शिशिरकुमार घोष 22
परंतु स्वत्व विसरणारा मनुष्य स्वत:चे अनुभव असे लिहूं शकत नाही. जो प्रेमानें बोलेल, त्याच्याजवळ ते आपले अनुभव प्रेमानें सांगतात. याप्रमाणें देशाची कशाचीही पर्वा न करितां, मानापमानाची, धनदौलतीची क्षिती न बाळगतां या महापुरुषानें सेवा केली. परंतु राजकारण हा खळाळीचा, धकाधकीचा मामला. चिरकालचे प्रश्न दुसरेच असतात. त्यांवरही शिशिरकुमारांनी जन्मभर व्यासंग केला. प्रथम देशाच्या हिताची जागृती दिली. नंतर परमेश्वराची जागृतीही करुन दिली. ते खरोखर प्रेमळ भक्त होते. त्यांचे जीवन परमेश्वरी प्रेमाने परिपूर्ण होतें. इतर विकारांना तेथें वाव नव्हता. प्रभु गौरांगाचें नांव उच्चारल्याबरोबर तनु पुलकित व्हावी, डोळयांतून आनंदाश्रु वहावे, व यांची समाधी लागावी असा अनेकदां अनुभव येई. सर्व ठिकाणी परमेश्वर आहे, या भावनेचा मनुष्याच्या मनावर किती परिणाम झालेला आहे, यावरुनच मनुष्याची खरी पारख करतां येईल. अनेक कार्ये करीत असतां'तूं माझा सांगाती'असें म्हणणारा पुरुषच भक्त होय. शिशिरबाबू भक्त होते-परंतु कर्मयोगी भक्त होते. कर्म म्हणजेच परमेश्वराची सेवा होय ही त्यांची खात्री होती. आपणांस शिशिरबाबूंप्रमाणे लोकोत्तर बुध्दि नसेल, आपणांमध्ये धडाडी, कार्यतत्परता, उद्योगीपणा, हे गुण नसतील. परंतु प्रेमाने परमेश्वरास आळवणें हें तर आपणांस शक्य आहे की, नाहीं?जी कांही लहानसान गोष्ट आपण करुं तिचें कर्तृत्व स्वत:कडे न घेता सर्व कर्ता करविता नारायण आहे, त्याची इच्छा आहे, असा मनांत विचार बाळगण्यास बुध्दिमत्तेची जरुरी नाही. येथे शरणागति पाहिजे. परमेश्वर्पण कर्म करण्यास शिका हेंच शिशिरबाबू शिकवितात. परंतु या त्यांच्या शिकवणीकडे पाहून आपण काय करुं लागतों हें आपण पाहिलें पाहिजे. नाही तर त्यांची चरित्रें वाचली, लिहिली तरी त्यांचा काय बरें फायदा? 'बोलणे फोल झालें, डोलणे वायां गेलें असेंच म्हणावे लागेल.
शिशिरकुमारांनी आपल्या वैष्णवधर्माची जी अनेक तत्वें सांगितली आहेत. त्यांतील प्रमुख तत्वें सांगून हें छोटेखानी चरित्र आपण संपंवू. १ ईश्वर या जगतीतलावर स्वत: अवतार घेतो. किंवा मार्गदर्शक पाठवितो. (परित्राणाय साधूनां. . . . . . . . . ) २ ये यथा मां प्रपद्यन्ते । तां स्तथैव भजाम्यहम्-जर तुम्ही ईश्वरास प्रेममय मानाल तर तुम्हांस तो प्राणमय दिसेल. तुमच्या इच्छेप्रमाणें ईश्वर आहे. ३ There is one God & no equal. परमेश्वर एक आहे. ४ ईश्वर फार मोठा असला, तरी तो मनुष्यासारखाच आहे.
वैष्णवांचा धर्म म्हणजे प्रेमाचा धर्म आहे. तो ईश्वराजवळ फक्त प्रेमाची भक्ति मागतो. किंवा भक्तियुक्त प्रेम मागतो.
ही वैष्णवधर्माची तत्वें विवरण करणें म्हणजेच एक ग्रंथच होईल. परंतु यावर स्वत: या महापुरुषाने मोठमोठें ग्रंथ लिहिले आहेत. त्याचा ज्यांस घेतां येईल. त्यांने आस्वाद घ्यावा. आणि या साधुतुल्य कर्तव्य रत पुरुषांची मनांत पूज्यस्मृति ठेवावी म्हणजे झालें.