शिशिरकुमार घोष 4
परंतु मुख्य गोष्ट लक्षांत ठेवावयाची ही की, केवळ आशा, वासना बाळगून जगांत कार्ये उठत नसतात. दगडांचे पक्के मनोरे उभारावयास निढळाचा घाम सांडावा लागतो. रक्त आटवावें लागतें. रात्रीचा दिवस करावा लागतो. श्रमाशिवाय ईश्वरांचे प्रेम मिळत नाही. ईश्वराच्या प्रेमाशिवाय भाग्य व आनंद ही लाभत नाहीत.
खरी उत्कंठा असली तर मनुष्य कार्यप्रवीण होतो'मला अमुक शहर पाहावयाची फार उत्कंठा असेल तर मी हजारों प्रयत्न करुन ती सफळ करीन. परंतु जगांत गंमत अशी आहे कीं, मुळी उत्कंठाच प्रखर व अमर नसते. आणि कार्य हातून होत नाही म्हणून मनुष्य निराश होतो. कपाळास हात लावतो. माझें म्हणणे असें आहे की, जेथे उत्कंठा असते तेथें तत्सिध्दयर्थ प्रयत्न असतोच. त्याच मनुष्याला बावनकशी उत्कंठा असेल की, जो तदर्थ अखंड झिजतो आहे.
आपला गांव नमुनेदार बनविणा-या या बंधुवर्गाची इच्छा अशीच जोरदार होती. लगेच आपल्या विचारांस मूर्त स्वरुप देण्याचा त्यांनीं आरंभ केला. विचाराला मूर्त स्वरुपांत पाहणें ही मनुष्याची वृत्ती आहे. ईश्वराला आपण मूर्तिमंत बनवितो, त्याप्रमाणें आपल्या ध्येयांना आपण मूर्तिमंत केलें पाहिजे.
वडील हे पैसे मिळविते असल्यामुळें पोटापाण्याचा प्रश्न या बंधुवर्गास नव्हाता. देवाधर्माचा भुंगा लावून घेण्याची त्यांस आज ईश्वरकृपेने जरुरी नव्हती. आपल्या मुलांना समाधान व सुख व्हावें त्यांची मनें प्रसन्न असावींत हीच आईबापांची इच्छा होती. आई तर एक माउली होती. घराची स्थिती अशी सर्वतोपरी अनुकूल असल्या कारणांने वसन्त कुमार, हेमन्त कुमार, शिशिर कुमार या त्रिवर्गानी आपल्या जन्माग्रामाच्या उध्दारार्थ तयारी चालविली. या गांवांत बाजार नव्हाता. तेव्हां त्यांनी नवीन बाजार वसविला आणि त्यास आपल्या पूज्य आईच्या नांवावरुन 'अमृतबझार' हें नांव दिलें. त्या वेळेपासून आज तागाईत हा गांव आतां याच नांवाने ओळखला जातो. आईचें नांव चिरस्मरणीय करुन ठेविलें.
परंतु याहून महत्वाच्या गोष्टी त्यांनी केल्या. जनतेला सुधारावयाचें असल्यास ती शिक्षित झाली पाहिजे. लहानांपासून थोरापर्यत सर्वास लिहिता, वाचतां, विचार करतां आला पाहिजे. ही गोष्ट या त्रिवर्गाच्या मनावर बिंबली होती. सरकारच्या सहाय्याने एक इंग्रजी शाळा त्यांनी सुरु केली. एक मुलींची शाळाही उघडण्यांत आली. परंतु विशेष तारीफ करण्यासारखी धैर्याची गोष्ट म्हणजे तरुण स्त्रियांसाठी त्यांनी काढलेली शाळा. ईश्वरचंद्रदिक सुधारक अजून फार प्रसिध्द झाले नव्हते. अशा वेळेस जुन्याला सोनें मानणा-या, जुन्या चालीरीतींस फांटा द्यावयास तयार नसणा-या लोकांत लग्न झालेल्या, वाढलेल्या तरुणीस शिक्षण देण्यासाठी शाळा काढणें ही गोष्ट धाडसाची व धैर्याची खरी यांत तिळमात्र शंका नाही. जी गोष्ट हितप्रद वाटली, मनास व बुध्दीस पटली, ती. लोकांच्या गळीं उतरवलीच पाहिजे, असा जोरदार व कार्यकर्त्या पुरुषांचा निश्चय असतो. १८६० च्या सुमारास ब्राम्हण, कायस्थ अशांच्या समोर अशा गोष्टीस सुरुवात करणें म्हणजे १८५७ सालच्या बंडाप्रमाणे निशाणच उभारणें होतें. त्यांची निंदा व उपहास करण्यांत आला, त्यांना बहिष्कृत करण्यांत आलें. परंतु सत्याचा रोपा मेला नाहीं, शाळा भरभराटली व तिचे फायदे लोकांस समजून येऊ लागले. कळकळीने केलेल्या कामाला भगवंत यश देतोच. न दिलें तर प्रयत्नांत कसूर असते असें म्हणावयास विशेषशी हरकत दिसत नाही.