Get it on Google Play
Download on the App Store

सामाजिक: आमची ‘येष्टी’ - अविनाश हळबे, पुणे

फोन:  9011068472

आमचे गाव म्हणजे जेमतेम दीडदोनशे उंबरठ्याचे छोटे खेडेगाव. इथे ना धड रस्ते, ना वीज, ना पाण्याची सोय. शेती हा मुख्य धंदा आणि शेतीची कामे नसली की पंचक्रोशीत जाऊन मोलमजुरी करणे हा जोडधंदा. दैनंदिन गरजेसाठी एक किराणा मालाचे दुकान आहे हे आमचे नशीब. पण त्या व्यतिरिक्त काही लागले, तर पाच किलोमीटर चालत जाऊन हमरस्ता गाठायचा आणि तिथून एसटी किंवा मिळेल त्या वाहनाने तालुक्याच्या गावी जाऊन आपले काम उरकायचे, हा एकच उपाय होता. कोणी गंभीर आजारी पडले, तर त्याचे हाल न विचारलेच बरे! पण काही वर्षांनी का होईना, आमच्या गावाकडे सरकारचे लक्ष गेले. गावाकडे येणारा पाऊलवाटेचा रस्ता थोडाफार रुंद करण्यात आला. आठवड्यातून एकदा डॉक्टर चावडीवर येऊ लागले. प्राथमिक पर्यंतची शाळा सुरू झाली वगैरे वगैरे. पण नंतर सुधारणेचे वारे ओसरल्याने ही प्रगती थांबली. शाळा शिकू इच्छिणाऱ्या मुलामुलींचे शिक्षण इतक्ता चौथीवरच संपू लागले. प्राथमिक च्या पुढे शिकायचे असेल तर पाच किलोमीटर पायी  आणि नंतर मिळेल त्या वाहनाने तालुक्याच्या गावी जाऊन शिक्षण घेणे हा एकच उपाय होता. गावातील एक दोन मुले उन्हा-पावसाची पर्वा न करता हे दिव्य करू लागली. चौथी पास झाल्यावर मीही मीसुद्धा यात सामील झालो आणि आमचा पाच जणांचा जथा अशा विचित्र परिस्थितीत शिक्षण घेऊ लागला. आमचे बघून पुढच्या वर्षी चौथी पास झालेली आणखी  एक दोन मुले आमच्यासोबत आली. होता होता आम्ही सातवीत गेलो. त्यानंतर एकाने शिक्षण सोडले आणि आम्ही एकूण बारा विद्यार्थी शाळेसाठी पायपीट करू लागलो. बाकी परिस्थितील काही फरक पडला नव्हता.

एक दिवस आम्हाला एक वेगळी बातमी कळली. आमच्या भागात एसटी सेवा सुरू होणार होती आणि ती गाडी आमच्या गावापासून तीन किलोमीटर अंतरावरच्या एका गावातून सुटून, पुढे तालुक्याच्या गावी जाणार होती. आम्हा विद्यार्थ्यांना अर्थातच आनंद झाला. कारण ही एसटी मिळाली तर आमचे निदान पुढचे दोन किलोमीटर पायी जाणे आणि नंतर दुसरे वाहन पकडून तालुक्याच्या गावी जाणे वाचणार होते. सुदैवाने आमचा अंदाज खरा निघाला    आणि ती एसटी सुरू झाली. यथावकाश आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी सवलतीचा पास काढून एसटीचा प्रवास सुरु केला.

