प्रेम कथा: सरप्राईज - राहुल दवे, मिशिगन
फोन: +1-734-720-2744
साल – 1996
"अगं अनु, दहा वाजलेत, झोप आता. नाहीतर पहाटे तुला जागं करता करता माझ्या नाकी नऊ यायचेत," अनिताची आई अनिताच्या रूममध्ये शिरत म्हणाली.
"आई, तू काळजी करू नकोस, मी झोपते पाच मिनिटांतच आणि हो, मी गजर लावीन की पहाटे उठण्यासाठी! तू जा, आणि झोप," इति अनिता. आणि तिची आई आपल्या बेडरूममध्ये निघून गेली.
आज अनिताला झोप लागणं शक्यच नव्हतं. तिच्या मनात विचार येत होते – तिचा लाडका प्रियकर नील.... उद्या पहाटे 5 वाजता फ्लाईटने, तिचा प्रियकर – सुनिल भारतात परत येणार असतो. तिच्या डोळ्यासमोर सुनिलला पहिल्यांदा भेटल्यापासूनचे – पाच वर्षापासूनचे सर्व प्रसंग, एखाद्या पडद्यावरून एकानंतर एक चित्र – सीन दिसावे त्याप्रमाणे, जसेच्या तसे उभे राहतात.
अनिता त्यावेळी नुकतीच एफ. वाय. बि. कॉम.ला ऍडमिशन घेऊन कॉलेजात प्रवेशती झाली होती. अनिता परांजपे – गौरवर्ण, काळेभोर लांबसडक केस, किंचित तपकिरी व चौकस असे डोळे असलेली आणि वर्गातली सर्वात हुशार अशी विद्यार्थिनी. अनिता परांजपे म्हणजे एफ. वाय. बि. कॉम.च्या वर्गाची शान होती. बोलण्यात कधीच तिच्या हुशारीबद्दल किंवा सौंदर्याबद्दल अभिमान असा डोकावत नव्हताच. प्रत्येकाला तिच्याशी बोलायला आवडे किंबहुना भरपूर विद्यार्थांना अनिता परांजपेने आपल्याशी बोलावे असे वाटे.
अनिता फक्त अभ्यासातच अग्रक्रमी होती असे नव्हे, तर ती प्रत्येक गोष्टीत पूढे. वक्त्रूत्वस्पर्धेत तर तिने आजपर्यंत कधीच दुसरा नंबर घेतला नव्हता. ती जेंव्हा स्टेजवर बोलत असे, त्यावेळी सर्वांना आपल्या वक्तृत्वाने मंत्रमुग्ध करून टाकण्याची कला तिला उपजतच होती. खेळांमध्ये पण ती मागे नव्हती. बॅडमिंटन हा तिचा आवडता खेळ व ती तर बॅडमिंटनची चॅम्पीयन म्हणून कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांतच प्रसिध्द झाली. त्यावर्षीच त्यांच्या कॉलेजच्या गॅदरिंगच्या निमित्ताने आंतर-महाविद्यालयीन अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कॉलेजच्या प्रतिनिधींपैकी एक अनिता पण होती. वादविवाद स्पर्धेचा कार्यक्रम. विषय होता – "प्रेमविवाह – जीवनातील संसारसुखासाठी योग्य तरणोपाय". परंतु अनिता विषयाच्या विरूध्द बाजूने बोलणार होती, कारण तिची जी वादविवादासाठी असलेली पार्टनर होती, ती अनेकांप्रमाणे विषयाच्या बाजूनेच बोलणार होती.
वादविवाद स्पर्धा सुरू झाली. अनिताचा नंबर आला. तिने आपल्या नेहमीच्या पध्दतिने प्रेक्षकांना एकेक मुद्दा पटवून देण्यास सुरूवात केली. प्रेमात फसवणूक कशी होते किंवा प्रेमविवाह हे कसे अयशस्वी ठरतात, हे अगदी कौशल्याने ती प्रेक्षकांच्या मनात बिंबवत होती. शेवटी संपूर्ण सभागृह तिच्या प्रत्येक वाक्यागणिक प्रचंड टाळ्यांचा प्रतिसाद देऊन तिच्या बाजूनेच सर्व प्रेक्षकवर्गाचा कल असल्याची ग्वाही देऊ लागला. आणि तिने आपले वक्तृत्व संपवले. शेवटी देखील तिने आपल्या नंतरच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांचे सर्व युक्तिवाद कौशल्यपूर्ण रीतीने खोडून काढून त्या वादविवाद स्पर्धेच्या प्रथम बक्षिसाचे मानकरीपद पटकावले. कार्यक्रम संपला होता. सर्वांच्या ओठावर आज अनिता परांजपेची प्रशंसा व चेहर्यावर एक उत्कृष्ट वक्तव्य ऐकण्यास मिळाल्याबद्दलचे समाधान झळकत होते. पण अनिताला या सर्वांपैकी कोणाकडेही पाहण्याची फुससत नव्हती. ती घाईघाईत फ्रेश होण्यासाठी निघून गेली, कारण लगेच वीस मिनिटांनी तिची बॅडमिंटन स्पर्धा होती. ती स्पोर्ट्सक्लबच्या ड्रेसिंग रूमकडे जाण्यास निघाली, तेव्हढ्यात तिची डबल राउंडमध्ये पार्टनर असणारी सोनाली शाह तिला भेटली.
