महात्मा गौतम बुद्ध : || एक || 8
बुद्धांचा असा हा स्वच्छ बुद्धिवाद आहे. त्यांच्या शिकवणीत गूढ असे काही नाही. आपणाजवळ काही गुह्य ज्ञान आहे असे म्हणणा-यांविषयी बुद्धांना तिरस्कार वाटे. ते म्हणतात. ‘हे शिष्यांनो, या जगात तिघांजवळ गुप्तपणा असतो, उघडपणा नसतो. स्त्रियांजवळ गुप्तपणा असतो, उघडपणा नसतो; उपाध्यायांच्या, भटभिक्षुकांच्या ज्ञानांत गुप्तपणा असतो, उघडपणा नसतो; आणि खोट्या धर्ममतांत गुप्तपणा असतो, उघडपणा नसतो. परंतु जो पूर्णपणे बुद्ध झाला, त्याची मते व त्याचे नियम सूर्यप्रकाशाप्रमाणे जगासमोर असतात. त्याच गूढ, गुप्त असे काही नसते.’ मरण्याच्या आधी थोडा वेळ भगवान् बुद्ध आपल्या आवडत्या शिष्याला म्हणाले, “ मी नेहमी सत्य उपदेशिले. सत्यामध्ये गुह्य सत्य व प्रकट सत्य असे भेद मी कधी केले नाहीत. आनंदा, तथागताजवळ झाकली मूठ नाही. एखादा गुरु आपल्या मूठीत काही बाकी ठेवतो, परंतु सत्याच्या बाबतीत तथागत असे कधी करीत नाही.” बुद्धांच्या प्रवचनांतून ते सॉक्रेटिसच्या प्रश्नोत्तररुप पद्धतीने बोलत आहेत असे दिसून येते. अनेकांशी त्यांचे प्रश्नोत्तररुप संवाद चाललेले दिसतात. प्रश्न करणारे ज्या गोष्टी गृहीत धरुन आरंभ करीत, त्याच गोष्टी त्यांना स्वीकाराव्या लागत. मोठ्या कुशलतेने बुद्ध त्यांचे मन वळवीत आहेत असे दिसून येते.
आध्यात्मिक प्रांतातील स्वातंत्र्य बुद्ध कधी हिरावून घेत नाहीत. स्वत:च्या अनुयायांनाही हे वैचारिक स्वातंत्र्य ते गमावू देत नाहीत. ते आपल्या अनुयायांना आपापल्या आध्यात्मिक स्वातंत्र्याचा भार स्वीकारायला लावतात. गुरुवर सर्व सोपवून आपण स्वस्थ बसावे, ही गोष्टी ते करु देत नाहीत. एखाद्याचा आध्यात्मिक अधिकार मान्य करुन शिष्यांनी स्वत: सत्यशोधनाचे कार्य सोडून द्यावे हे त्यांना संमत नाही. अनुयायी व शिष्य यांनाही स्वातंत्र्य असले पाहिजे. त्यांनी स्वत:च स्वत:ला प्रकाश दिला पाहिजे; स्वत:च स्वत:ला साह्य केले पाहिजे. बुद्ध म्हणतात,* ‘ज्यांना स्वत:चा आत्मा हाच दीप आहे, ज्यांना अन्य आधार नसून आत्मा हाच आधार आहे, असे तुम्ही बना; सत्यधर्म हाच ज्यांचा दीप आहे, सत्यधर्म हाच आधार आहे, असे बना.’ अधिकाराची सर्वश्रेष्ठ वाणी म्हणजे आपल्या आत्म्याची वाणी; आत्माच्या आवाजाला सार्वभौम स्थान. बुद्धांच्या शिकवणीत आग्रह नाही, हटवाद नाही. आपलेच खरे असे नाही. त्या काळात दुर्मिळ अशी विशाल दृष्टी त्यांच्याजवळ होती. अशी दृष्टी असल्यामुळे विरोधी मताचा, टीकेचा गळा ते गुदमरवू इच्छीत नाहीत. धर्माचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे असहिष्णुता असे त्यांचे मत होते.