या एसटीचा फायदा आम्हाला खूपच होऊ लागला. शाळेसाठी चालण्यात जाणारा वेळ आम्ही अभ्यासाला देऊ शकत होतो. श्रम आणि  पावसाचा त्रासही थोडाफार कमी झाला होता. याबरोबरच एसटीच्या उपलब्धतेमुळे आता चौथी पास झालेली बरीच मुले पाचवीसाठी आमच्या सोबत येऊ लागली. गावकर्यांना तर मोठाच फायदा झाला. कोणी दूध तर कुणी भाजीपाला विकण्यासाठी तालुक्याच्या गावाला जाऊ लागले. महिला म्हाताऱ्या कोता-या  आणि आजारी मंडळींची तर फारच सोय झाली. मनातल्या मनात आम्ही एसटीला दुवा पण देऊ लागलो

मी आठवीत गेल्यावर एस्टीने जाणाऱ्या  पाचवी ते आठवी पर्यंतच्या आम्हा विद्यार्थ्यांची संख्या पंधरा झाली. एक दिवस पायी चालत जात असताना माझ्या मनात एक विचार आला. जी एस्टी आमच्या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावापासून सुटत होती, ती आमच्या गावापासून सुटली तर किती बरे होईल? आम्हा विद्यार्थ्यांची पायपिट थांबेल, गावकर्‍यांचा फायदा होईल, याबरोबरच चौथीनंतर शिक्षण सोडायला लागणाऱ्या आणखी काही मुला-मुलींना पुढे शिकायला प्रोत्साहन सुद्धा मिळेल. न रहावून मी ही गोष्ट माझ्याबरोबरच्या विद्यार्थ्यांना आणि शाळेत गेल्यावर माझे आठवीचे वर्गशिक्षक श्री पवार सर यांना सांगताच, त्यांनाही माझी  कल्पना पटुन या कामी मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

दुसऱ्या दिवशी ते आम्हाला मुख्याध्यापकांकडे घेऊन गेले. सर्व हकिकत ऐकताच त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून, एक दिवस मला आमच्या गावातले विद्यार्थी आणि निवडक गावकऱ्यांसह एसटी स्टँडच्या ऑफिसात येण्यास सांगितले. मी गावात परत आल्यावर वडिलांमार्फत ही गोष्ट पाटलांना कळवून, जाण्याचा दिवस ठरवला.

ठरलेल्या दिवशी आम्ही एसटी स्टँड च्या ऑफिसात पोहोचताच, पवार सरांनी एस्टीसाठी लिहून आणलेला अर्ज, आगार म्हणजे एसटी डेपो प्रमुखांना वाचून दाखवला. आम्ही विद्यार्थी, पाटील आणि गावकऱ्यांनी त्यावर आपली नावे टाकून सह्या करताच, मुख्याध्यापकांनी तो अर्ज त्यांना दिला. आगार प्रमुखांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पवार सरांच्या सूचनेनुसार आम्ही दोन चार मुलांनी आणि गावकऱ्यांनी दर आठ-पंधरा दिवसांनी आगारात चौकशी करणे चालू ठेवले. सुमारे तीन महिने गेल्यावर पुढच्या एक तारखेपासून एसटी आमच्या गावातून सुटणार अशी आनंद वार्ता कळली. आम्ही लगोलग ही बातमी चावडीवर सांगतात गावात आनंदीआनंद पसरला.

एक तारखेला खरोखरच एसटी आमच्या गावाबाहेरच्या पिंपळ पारापाशी येऊन थांबली! गावकऱ्यांचा उत्साह काय विचारता?  कोणी गाडी आतून धुऊन स्वच्छ केली, कोणी तिला फुले आणि आंब्याच्या डहाळ्यांने सजवली. पाटलांनी पूजा केल्यावर बायाबापड्यांनी ड्रायव्हर – कंडक्टर सकट गाडीला ओवाळले. आम्ही सर्व विद्यार्थी ऐटीत गाडीत जाऊन बसलो आणि जयजयकारात गाडी सुरू झाली. तालुक्याच्या गावी गेल्यावर आम्ही आगारप्रमुख, पवार सर आणि मुख्याध्यापकांचे आभार मानले. आता ही एस्टी  आमच्या आणि गावकऱ्यांच्या जीवनाचा जणू अविभाज्य भाग झाली.