"अगं मी कॉरिडॉरमध्ये तुझी वाट पहात थांबते. ये लवकर"..... म्हणत अनिता कॉरिडॉरमधून पसार होत थेट मेन नोटिस बोर्डाकडे येते. नोटिस बोर्डावर एकही नविन अशी कोणतीच नोटिस नव्हती. उगाच टाईम पास म्हणून अनिता जून्या नोटिसांवरच कटाक्ष टाकू लागली. तेव्हढ्यात तिला मागून आवाज ऐकू आला, "हॅलो ! मिस परांजपे !" आणि अनिता गर्रकन् वळली. समोर एक सुंदर, उंच असा तरूण स्मितहास्य करीत तिच्याकडे आदराने पहात होता. "हं मी परांजपेच. काय काम....?" अनिता पुढे काही बोलणार तोच, तो तरूण म्हणाला, "मी सुनिल, सुनिल करंदीकर. मघाशी तुमचं वक्तृत्व ऐकलं. खूपच छान बोलता तुम्ही. आय एम् इम्प्रेस्ड." "थॅंक्यू, थॅंक्यू व्हेरी मच," इति अनिता.
"पण मला एक विचारायचे होते....," सुनिल म्हणाला. पण अनिता मनात वेगळाच विचार करत होती. तिला सुनिलबद्दल वेगळेच आकर्षण निर्माण झाले. तो उंच – जवळ जवळ 6 फूट उंची, सरळ नाक, थोडासा साईडला भांग पाडून केस मागे फुग्यासारखे वळवलेले, काळेभोर डोळे, डोळ्यावर सोनेरी फ्रेमचा चष्मा. अनिता त्याला प्रथमच कॉलेजमध्ये पहात होती. "विचारा, पण मी तुम्हाला याआधी कॉलेजमध्ये बघितले नाही ?" अनिताने विचारले. "मी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे...." तो पुढे काही बोलणार एव्हढ्यात सोनाली शाह घाईघाईत अनिताला शोधत येते. सुनिल हा सोनालीच्याच सोसायटीत रहात असल्याकारणाने त्यांची चांगली ओळख असते. ती अनिता व सुनिल यांची एकमेकांशी ओळख करून देते. सुनिल हा इंजिनिअरिंगच्या फायनल इयरचा विद्यार्थी असून, त्याची ब्रांच – इलेक्टॉनिक्स ऍण्ड टेलीकम्युनिकेशन्स असून इंटरकॉलेज स्पोर्ट्स् च्या मॅचेससाठी त्याच्या कॉलेजचे प्रतिनिधित्व त्याच्याकडे असते. तो इंजिनिअरिंग कॉलेजचा बॅडमिंटन चॅम्पीयन असतो, हे अनिताला सोनालीकडून कळते. सोनालीने दोघांची ओळख वगैरे करून दिल्यानंतर दोघांच्या बोलण्यातील अहो-जाहो हा औपचारिकपणा दूर होतो.
