महात्मा गौतम बुद्ध : || चार || 1
।।चार।।
बुद्ध नाना प्रकारच्या मतांच्या वादांना प्रोत्साहन देत नसत. आंतरिक शांतीला, नैतिक प्रयत्नांना, त्यामुळे बाध येतो असे त्यांना वाटे. या अशा वादविवादांनी शेवटी आपण अतिगहन व गूढ अशा गोष्टींजवळ जाऊन पोचतो. त्या गहनगूढांचे उत्तर मिळण्याचा हट्ट आपल्या बुद्धीने धरता कामा नये. जीवनाला जी किंमत आहे, जो अर्थ आहे, त्याला कारण जीवनापाठीमागे असणारी ही गूढता आहे. जी अनंतता बुद्धीच्या कक्षेत येऊ शकत नाही, अशी अनंतता व अपरता जीवनाच्या पलीकडे आहे. म्हणून तर जीवनाला अर्थ आहे, मोल आहे. हे दृश्य जमत् म्हणजेच जर सारे असेल, हे जगत् व मानव जर स्वयंपूर्ण असतील, यांच्या पलीकडे अधिक खोल, उच्चतर, गहन-गंभीर असे जर काहीच नसेल, तर या संसारातील दु:ख-क्लेश, नाना प्रकारचे पापताप, केवळ असह्य होतील. आपली बुद्धी अशा प्रकारच्या अतींद्रिय, अति-ऐतिहातिक, दिक्कालातीत सत्यतेची मागणी करते, म्हणून आपण अशी सत्यता मानतो असे नाही. तर जे इंद्रियगम्य आहे, जे दृश्य नामरुपात्मक आहे, ते एका गूढतेने व्यापिलेले आहे व तेथे विचाराची गती कुंठीत होते, म्हणून ती सत्यता आपण मानतो. या विश्वापाठीमागे काहीतरी आहे असे मानणा-या सर्व धार्मिक पद्घती त्या दिव्य शक्तीची भव्य वर्णने करतात; त्या दिव्य तत्त्वाचा आपणाशी असणारा जो संबंध, त्याचे उत्कट वर्णन करतात. परंतु या सर्व धर्मपद्धती जीवनाच्या अंतिम प्रश्नांना हात लावीत नाहीत. या सर्व पद्धती एक प्रकारे बाहेर वावरणा-या आहेत. यांच्यापेक्षा या विश्वाच्या पाठीमागे काहीतरी गूढ आहे; परंतु ते काय आहे ते सांगता येत नाही असे सांगणारी, त्याविषयी मौन धरणारी धर्मपद्धती एका अर्थी त्या खोल प्रश्नांच्या अधिक जवळ आपणास नेते. गूढतेमुळे बौद्धिक विचाराला मर्यादा पडते, तार्किक व्याख्यांना मर्यादा पडते. ‘त्यांच्यासमोर वाणी मागे मुरडते; मनालाही ते न सापडल्यामुळे मागे फिरावे लागते.’ बुद्धांचे मौन दर्शविते, की ते एक महान गूढवादी होते. तरीही त्यांच्या अनुयायांनी पुढच्या काळात त्यांच्या मौनाचे नाना प्रकारे व्याख्यान केले, त्या मौनातून नाना मते त्यांनी काढली. मनुष्यामध्ये तत्त्वजिज्ञासू वृत्ती आहे. ती कायमची दडपता येत नाही. सीलोनमधील लेखांवर विश्वास ठेवला तर बुद्धांच्या मृत्यूनंतरच्या दुस-याच शतकात बुद्धधर्मात निरनिराळे १८ संप्रदाय उत्पन्न झाले होते असे मानावे लागेल.