे. ते जात नाही, मरत नाही. ते जे अमर असे तत्त्व ते नैसर्गिक व आध्यात्मिक स्वरुपाला प्रणाम करा; त्याची पूजा करा. गौतम जेव्हा पूर्णपणे बुद्ध झाले, ज्ञानी झाले, तेव्हा पुढे त्यांनी काय करावयाचे ठरविले? ते म्हणतात, ‘धर्माने मला जगू दे, धर्माला भजू दे, धर्माला आदरु दे.’ धर्ममय अंतर्दृष्टी म्हणजेच ज्ञानाचा प्रकाश. अष्टविध मार्गाचे अंतिम साध्य म्हणजे ही पवित्र अंतर्दृष्टी मिळवून घेणे. या जन्मातच हृदयाला मुक्त करणे, बुद्धीला मुक्त करणे, हेच अष्टाविध साधनेचे साध्य. ही जी अंतर्दृष्टी ती एक व्यक्तिविशिष्ट अशी मानसिक अवस्था आहे का? प्रेमवस्तूशिवाय ते प्रेम आहे, असे बुद्धांनी म्हटले आहे. बुद्ध सांगतात, की या जगातच त्या स्थितीत आपण प्रत्यक्ष पाहतो, धरतो अनुभवतो. त्या स्थितीत असताना आपण गोंधळातील व्यवस्था पाहतो, नाशिवंतांतील अविनाशी पाहतो, नामरुपात्मकतेतील सत्यता पाहतो. ही अंतर्दृष्टी मन शांत व निश्चल ठेवून, बाह्य जगाविषयी अनासक्त राहूनच मिळविता येते. आपण नातीचे वळण लावून घेऊन जेव्हा हृदय विशुद्ध करतो, जेव्हा आपण आपली सारी जाणीवशक्ती त्या खोल असलेल्या तत्त्ववर सोडतो, त्याच्यावर केंद्रीभूत करतो, त्या वेळेस आपल्यातील सुप्त शक्ती जागृत होतात; आणि एकदम एक नवीन अनुभव येतो. त्या अनुभवांत निर्मळ व स्वच्छ अंतर्दृष्टी असते, मोकळा व अनासक्त आनंद असतो. कोणी म्हणतात, की बुद्ध जरी धार्मिक अनुभवास उच्चतम आध्यात्मिक साक्षात्कार मानीत असेल, तरा त्या अनुभवांत, त्या साक्षात्कारांत सारभूत असे तत्त्व नाही. तो अनुभव एखाद्या ध्येयाचा असा नाही. परंतु असे म्हणणारे बुद्धधर्मातील वचनांचा भंग करतात, त्या वचनांना झुगारुन ते उगीचच्या उगीच बुद्धांवर वदतो व्याघाताचा आरोप करतात. बुद्धांनी त्यालाच धर्म हे निराळे नाव देण्याचे स्वातंत्र्य घेतले.