तिघं बोलत बोलत बॅडमिंटन कोर्टाजवळ येतात. नंतर सोनाली सुनिलला रिपोर्टिंग काउंटरकडे पोहोचवते व ती आणि अनिता बॅडमिंटन कोर्टाकडे जातात. अनिता सोनालीला सुनिलबद्दल बरेच प्रश्न विचारते. सोनाली तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तिचा सुनिलबद्दलचा असलेला इंटरेस्ट पाहून तिची थोडी थट्टा करते. अनिता उगाच रागावल्यासारखी करते. मनातून तिला खूप बरे वाटते. ती सुनिलबद्दल जास्त विचार करू लागते. नंतर मॅचेस चांगल्याप्रकारे पार पडतात. अनिताची टीम फायनल जिंकते. सुनिलची टीम रनर टीम म्हणून फायनलपर्यंत असते. नंतर युनिव्हर्सिटी टीमसाठी अनिता व सुनिल यांची निवड. दोघांना झालेला अप्रतिम आनंद. त्यातच दोघांचे झालेले संभाषण – सुनिल म्हणतो, "अनिता, प्रथम तुझे फायनल जिंकल्याबद्दल अभिनंदन. आणि मला तुझ्या वक्तृत्वाबद्दल थोडेसे बोलायचेय. तुझ्या वक्तव्यानुसार तुझा प्रेम, प्रेमविवाह यांवर विश्वास नाही. प्रेमविवाह नेहमी अयशस्वी होतात हे तुझे मत.... मला थोडासा वाद करावासा वाटतो की...." लगेच अनिता म्हणते, "काही गरज नाही रे, वाद वगैरे करण्याची. हे बघ मला आत्मविश्वास आहे की, मी मांडलेला प्रत्येक मुद्दा योग्य रितीने मी सिध्द करून देऊ शकते. उगाच तू कशाला वेळ घालवतोस? पण एक ऐक. मी विषयाच्या विरूध्द बाजूने जरी बोलले, तरी त्याचा अर्थ – 'माझं मत तसंच आहे' – असा होत नाही. उलट जिथे प्रेम नाही, तिथे विवाह सक्सेसफुल होऊच शकत नाही, या मताची मी आहे".
"म्हणजे, तुझे तसे मत नसताना देखील तू एवढा युक्तिवाद केलास?" इति सुनिल.
"हो, माझी पार्टनर विषयाच्या बाजूने बोलणार म्हटल्यावर मला विषयाच्या विरूध्द बाजूने बोलणे भाग होते !" इति अनिता. "याचा अर्थ असा की, तू कॉलेज चॅम्पीयन असतानासुध्दा तुझ्या मताला काहीही किंमत नाही ?" सुनिलने विचारले. यावर अनिता उत्तरली, "प्रश्न किमतीचा नाही. प्रश्न असा आहे की, कोणताही विषय दिल्यानंतर वक्ता तो विषय पटवून देण्यास कितपत समर्थ आहे ? यावरून त्याची ॲबिलीटी समजते. आता कॉलेजतर्फे प्रतिनिधित्व करणारा दुसरा वक्ता कोणत्या बाजूने मुद्दे पटवून देण्यास तयार आहे, हे जाणून घेतल्यानंतरच मी आपल्या विषयाची दिशा निवडते!"
"रियली!! खरा वक्ता तोच, जो कोणताही मुद्दा पटवून देण्यास समर्थ असतो. ओह अनू !! यू आर सिंपली ग्रेट. आय स्वेअर, आय ऍम इम्प्रेस्ड वन्स अगेन," सुनिल तिच्याकडे आदराने बघत म्हणतो. "थँक्यू, थँक्यू वन्स अगेन नील!" अनिता स्मितहास्य करत म्हणते. ती सुनीलला प्रेमाने नील म्हणून संबोधते.
याप्रमाणेच सुनिल व अनिता यांच्यात अनेक विचारांची देवाण-घेवाण चालते. दोघे युनिव्हर्सिटी प्लेयर्स म्हणून सोबत प्रॅक्टिसला जाणे, खेळणे, जोक्स, हसणे-खिदळणे याप्रमाणे अधिक जवळ येतात. दोघांच्या मैत्रीचे नकळत प्रेमात रूपांतर होते.
पुढच्या वर्षी अनिता एस. वाय. मध्ये प्रवेशते. सुनिलला इंजिनियरिंगमध्ये डिस्टिंक्शन मिळते. तो एक वर्ष अप्रेंटिस म्हणून एका लहान इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत जॉईन होतो. मध्यंतरी त्याचे व अनिताचे प्रेमाचे धागे अधिकच द्रृढ होत जातात. त्यावर्षीच अनिताची थोरली बहीण – सुनिता पहिल्या बाळंतपणासाठी म्हणून माहेरी येते. तिचे लग्न अनिता बारावित असतांनाच झालेले असते. तिला अनिताचे मन दुसरीकडेच गुंतलेले असल्याचा वेळोवेळी प्रत्यय येतो. एकदा ती अनिताला विश्वासात घेऊन सर्व माहिती काढून घेते. नंतर आई – वडीलांना याबद्दल आत्ताच काहीही न सांगता, तिचे सुनिल बरोबरच लग्न जमवून देण्यास मदत करण्याचे आश्वासन देते.