असाच एक महिना आनंदात गेल्यावर एक गोष्ट मला खटकू लागली. ती म्हणजे एस्टीतली घाण! आमचा भाग ग्रामीण असल्याने स्वच्छतेच्या बाबतीत एकूण आनंद होता. खाल्लेल्या शेंगांची टरफले केळ्यांच्या साली, खाद्यपदार्थांची वेष्टने गाडीत टाकणे, पान तंबाखू खाऊन गाडीत आणि बाहेर पिचकाऱ्या मारणे, या गोष्टी सर्रास चालत. आगारातून कधीकधी एस्टीचा स्वच्छ होऊन येई. पण रोज मरे त्याला कोण रडे? एक दिवस न रहावून मी ही गोष्ट पाटलांना सांगितली.

पाटलांनी दुसऱ्या दिवशीच चावडीवर सर्व गावकऱ्यांना बोलावून, त्यांना नीट समजावून सांगून, इथून पुढे गाडीत घाण करायची नाही असे निक्षून सांगितले. गावकऱ्यांना ते पटले असले तरी, वाटेत चढ-उतार करणाऱ्यांना कोण सांगणार? मग ती गोष्ट आम्ही विद्यार्थ्यांनी मनावर घेतली. जाता-येता आम्ही वाटेतल्या नेहमीच्या प्रवाशांना स्वच्छतेबाबत नम्रपणे सांगू लागलो. महिना दीड महिन्यांनी आम्हाला बऱ्यापैकी यश मिळून त्यांचे गाडीत घाण करणे जवळजवळ बंद झाले. आवश्यकता वाटल्यास सर्व प्रवासी उतरून गेल्यावर, आम्ही दोघे चौघे गाडीची उरलीसुरली स्वच्छता करू लागलो. आमच्या या सर्व गोष्टींमुळे ड्रायव्हर कंडक्टर सह आगारातील सर्वांना आनंद झाला. आगार प्रमुखांनी दसरा पूजेच्या दिवशी आम्हाला बोलावून, आमचे जाहीर कौतुक केले आणि पूजेचा प्रसाद पेढे वगैरे दिले. या सर्व गोष्टींमुळे आम्ही विद्यार्थी आणि एस्टी यात एक अतूट प्रेमाचे नाते निर्माण झाले. जणूकाही ती आमच्या घरातलीच एक व्यक्ती असावी इतके!

असेच दोन महिने खूप आनंदात गेले. आता आमची सहामाही परीक्षा चालू झाली असल्याने, सर्व विद्यार्थी एसटीतून जाताना अभ्यासात डोके खुपसून बसलो होतो.  इतक्यात एक मोठा गलका ऐकू आला आणि एसटी कचकन ब्रेक दाबून थांबली. काय होतेय ते कळायच्या आत एसटीवर तुफान दगडफेक सुरू झाली. काचा फुटल्या. त्यातल्या काहींचे तुकडे प्रवाशांना लागून एकच गोंधळ उडाला. दगडफेक थांबतात सर्व प्रवासी कसेबसे गाडीतून उतरले आणि पळत सुटले. आम्ही विद्यार्थी एका बाजूला पळत जाऊन जवळच्या झाडामागे उभे राहिलो. आम्हाला फारसे काही लागले नव्हते पण ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या बरेच लागले होते. मी क्षणभर विचार केला आणि शेजारच्या वस्तीवर जाऊन हळद, स्वच्छ पाणी वगैरे आणून जखमींवर प्रथमोपचार केले.

थोडे भानावर आल्यावर आम्हाला आज आमची परीक्षा असल्याची जाणीव झाली. तिथून निघताना एका गोष्टीचे मला फार दुःख झाले. माणसांपेक्षा आमची जिव्हाळ्याची एस्टी  जास्त जखमी झाली होती. तिला कोण मलमपट्टी करणार? रोज आम्हाला सुखरुप शाळेत पोचवणारी ही 'सरस्वतीकन्या' - आमची जिवलग एस्टी -  बिचारी तशीच जखमी अवस्थेत रस्त्यावर उभी होती!

