महात्मा गौतम बुद्ध : || दोन || 7
शेवटच्या क्षणी मनुष्य एकटा असतो. फक्त त्याची इच्छाशक्ती त्याच्याजवळ असते. अशा वेळेस जगातील सारी इच्छाशक्ती त्याला पाहिजे असते. जो प्रचंड व उत्कट प्रयत्न त्याला त्या वेळेस करायचा असतो, त्या वेळेस अतूट इच्छाशक्तीची निवांत आवश्यकता असते. अशी एक सर्वसाधारण समजूत आहे, की तो जो दिव्य आध्यात्मिक अनुभव, तो मिळवायचा नसतो; तर गुरुकृपेने तो प्राप्त होत असतो. परंतु ही समजूत चुकीची आहे. या समजूतीची अर्थ इतकाच, की कोणतेही महान अनुभव हे एक प्रकारे दिलेलेच असतात. योग हा कर्मशून्य नसतो; परंतु स्वीकारणारा असतो. त्याचे जीवन म्हणजे पराकाष्ठेचा संयम. त्याचे जीवन बांधीव असते. ते व्रती जीवन असते. या अष्टाविध मार्गातील शेवटची पायरी म्हणजे सम्यक् चिंतनाची. सम्यक् चिंतन हेच अंतिम साध्य, प्राप्तव्य. अष्टाविध मार्गाचा मुकुटमणी म्हणजे हे चिंतन. ज्या वेळेस मन व इंद्रिये वारेमाप भटकत नसतात, चंचल विचार स्थिर झालेले असतात, त्या वेळेस आत्म्याची परमोच्च व परम विशुद्ध अशी स्थिती प्राप्त होते. त्या वेळेस आत्मा स्वत:चा निरुपाधिक असा अमर्याद आनंद उपभोगतो. परमोच्च जीवन ते हे. या वेळेस अज्ञान अस्तास जाते; तृष्णा शांत होते. त्यांची जागा अंतर्ज्ञान व पावित्र्यही घेतात. मनाने मनासाठी निर्मिलेली ती परमशांती असते. मनाने मनासाठी निर्मिलेला तो परमानंद असतो. ती एक प्रकारची शांत अशी निर्विकार समाधी असते. आत्म्याचे निरामय व सत्य स्नरुप ते हे. उच्चतर जीवनाची अशा वेळेस पूर्वरुची कळते. थोडीशी गोड कल्पना येते. त्या परमोच्च जीवनाशी तुलना केली असता आपले हे दैनंदिन जीवन केवळ फिकट, रोगट व रडके वाटते. त्या परमोच्च जीवनात एक प्रकारचा मोकळेपणा अनुभवास येतो. स्वातंत्र्य व ज्ञान यांचा अमर्याद असा प्रत्यक्ष अनुभव तेथे येतो.
बुद्धांनी भिक्षूंसाठी व सामान्य जनांसाठी एक चालचलाऊ जीवनप्रणाली दिली आहे. कूतदन्त नावाच्या ब्राह्मणाजवळ बोलताना बुद्धांनी सर्वांना बंधनकारक असे पाच नैतिक नियम सांगितले : हिंसा न करणे; जे आपणास लाभलेले नाही त्या विषयी उदासीन असणे; वासना विकारांचे लाड न पुरवणे; असत्यापासूर दूर राहणे; आणि पाचवी गोष्ट म्हणजे मादक पदार्थ न सेवणे. बुद्धांनी कर्मापासून दूर राहा असे कधीही सांगितले नाही. एकदा एका सामान्य जैन मनुष्याने बुद्धांस विचाकले, “आपण अ-कर्मता शिकविता का?” बुद्धांनी उत्तर दिले, “यति गौतम कर्मशून्यता मानतो असे प्रांजलपणे कोण बरे म्हणू शकेल? वाईट करु नका एवढेच मी सांगतो. काया-वाचा-मने करुन काहीही वाईट करु नका. नाना प्रकारची दुष्ट व पापमय कर्मे असतात त्यांपासून परावृत्त व्हा, ती करु नका, असे मी उद्घोषित असतो..... शरीराने, मनाने, वाणीने सत्कर्म करा असे मी सांगत असतो. नानाविध जी भली भली सत्कर्मे आहेत ती सदैव करा. हेच तर मी अट्टाहासाने सांगत आहे.” बुद्धांच्या नैतिक योजनेत सत्कर्मापेक्षाही प्रेमाला अधिक महत्त्व आहे.