महात्मा गौतम बुद्ध : || दोन || 5
पूर्णतेकडे जाण्याचा सोपान म्हणजेच बुद्धांनी सांगितलेला अष्टविध मार्ग. पहिली पायरी म्हणजे सम्यक दृष्टी असणे; चार सत्यांचे ज्ञान असणे. हे ज्ञान म्हणजे उपनिषदांतील ज्ञान नव्हे. देव वगारे मानणा-यांच्या श्रद्धेशीही या ज्ञानाचा संबंध नाही. परंतु केवळ बुद्धीने सत्याचे आकलन केल्याने ज्ञान जिवंत होत नसते. जी सत्ये आपणास कळली ती स्वत:च्या जीवनात आपण प्रकट केली पाहिजेत, सिद्ध केली पाहिजेत, अनुभवली पाहिजेत, शोधली पाहिजेत. असे केल्यानेच ज्ञान सजीव होते, प्राणमय होते. पहिले पाऊल म्हणजे सदैव जागरूक असणे, भानावर असणे. ज्या मार्गाने गेल्यास आपण सत्यचुत व ध्येयचुत होऊ, तो मार्ग चुकूनही न घेण्याची सदैव दक्षता म्हणजे ही पहिली पायरी. केवळ तात्पुरता मनात बदल होणे असा येथे अर्थ नाही. तर आत्म्याच्या खोल आंतरिक जीवनावर परिणाम घडवणारे मूलग्राही परिवर्तन, एक नवीन योजना, असा याचा अर्थ.
ही पहिली पायरी दुस-या पायरीकडे नेते. दुसरी पायरी म्हणजे सुखभोगांच्या त्यागाचा निश्चय; कोणासही अपाय न करण्याचा, कोणाचाही द्वेष, मत्सर न करण्याचा निश्चय, सम्यक भाषणासाठी असत्य, निंदा, शिव्याशाप, लागेल असे बोलणे, वायफळ गप्पा यांचा त्याग करायला हवा. सम्यक् आचार म्हणजे कोणतीही हिंसा न करणे; जे आपणास लाभलेले नाही त्याविषयी उदासीन असणे; शारीरिक सुखभोगांस मर्यादा घालणे, शरीराचे फार चोचले न पुरवणे. सम्यक जीवन म्हणजे जगण्याचे जे जे निषिद्ध प्रकार, त्यांनी उपजीविका न करणे; उदाहरणार्थ, उंटावर किंवा बैलावर माल लादून व्यापार करणारे लमाण न होणे; दासांचा व्यापार न करणे; खाटिक न होणे; मादक पदार्थ विषारी पदार्थ यांचा व्यापारी न होणे; जकातदार किंवा खानावळवाला न होणे. बुद्धांनी सैनिक होण्यास कधीही संमती दिली नाही. भिक्षूंनी कधीही सैनिक होऊ नये, असे त्यांनी आज्ञापिले.
बुद्धांचा जो हा अष्टविध मार्ग आहे, तो नीतिनियमांची एक जंत्री नाही. जीवनाचा हा विशिष्ट मार्ग आहे सम्यक. प्रयत्न म्हणजे ज्या दुष्ट प्रवृत्ती मनात दृढमूल झालेल्या असतील, त्या नष्ट करणे व सत्प्रवृत्तींना पोसणे; उत्तरोत्तर अधिक पूर्णतेकडे जाणे. मनोविकासाचा हा आरंभ आहे. आत्मपृथक्करणाची सवय असणे चांगले. आपल्या वरवरच्या मानसिक जीवनाच्या खाली मनाचा जो अपरंपार भाग आहे, त्याची नीट कल्पना येण्यासाठी आत्मपरीक्षण फार उपयोगी पडते. दुष्ट वासना-विकार, नाना लोभ, स्वार्थ, तृष्णा, यांची खोल गेलेली पाळेमुळे खणून काढण्यास आत्मपरीक्षणची आवश्यकता असते. गुंतागुंतीच्या या मानसिक व शारीरिक यंत्रात मेळ राहावा, समतोलपणा राहावा म्हणून आत्मपृथक्करण हे एक मोठे प्रभावी साधन आहे. मनुष्य दुस-याचीच वंचना करतो असे नाही, तर स्वत:चीही वंचना करतो.