दरम्यान सुनिता एका गुटगुटीत मुलाला जन्म देते. आता आठवड्यातून एक – दोन वेळा संजयच्या – सुनिताच्या पतीच्या चकरा सुरू होतात. सुनिता संजयला अनिताच्या प्रेमप्रकरणाबद्दल सर्व सांगून झाल्यावर तिला मदत करण्याबद्दलचे विचार त्याला सांगते. पुढच्यावेळी येताना संजय – सुनिल करंदीकरबद्दल इत्थंभूत माहिती काढून आणतो व सुनिताला अनिताचा चॉईस अल्टीमेट असल्याचे सांगून तो मदत करण्यास तयार होतो.
त्याच्या पुढील आठवड्यात अनिता कॉलेजमध्ये गेली असताना संजय येतो व सुनिताला एक प्लॅन सांगतो. ती एग्री होते व दोघे तिच्या आई – वडीलांशी अनिताच्या लग्नाबद्दल बोलतात. ते म्हणतात की, 'मला कमीत कमी एम्. कॉम. तरी करावयाचे आहे'. व मुलांबद्दल ती सांगते की, मला समजून घेणारा, माझ्या ऍक्टिव्हिटीजना दुजोरा देणारा असला की, पुरे! आणि तिची आई म्हणते – "आत्तापासून मुलगा पहायला सुरूवात करू तेव्हा कुठे ती एम. कॉम. होईपर्यंत एखादे स्थळ जुळेल." त्यावेळी संजय सांगतो की, "हे बघा, माझ्या पहाण्यात एक मुलगा आहे. सुनिल करंदीकर. चांगला सुस्वभावी आहे. इंजिनिअर आहे. बी. ई. झालाय. आत्ता एप्रेंटिस करतोय. त्याचे वडील मेगी इंडस्ट्रिजचे लीगल ॲडवायजर आहेत. पुढील वर्षी तो पोस्ट ग्रॅज्यूएशनसाठी अमेरिकेला जाण्याची तयारी करतोय. तुम्ही मुलगा पहा. आवडला तर त्याच्या आई – वडीलांशी बोलू. हवंतर तर अनिताला याबद्दल इतक्यात काही सांगायचे नाही." यावर सुनिताचे वडील म्हणतात, "ठीक आहे. पण त्यांनी मुलगी पहाण्याची इच्छा दर्शवली म्हणजे अनिताला सांगणे आलेच." "पहा, मी काढलेल्या माहितीप्रमाणे सुनिलचा अमेरिकेत जाऊन एम. एस. केल्याशिवाय लग्नाचा विचारही न करण्याचा निर्णय त्याच्या आई – वडीलांना त्यानं ऐकलवलाय, आपण त्यांना अनिताचा फोटो दाखवू व सुनिलचा फोटो तुम्ही पहा. तो अमेरिकेहून परत आल्यावर ह्यांच्या दोघांच्या एंगेजमेंटची खबर देऊन दोघांना सरप्राईज द्यायचे," इति संजय.
सुनिताचे आई – वडील तयार होतात. सुनिलच्या आई – वडीलांची भेट घेऊन बोलणी होतात. त्यांनाही अनिताचा फोटो बघून आनंद होतो. अनिताचे आई – वडील पण सुनिलचा फोटो पाहून, तो पसंत असल्याचे सांगतात. सर्वांचे ठरते की, सुनिल अमेरिकेला जाऊन परत येईपर्यंत ही बातमी गुप्त ठेवायची.
पुढे सुनिल अमेरिकेला जातो. अनिता इकडे टी. वाय. चा स्टडी करते. सुनिताने सर्वकाही अनिताला सांगितलेले असते. दरम्यान अनिता एका बॅंकेत पार्टटाईम जॉब करते. टी. वाय. चे वर्ष, पण काहीतरी स्वतः करण्याची जिद्द म्हणून ती एक आवड म्हणून बॅंकेत क्लार्कची नोकरी मिळवते. सुनिल वरचेवर तिला अमेरिकेहून बँकेत फोन करून बोलत असतो.
तिकडे एम. एस. पूर्ण करून एका प्रायव्हेट कम्युनिकेशन कंपनीत सुनिल नोकरी पत्करतो. इकडे अनिता एम. कॉम. च्या शेवटच्या वर्षाला असते. अनिताची परीक्षा नुकतीच संपलेली असते. सुनिल भारतात परत येणार असतो. अनिता आतुरतेने त्याची वाट पहाते. आज तिच्या वडीलांनी सांगितलेले असते की, त्यांचा एक करंदीकर म्हणून मित्र आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेहून येणार असल्याने सर्वांना पहाटे पाच वाजता एअरपोर्टवर त्याला रिसिव्ह करण्यासाठी गेले पाहिजे. अनिताला तर 'सुनिलला कधी एकदा पहाते' असे झालेले असते. आज तिला सर्व भूतकाळ आठवत असतो.
