शिशिरकुमार घोष 6
परंतु अशा धाडसानें व जोरांने चालविलेलें हें पाक्षिक लवकरच बंद करण्यांत आलें. त्या वेळेस वाहतुकीची साधने नव्हती. बंगालमध्ये रेल्वेचा व्यापार वाढला नव्हता. या बंधुवर्गाच्या गांवापासून कलकत्यास जाण्यास तीन दिवस लागत. छापण्यासंबंधीच्या सर्व गोष्टींचा संचय व पुरवठा करण्यास पंचाईत पडूं लागली. तेव्हां मोठया कष्टाने हा उद्योग थांबविण्यात आला.
शिशिर मनानें व बुध्दीनें अशा रीतीनें वसंतच्या तालमींत तयार होत असता, त्यानें आपल्या शरिराची अवहेलना केली नाही. 'शीर सलामत तर पगडी पचास' ही म्हण त्याच्या मनावर चांगली बिंबली होती. या भावांभावांमध्यें उत्कट बंधुप्रीती होती. एकमेकांसाठी प्राण देण्यास ते अहमहमिकेनें पुढें आले असते. सर्वाचा नायक शिशिर असे तो चपळ व उत्साही असे. त्याच्या रोमरोमांत जीवनरस मुसमुसलेला होता. त्याची मूर्ति चैतन्यमय होती. आळस, उदासीनता यांना तेथें थारा नसे. उल्हास व उत्साह यांची ही अभिनव मूर्ति कोणास मोहविणार नाही? आपल्या भावांसाठी नानाप्रकारची नवनवीन खेळ शोधून काढण्यांत त्याचा हातखंडा असावयाचा. वसंत व हेंमत हे दोन मोठे भाऊ, मोतिलाल व हिरालाल हे दोन धाकटे बंधू या शिशिरवर अगदी लुब्ध असत. तो कवाईत शिकला व त्यानें आपल्या भावांस व गांवांतील तरुण मुलांस शिकविली. झाडांवर चढण्यात तो पटाईत असे. गावांतील सर्वात उंच झाड जें असेल, ज्याच्यावर इतर चढावयास चळाचळा कापंतील, त्याच्यावर चढण्याची शिशिरची तयारी ठेवलेलीच. अर्थातच मग सर्वजण त्याची तारीफ करावयाचे. 'कपोताक्षी' ही त्याची आवडती नदी. या नदीत तो तासच्या तास पोहत राही. पोहण्याच्या विद्येत त्यानें फारच प्रावण्यि मिळविलें होतें. जेसोरो शहारात 'भेलापुष्कर' म्हणून एक विस्तीर्ण तळें आहे. या तळयामध्यें विश्रांती न घेता ५० वेळा शिशिरने फे-या केल्या. चार तास पाण्यांत तो पोहूं शके. यामुळे त्याची पोहणारा म्हणून प्रख्याति बरीच झाली. तो व त्याचे सवंगडी होडयांच्या शर्यती लावावयाचे, नौकाविहार हा शिशिरला फार आवडे. घोडयावर बसण्यांतही तो तरबेज होता. घोडा जितका जातिवंत, तल्लख व पाणीदार तितका शिशिरला जास्तच जोर यावयाचा. बेफाम घोडयासही त्यानें नरम आणावा अशी त्याची मांड अढळ असे. तो पळणारा फारच चपळ होता. त्याच्या जिल्हयांत तो पळणा-यांत पहिला होता. आणि सर्व खेळांत, कुस्त्यात त्याची चांगलीच प्रगति होती. तो जेथें जेथें जाई तेथें तेथें त्याच्या राजबिंडया शरिराकडे सर्वांची दृष्टि वेधे. त्याच्या तोंडावरचा मोहक तजेला, पाणीदारपणा सर्वांच्या नेत्रांचे पारणें फेडी. कोणचेंही कार्य त्यानें हाती घेतले. की लोक उत्सुकतेनें पहावयाचेच. अशा प्रकारें शिशिरचें शरीर पीळदार, कसलेलें व जोमदार होतें. कणखरपणा, त्याचबराबर खेळामंधील सुबकपणा त्याच्या अंगांत आला होता शरीराने व मनानें शिशिरनें आपली उन्नति करुन घेतली होती. परंतु त्याच्या आत्म्याची उन्नति या वेळीं कशी झाली तीहि पाहण्यासारखी आहे.
गांवांतील लोकांची बौध्दीक, नैतिक, पारलौकीक उन्नति व्हावी एतदर्थ या त्रिवर्ग बंधूंनी एक संस्था स्थापन केली होती. या संस्थेस ते भ्रातृसब असें म्हणत. दुस-या दोन सभा होत्या. त्यांस अनुक्रमें ब्राम्हासब, हरीसब अशी नांवे होती. या सभांमधून वसंतकुमार व हेमंतकुमार हे व्याख्यानें देत व विशेष पुढाकार घेत प्रार्थना करावयाची किंवा व्याख्यान द्यावयाचें या गोष्टी जरी हे दोघे ज्येष्ठ बंधु विशेष करुन करीत तरी शिशिरशिवाय त्यांचे चालत नसे. कारण शिशिर आला की, आशा व उत्साह, चैतन्य आणि संगीत तो बरोबर आणावयाचाच.