Get it on Google Play
Download on the App Store

शिशिरकुमार घोष 13

परंतु आपल्यावर जबाबदारी शिशिरबाबूंनी घेतली होती. त्यांनीही सरकारनें दाखविलेली कृपा सांभार परत केली. अर्थातच  खटल्यास सुरुवात उद्या होणार होती. खटला सुरु झाला. एक मोठा थोरला जामीन घेऊन शिशिरबाबूंस मोकळें ठेवलें होतें.

उद्यांचा खटल्याचा शेवटचा दिवस होता. जवळ जवळ एक आठवडाभर खटला चालला. उद्या ११ वाजतां कोर्टात हजर राहिलें पाहिजे.  नाही तर जामिनकीचे पैसे भरले पाहिजेत; व कोर्टांची बेअब्रू करण्याचा दुसरा गुन्हा शाबीत होईल. 

दुसरा दिवस उजाडला. १० वाजले तरी अद्याप शिशिरबाबूंनी स्नान केलें नव्हतें. त्यांनी आज कांहीही खाल्लें नव्हते. इतक्यांत  एकाएकी त्यांस काव्यस्फुर्ति आली. हृदय अचंबळून आलें. भावनांचा भोंवरा फिरु लागला. जवळ कागद ना शाई, दौत ना लेखणी. भावनावश कवि हें शोधावयास थोडाच जाणार होता! एक कोळशाचा तुकडा घेऊन समोरील भिंतीवर त्यांनी पाहिले दोन चरण लिहिले. नंतर माघारी वळले. परंतु पुन:भिंतीकडे जाऊन दुस-या दोन ओळी त्यांनी लिहिल्या.  अशा प्रकारें पुढे मागें करुन एक स्वर्गीय सौंदर्याची दिव्य कविता त्यांनी लिहिली. ती त्यांनी तालसुरावर बसविली. आतां. प्रसन्न मुद्रेने स्नानास गेले. थोडेंसे खाऊन वेळेवर न्यायमंदिरांत हजर झाले.

या गाण्यामध्ये काय बरें होतें. ?या गाण्यामध्ये ईश्वरावरील त्यांची  अढळ श्रध्दा उत्कटत्वानें दिसत होंती.

'परमेश्वरा, शेवटीं मला तुझा अनुभव आलां. तूं माझा पिता आहेस व मी तुझें लेंकरु आहें. या ज्ञानामुळे आज किती अननुभूत आनंद मला हो आहे!' या जगांतील सुखदु:खांना आतां कोण भीक घालता! तुझी पूजा करण्यांत तुझें यशोगान गाण्यांत, माझें शेष आयुष्य जावो  ही शेवटची इच्छा आहे. 

देवा, मला तुम्ही फटके माराल? तरी त्यांची मला खंत नाही. कारण तुझ्या मारण्यांने दु:ख होत नसतें. त्यांतहि एक प्रकारची गोडीच असते. तुझे वटारलेले डोळे मला भिववू शकत नाहीतं. कां बरें? मी तुमचा मुलगा नाही का? खरोखरच त्या रागीट  मुद्रेच्या आंतल्या बाजूस प्रेमाचा सागर सांठलेला मला दिसतो आहे.

जेव्हा आई बाळाला मारते तेव्हा आईच्याच पोटाशी मूल आश्रया साठी चिकटते. हे परमेश्वरा, मला मारावयाचे असेल तितकें मार. परंतु शेवटी माझे अगणित मुके तुला घ्यावे लागतील व तूं मला गुदमरवून  टाकशील' असो हा खटला आठ माहिने चालला होता. सेशन्स जज्जनें शिशिरबाबूंस शिक्षा ठोठाविली नाही. खरें पाहिलें तर शिशिरबाबूंच्या  विषयी या न्यायमूर्तीच्या मनांत काळेंबेरें होतें. द्वेष होता. परंतु शिशिरबाबूंची प्रकृति हिवतापानें फारच हल्लक झाली होती. त्यांच्या कृश शरीराकडे पाहुन त्यांस जर कोणी शिक्षा दिली असती, तर ती मरणांतिकच झाली असती. कारण ते जिवंत राहतेना. आठ महिने खटला चालून शिशिरबाबू निर्दोषी ठरले हें खरें. परंतु एकंदर कुटुंबांची स्थिति फार चमत्कारिक झाली होती. जवळ पैसा मुळीच राहिला नव्हता. सर्व घराणें बसल्यासारखें झालें. थोडसा शिशिरबाबूंचा धीर खचला. आतां या खेडेगांवांत राहून निर्वाह होणें कंठीण दिसत होतें. ३० माणसांचे कुटुंब कांही विठोबा रखुमाई जोडपे नव्हे. एवढयांचा गुजराणा व्हावा कसा?