तिची तंद्री भंग पावते. आई तिच्या रूमला नॉक करत म्हणते, - "अनू बेटा चार वाजलेत, ऊठ." अनिता रात्रभर झोपलेलीच नसते. पण ती आईला खोटेच सांगते – "उठते पाच मिनिटांतच." तिची आई निघून जाते. अति उत्साहात अनिता तयार वगैरे होते. सर्वजण एअरपोर्टवर जातात. अनिता सुनिलचे नजरेनेच स्वागत करत स्मितहास्य करते. कारण ठरल्याप्रमाणे इतक्यात त्यांना 'एकमेकांना ओळखतो' हे जाहीर होऊ द्यायचे नसते. त्या दोघांची ओळख करून देण्यात येते. सुनिलचे वडीलपण अनिताची ओळख करून देताना – "माझे स्नेही – इंडस्ट्रियालिस्ट मि. परांजपे यांची लहान कन्या," अशीच करून देतात. दोघांना मनातल्या मनात गुदगुल्या होत असतात व सर्वांना पाहून मनातल्या मनात हसू पण येत असते.
तीन दिवसांनी सुनिलची, भारतात स्वागत म्हणून त्याच्या वडीलांनी पार्टी ॲरेंज केलेली असते. सर्वजण तेथे जमतात. ठरलेल्या प्लॅनिंगप्रमाणे अनिताचे व सुनिलचे वडील अनिता व सुनिलचे एंगेजमेंट त्या दिवशीच डिक्लेअर करणार असतात.
मध्येच सुनिलचे वडील, अनिता व सुनिल यांना, तसेच अनिताच्या आई – वडीलांना स्टेजकडे घेऊन जातात व नंतर अनाऊन्स करतात "लेडीज ऍन्ड जन्टलमेन, आय एम् व्हेरी प्लिज्ड टू गिव्ह अ सरप्राईज टु माय सन बाय अनाऊन्सिंग टुडे द एंगेजमेंट ऑफ माय सन – सुनिल वीथ मिस अनिता परांजपे, द यंगर डॉटर ऑफ मिस्टर परांजपे" (टाळ्या) "नाऊ, बोथ ऑफ देम वील प्रेझेंट द रिंग्ज टु इच अदर ऑन बिहाफ ऑफ देअर एन्गेजमेंट ऑन धिस होली ऑकेजन...."
दोघे एकमेकांच्या बोटात अंगठी घालतात. अंगठी घालताना संधी साधून हळूच सुनिल अनिताचा हात दाबतो. ती लाजून खाली बघत स्मितहास्य करते व त्याच्या पायावर आपला सॅंडल जोरात दाबून पुटपुटते, "थोडा तरी धीर ठेव. कोणाच्या लक्षात आलं म्हणजे?" त्यांनी एकमेकांना अंगठी घातल्यानंतर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होतो. नंतर अनेक गिफ्ट्स मिळतात. सर्व पाहुणे मंडळी आपापल्या घरी रवाना होणार एवढ्यात अनिताचे व सुनिलचे वडील त्यांच्याजवळ जातात व विचारतात, "काय, आमची सरप्राईज गिफ्ट तुम्हा दोघांना आवडली की नाही?"
हे ऐकताच सुनिल व अनिता जोरजोरात हसू लागतात. सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे केंद्रित होते. सर्वजण कन्फ्युज होतात. कोणालाच (सुनिता व संजय सोडून) कळत नाही, की हे दोघे का हसतायत ते, त्यावेळी अनिताचे वडील आश्चर्याने विचारतात, "काय झाले?" तेव्हा अनिता उत्तरते – "बाबा, तुम्ही आम्हाला एंगेजमेंटचं गिफ्ट दिलंत खरं पण सरप्राईज आम्ही तुम्हाला दिलंय! सुनी-ताईला विचारा. आमचे दोघांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेम होते. पण आता आम्ही ऍरेंज मॅरेज करणार."
आणि सर्वजण हतबुध्द होऊन आश्चर्याने दोघांकडे बघतच रहातात. पण या दोघांना त्यांच्याकडे बघण्यास वेळ कुठेय? दोघे आपल्या लग्नाचे स्वप्न पहाण्यात रमलेले असतात.