या सगळ्या गोष्टींमुळे शाळेत पोहोचायला अर्थातच आम्हाला पाउण तास उशीर झाला. परीक्षा सुरू झाली होती. पण झालेली गोष्ट सांगताच,  मुख्याध्यापकांनी आम्हाला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. घरी जाताना कळले की आज एका राजकीय पक्षाने बंद पुकारला होता आणि त्याला प्रतिसाद न दिल्याने आमच्या एस्टीवर दगडफेक करण्यात आली होती. एसटीच्या विध्वंसाचे कारण कळले, पण आमच्या बालमनाला नीट उमगले नाही.

झाल्या घटनेने आम्ही फारच हादरून गेलो. यात कोणाचा किती फायदा झाला हे कळले नाही. परंतु संध्याकाळी आणि पुढचे चार-पाच दिवस गावात दुसरी एस्टी न आल्यामुळे घरापासून हमरस्ता आणि परत येताना हमरस्त्यापासून घर, असे दहा किलोमीटर पायपीट झाली. शाळेत पोहोचायला उशीर तर होत होताच पण आमची परीक्षा आणि अभ्यास याचे खूप नुकसान झाले.  सुदैवाने ही सहामाही परीक्षा होती आणि उशीर झाला तरी मुख्याध्यापक परीक्षेला बसू देत होते, ही त्यांची कृपा. बोर्डाची परीक्षा असती तर आम्हाला परीक्षेलाही बसता आले नसते आणि त्यामुळे वर्षही वाया गेले असते. एक गोष्ट मात्र आम्हाला जाणवली, की त्यादिवशी दगडफेक करणारी मंडळी, आमच्या ओळखीची तर नव्हतीच, पण आमच्या जवळपासच्या गावातलिही नव्हती!

आणखी दीड महिन्यांनी पुन्हा असाच प्रकार घडला. याहीवेळी  दगडफेक करणारे लोक अनोळखीच होते.  कुणाला तरी मोठी दुखापत, आमच्या लाडक्या एसटीचे नुकसान, चार-पाच दिवस पायपीट आणि नंतर आमच्या अभ्यासाचे तीन तेरा वाजणे हे ओघाने आले. यावेळी जखमी प्रवाश्यांमध्ये दंगल माजवणाऱ्या पुढाऱ्यांचा एक नातेवाईक होता, ज्याच्याकडून आम्हाला बरीच माहिती कळली. बंद म्हणजे काय? तो कोण आणि कशासाठी पुकारतो? घोषणाबाजी दगडफेक जाळपोळ करणाऱ्यांसाठी लोकांना कसे भडकवले जाते? वेळप्रसंगी भाडोत्री मंडळी कशी आणली जातात? सरकारी वाहने - एसटी यांनाच का लक्ष केले जाते? वगैरे वगैरे…

कळलेली प्रत्येक गोष्ट आमच्या बालमनावर मोठे आघात करत होती. यातून एकच गोष्ट चांगली झाली. पवार सरांच्या सूचनेवरून मी आणि माझ्या बरोबरच्या मोठ्या मुलांनी, मधल्या सुट्टीत शाळेच्या ग्रंथालयात जाऊन रोजच्या रोज वर्तमानपत्र वाचण्यास सुरुवात केली. या वाचनातून जगात काय चालले आहे हे सगळे समजले नाही, तरी मागच्या सारखा बंद वगैरे असला तर निदान आगाऊ तरी कळेल आणि जमेल तितकी खबरदारी घेता येईल एवढाच हेतू होता!

आता मी नववीत गेलो होतो. एक दिवस माझ्या मनात विचार आला की हे सगळे कुठेतरी थांबायलाच पाहिजे. एसटीचे नुकसान करून काही मंडळी आपल्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधू इच्छित असली, तरी आम्हा विद्यार्थ्यांचे आणि इतर प्रवाशांचे किती हाल होतात, याचा विचार कोणीच करत नव्हते. मध्यंतरीच्या काळात मला महात्मा गांधी, विनोबा भावे,  यांची चरित्र वाचायला मिळाली. त्यांनी शांततेच्या  मार्गाने असे अनेक प्रश्‍न सोडवले हे कळले. जमेल का आम्हाला असे?  मग मी थोडे धाडस केले. काही विद्यार्थ्यांना आणि मागच्या दंगलीत जखमी झालेल्या पुढाऱ्याच्या नातेवाईकाला बरोबर घेऊन, पाटलांसह पंचक्रोशीतल्या सर्व पुढारी मंडळींना भेटलो.  त्यांना आम्हा विद्यार्थ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या समस्या तळमळीने सांगून, इथून पुढे कोणत्याही कारणासाठी एसटी सारख्या वाहनाचे नुकसान होऊन देऊ नये अशी विनंती केली. या बरोबर आमच्या सदिच्छेचे प्रतीक म्हणून एक गुलाबाचे फूल ही दिले. खेड्यातली मुले आम्ही यापेक्षा काय करणार?

