महात्मा गौतम बुद्ध : || चार || 6
१) धर्माच्या कल्पनेचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. इराणी व भारतीय संस्कृतीत प्राचीन काळी ऋत म्हणजे नैतिक व नैसर्गिक अशी व्यवस्था, अशी कल्पना दिसते. या ऋताच्या सत्तेखाली, या कायद्याच्या सार्वभौम सत्तेखाली सर्व वस्तू व व्यक्ती असतात. हे सर्व चराचर ऋताने घातलेल्या मर्यादांप्रमाणे चालते. वैदिक काळातच ऋताच्या या कल्पनेत हळूहळू बाह्य जगच नव्हे, तर नैतिक जगही आले. जी तत्त्वे डोळ्यांपुढे ठेवून मनुष्य वागतो, त्याच्या चालीरीती, कायदे, शिष्टाचार या सर्वांना व्यापून ऋत असते. हे ऋत, ही नैतिक व्यवस्था कोणा देवाने नाही निर्मिली. हे ऋत स्वत:च दैवी आहे. ऋत म्हणजेच देव. ते अन्य देवदेवतांवर विसंबून नाही. वरुण व आदित्य जरी या ऋताचे पालक असले तरी ऋताला स्वयंभू शक्ती, स्वतंत्र दैवी तेज आहे. उपनिषदांमध्ये ‘धर्माहून श्रेष्ठतर काही नाही’, ‘जे धर्ममय आहे तेच सत्य व धर्म म्हणजेच सत्य’ अशी वचने आहेत. ऋत (व्यवस्था) व सत्य म्हणजे एकाच सत्यतेची व्यावहारिक व वैचारिक रुपे होत. त्या सत्यमय जगात पूर्ण सुसंवादीपणाचे जग आहं. जेथे सत्यता असते तेथे पूर्णपणे मेळ असतो. असंबद्धपणा, विस्कळीतपणा, पार्थक्य, सुसंवादीपणाचा अभाव, विसंगती, इत्यादी गोष्टी आपल्या या मर्त्य जीवनाच्या खुणा आहेत. मर्त्य जीवनाची ही लक्षणे. परंतु आपणाला व्यवस्थितपणाची प्रीती वाटत असते. सत्याचे संशोधन आपण करीत असतो. ह्यावरुन सुसंवादी असे जे ते दुसरे जग, त्याच्याशीही आपले धागेदोरे असले पाहीजेत असे दिसते. ते जे निरुपाधिक तत्त्व आहे, ते म्हणजेच सत्यता, असे सांगण्यावर उपनिषदांचा भर आहे. सत्य व धर्म यांच्याशी त्या निरुपाधिक तत्त्वाला उपनिषदांनी एकरुप केले आहे. या प्रत्यक्ष जगात कार्यकर अशी जर कोणती प्रभावी शक्ती असेल, तर ती धर्म होय असे बुद्धधर्म अट्टाहासाने सांगतो. निरुपाधिक तत्त्व म्हणजेच सत्य यावर तितका जोर न देता ‘निरुपाधिक तत्त्व म्हणजे धर्म’ या गोष्टीवर बुद्धधर्माने जोर दिला. उपनिषदांनी उपपत्तीवर, वैचारिक मीमांसांवर भर दिला. बुद्धधर्माने त्याच तत्त्वाच्या व्यावहारिक स्वरुपावर भर दिला. धर्म म्हणजेच सर्व चराचरात भरुन राहिलेली व्यवस्था. धर्म म्हणजेच निसर्गातील नियम; कार्यकारणभावाची साखळी म्हणजे धर्म; जातीचे नियम म्हणजे धर्म. धर्मात सारे येते.
“भगवन, कोणाला पूज्य मानावे? राजाधिराज कोण?” कोणी तरी प्रश्न केला.
“धर्म हा राजाधिराज.” बुद्धंनी उत्तर दिले.
धर्म म्हणजे निरपेक्ष, प्रमादातीत न्याय. त्या सर्वश्रेष्ठ सत्यमय न्यायाची छाया म्हणजे आपला भौतिक न्याय, मर्त्य न्याय. हळूहळू धर्म हा शब्द वस्तूच्या स्वरुपाला व विशिष्टत्वाला, वस्तूच्या भूमिकेला व कारणालाही लावण्यात येऊ लागला.