महात्मा गौतम बुद्ध : || तीन || 7
माणसा-माणसांच्या जीवनात जे आश्चर्यकारक अप्रमाण दिसते, त्याला दैवी शक्ती जबाबदार नाहीत असे बुद्ध म्हणत. ईश्वर म्हणजे मूर्तपुरुष अशी कल्पना बुद्ध स्वीकारीत नाहीत. आपल्या झगड्यांत ईश्वर भाग घेत असतो, विश्वाच्या व्यवहारात ढवळाढवळ करणारा हा कोणी सुलतान आहे, अशा प्रकारच्या ईश्वरविषयक कल्पना बुद्धांच्या नव्हत्या. ईश्वरावर जोर देणे म्हणजे मानवाचे स्वातंत्र्य हिरावून घेणे होय, असे त्यांना वाटे. बुद्धांना महत्त्वाची गोष्ट वाटत होती ती ही, की ईश्वर अतिमानवी प्रांतांत कशा रीतीने आविर्भूत होत असतो हे महत्त्वाचे नसून व्यक्तीत, या प्रत्यक्ष दृश्य जगात, तो विश्वात्मा कशा रीतीने प्रकट होत आहे ही गोष्ट त्यांना महत्त्वाची वाटत होती. या विश्वाचे नियमन धर्म करहो, नैतिक कायदा करतो. हे जग देवांनी, देवदूतांनी नाही बनविले; तर मानवांच्या स्वेच्छेने ते निर्माण ढाले आहे, बनले आहे. मानवी इतिहास म्हणजे मानवी जीवनाचा सामग्याने झालेला परिणाम; मानवी इतिहास म्हणजे मानवांना घेतलेले निर्णय, मानवांचे अनुभव. ज्या परिस्थितीत आपण जन्मतो, ती परिस्थिती भूतकाळातील अनेक स्त्री-पुरुषांच्या कृत्यांतून निर्माण झालेली असते आणि आपणही सर्वजण आपापल्या शक्तीप्रमाणे आपल्या कर्मांनी व संकल्पांनी इतिहासातील पुढचा क्षण काय येणार? ठरवीत असतो. मानवी इच्छाशक्ती कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम् अशी सार्वभौम वस्तू नाही ही गोष्ट बुद्ध जाणतात, इतर कोणापेक्षही अधिक यथार्थाने जाणतात. मनुष्य जरी स्वप्रयत्नांनी, स्वत:च्या इच्छाशक्तीने सभोवतीचे जग बदलतो, त्याला आकार देतो, तरी हे जगही पदोपदी आपणास अडथळे करीत असते यात शंका नाही. आपणास सभोवतीच्या सजीव-निर्जीव सृष्टीशी सारखी टक्कर द्यावी लागत असते, ही गोष्ट बुद्ध जाणून आहेत. मनुष्य व परिस्थिती यांची अन्योन्य क्रिया-प्रतिक्रिया सारखी सुरु असते व यातूनच इतिहासाचे महावस्त्र विणले जात असते. मानवी प्रयत्नाला म्हणूनच महत्त्व आहे, किंमत आहे. मानवी प्रयत्न उपेक्षणीय नाही.