पुस्तक परीक्षण: एका दिशेचा शोध - ओंकार दिलीप बागल
प्रस्तुत पुस्तकाचे लेखक संदीप वासलेकर यांची जागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत अशी ख्याती आहे. जगातील पन्नास देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, सरकारी अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करताना आलेल्या अनुभवांतून भारतीय युवकाला एक नवी दिशा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
प्रचंड लोकसंख्येचा जनसमुदाय अहोरात्र मेहनत करत असूनही आपण विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत का नाही? नेमकी अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे आपल्या देशाचा विकास होण्यास अडसर निर्माण होत आहे? कित्येक वर्षें मागासलेले देश आज झपाट्याने प्रगती करत आहेत. हे त्यांना शक्य होत असेल तर आपल्याला का नाही? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे उदाहरणांच्या माध्यमातून वाचावयास मिळतात.
विविध देशांतील नेते- अधिकारी यांचं निरीक्षण, जसं कि स्वित्झर्लंडचे राष्ट्रपती रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्ब्यातून प्रवास करत असतील, नॉर्वेचे मंत्री सायकल वरून कचेरीत जात असतील. मग आपल्या नेत्यांना वा अधिकाऱ्यांना लोकाभिमुख धोरणे करण्यासाठी आपण कसे भाग पाडू शकतो? हे पुस्तक वाचत असताना, आपल्या युवकांना जगभरातील आगामी बदलाची किंचितही चाहूल नसल्याची खंत वाटल्याखेरीज राहत नाही. पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्याची 'आंधळी कोशिंबीर' का थांबली पाहिजे? आपल्या देशातील सर्वात दुर्बळ घटकही प्रबळ करताना त्यात आपली जबाबदारी काय असेल? रोजगार निर्मितीसाठी आपल्या शिक्षणपद्धतीत कोणते बदल गरजेचे आहेत?
भविष्यातील नवनिर्मितीची संधी आणि धोके यांच्या आव्हानांबद्दल या पुस्तकात चर्चा केलेली आहे. गरिबी, कुपोषण, पाणीटंचाई, अनोरोग्य, बेकारी ते 'माणुसकीच्या शत्रूसंगे' सुरू असलेले युद्ध असो किंवा 'हिमालयाला आलेला ताप असो'. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक दिशा देण्याचं काम हे पुस्तक निश्चितचं करत आहे. इतकेच नव्हे तर अलीकडच्या काळात आपल्या वसुधेला आलेलं कुटुंबाचे स्वरूप या विषयावरील सखोल मुद्देही आपल्याला वाचावयास मिळतात. हा सर्व खटाटोप कशासाठी? एकट्याने काय होणार? या ऐवजी 'केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे' या ओळीची प्रकर्षाने जाणीव होते.
प्रत्येक युवकाने जर नियती व निश्चय यांची सांगड घालण्यास सुरुवात केली तर लवकरच एका सुखी, समृद्ध आणि महान देशाची निर्मिती होईल असा आशावाद लेखक व्यक्त करतात. भारतातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी आणि भारतीय युवकाला उत्तम ध्येयदर्शन देण्यासाठी "एका दिशेचा शोध" हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरत आहे.