Get it on Google Play
Download on the App Store

शिशिरकुमार घोष 1

हिंदुस्थानला कुंभकर्णी झोपेंतून खडबडून जागें करण्यांत ज्या कांही अलौकिक सामर्थ्याच्या व्यक्ति गेल्या शतकांत जन्मास आल्या त्यांत बाबू शिशिरकुमार घोष यांस फारच वरचे स्थान द्यावें लागेल. बंगालमध्यें लोककल्याणाचा मार्ग त्यांनी चोखाळला. लोकांसाठी, रयतेसाठीं झगडण्यासाठीं १८-१९ वयाच्या सुमारास यांनी सरकाराजवळ दोन  हात करण्यास सुरुवात केली. आपल्या खेडयाची, जन्मग्रामाची सुधारणा करण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले. राजकीय शिक्षण देण्यासाठी वर्तमानपत्र काढले. विद्वान् लोक एकत्र विचार करावयास जमावेत म्हणून संस्था सुरु केली. धर्मावरील श्रध्दा नवीन शिक्षणामुळें जी ढांसळली होती ती त्यांनी पुन:दृढ केली. प्रभुगौरांगाच्या चरित्रावर सहा भागांत विस्तृत व मनोरम चरित्रग्रंथ लिहून बंगाली साहित्याची व वैष्णव धर्माची अमोल सेवा केली. पारलौकीक विद्येचा प्रसार व्हावा एतदर्थ त्या विद्येचें मासिक काढलें. अशा प्रकारें लौकिक, सामाजिक, धार्मिक सर्व प्रकारांनीं लोकांची सेवा करणारा, अहर्निश कर्तव्यतत्पर आणि कर्तव्य करीत असतां शांतपणें देह सोडणारा असा हा महात्मा डोळयांसमोर, अंतश्चक्षूंसमोर आला म्हणजे दृष्टि त्याच्याकडे खिळून जाते, हृदय भरुन येतें, आपण कर्तव्यपराड्:मुख आहोंत याबदद्ल शरम वाढून काहीतरी उद्योग, श्रमसातत्य आपआपल्या बुध्दीनुसार मगदुराप्रमाणे करीत राहिले पाहिजे असा ध्वनि अंत:करणांत घुमुं लागतो. सज्जनांच्या सहवासांत अंत:करणांतील सुप्त संदेंश जागृत होतो. सज्जनांच्या संगतीत सत्य व  सुंदर अशा व वस्तूंवर आपली दृष्टी खिळूं लागते. असद्विचारांचा अस्त होतो. कर्तव्याचा रस्ता दिसूं लागतो. अज्ञानाची, आलस्याची राती संपून, कर्तव्यजागृतीची उषा उजळूं लागते. हा काही थोडाथोडका  फायदा नाही. ज्यांच्या चारित्रानें मन पावन व विशाल होईल अशांपैकीच शिशिरबाबू एक आहेत. त्यांचे अल्पसे चरित्र मी येथे देण्याचे मनांत आणिले आहे.

शिशिरबाबूंचा जन्म १८४० साली जशोहर जिल्हयातील एका गांवीं झाला. त्यांच्या वडिलांचे नांव हरीनारायण व आईचें नांव  अमृतमयी.  वडील हे त्या गांवचे एक प्रमुख मुखत्यार असते. त्यांचा स्वभाव धर्मशील प्रेमळ होता. आई तर नांवाप्रमाणेच  खरोखर गोड स्वभावाची होती. या आईचें मुलांवर अत्यंत प्रेम असे. आपली मुलें ईश्वराची भक्त व धर्मशील निपजावी ही तिची इच्छा. परमेश्वरानें या माउलीची इच्छा खरोखर पूर्ण केली.

या धर्मशील जोडप्याला आठ मुलें झाली. हे आठी मुलगे होते. या सर्व भावंडात वडील जो होता त्याचे नांव वसंतकुमार. शिशिर  बाबू हा  तिस-या क्रमाचा होता. या दोन भावांत सहा वर्षांचे अंतर होतें. वसंत कुमार हा खरोखर ईश्वराचा लाडका पुत्र होता. तो इंग्रजी व संस्कृत यांत नाणावलेला पंडीत होता. त्याचें वाचन दांडगे होतें. परंतु ज्या एका गोष्टीमुळें त्याच्यावर सर्व भावांचा जीव की प्राण असे ती गोष्ट म्हणजे त्याची ईश्वरावरील अढळ निष्ठ. त्याचें शील अप्रतिम होतं; त्याचें आचरण धुतल्या तांदळासारखे  निष्कलंक होतें. त्याचें भावांवर अलोट प्रेम  होतें शिशिर कुमारनें मनुष्याच्या आत्यंतिक नि:श्रेयसाच्या प्रश्नांचा विचार वसंतकुमारांच्या चरणसरोजांजववळ बसून केला. आपल्या उतारवयामध्यें सद्विचारांची मौक्तिकें जी या सत्पुरुषाने उधळली. त्यासाठी आपल्या दैवी तेजाच्या वडील बंधूचे शब्दबिंदू आपल्या हृदयशक्तिकेंत सांठवून ठेविले.  भक्तिभावाची अंधश्रध्देच्या आणि संशयाच्या बाजारांत लुटालुट करविली.  भक्तिभावाचे कोठार लुटविले. त्यासाठी बीज वसंत कुमारांनी शिशिरच्या हृदयभूमीत पेरुन ठेविलें होतें. वसंतकुमारांनी खरोखरच या रखरखीत प्रदेशांत वसंत ऋतु आणला असता परंतु देशाचें दुर्दैव, आमचें कमनशीब.  या माहात्म्याला परमेश्वराने ३२ व्या वर्षीच निजधामास नेलें.  माझया लाडक्याला जगाची दृष्ट लागेल म्हणून परमेश्वरासही भीति  वाटली का?