प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष घालावे बाकीच्या भानगडीत पडू नये, असे दटावण्याचा प्रयत्न केला. पण 'ज्याचं जळतं त्यालाच कळतं' या न्यायाने आम्ही आमचा हेका सोडला नाही.  मागच्या आंदोलनात जखमी झालेला पुढाऱ्याचा नातलगही आता आमच्या बाजूने बोलत होता. असे दोन-चार खेटे घातल्यावर, ती मंडळी थोडी नरमली आणि सबुरीची भूमिका घेण्याचे त्यांनी मान्य केले.

आता माझे दहावीचे वर्ष आहे. या वर्षात कुठे आंदोलन वगैरे पेटल्यास आमचे अभ्यासाचे आणि परीक्षेचे काय होईल? ही चिंता मनाला सतावते. वर्तमानपत्रात जर आंदोलनाची बातमी वाचायला मिळाली, तर आम्ही पुन्हा एकदा त्यांना विनवून येऊ. पण तरी आतून असे वाटते, की आमच्या प्रयत्नांना यश येऊन या नेत्यांना सद्बुद्धी सुचेल आणि ते आमच्या लाडक्या एसटीच्या बाबतीत मागच्या सारखा वेडावाकडा प्रकार करणार नाहीत. नेहमी वाईटाचाच विचार का करायचा? चांगले घडेल अशी आशा का सोडायची?  महात्मा गांधी - विनोबा यांना प्रयत्नांती मोठ्या प्रश्नांबाबतीत यश मिळाले. आम्ही त्यामानाने बाळ गोपाळ आहोत. पण म्हणून काय झाले? आम्हालाही एक दिवस यश मिळेल. शेवटी सदिच्छा आणि सकारात्मक विचारच जगाला पुढे नेतो ना?  बघूया काय घडते ते. असतो मा सद्गमय!

अविनाश हळबे, सी 23, स्वरांजली,  सर्वे नंबर 110 / 2,  शिवतीर्थनगर,  कोथरूड,  पुणे 411038

आरंभ: डिसेंबर २०१९

संपादक
Chapters
आरंभ अंक (डिसेंबर ते मार्च 2019-20) संपादकीय || लेख विभाग || अध्यात्म: गीता महती - सुभाष देशपांडे, मुंबई सामाजिक: आमची ‘येष्टी’ - अविनाश हळबे, पुणे प्रवासवर्णन: नेपाळवर बुलेटस्वारी - अजित मुठे अध्यात्म: कर्मयोगातून साक्षात्कार गाठता येणे शक्य आहे काय? - सद्गुरू (ईशा फौंडेशन) मार्गदर्शन: इतरांच्या अपेक्षा सांभाळताना! - सद्गुरू (ईशा फौंडेशन) चित्रपट वेध: आमची माती, आमची माणसे आणि आपला चित्रपट - निखील शेलार आयुर्वेद: जीवन जगण्याचे शास्त्र - डॉ.केतन हरिभाऊ दांगट माहितीपर: कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज (कॉप-१४) – स्वस्ति सामाजिक: वृद्धाश्रम - प्रणाली कदम, मुंबई महिला सक्षमीकरण: स्त्री पुरुष समानता : काळाची गरज - निखिल शेलार महिला सक्षमीकरण: सक्षम 'स्व'रक्षणाय - मैत्रेयी प्रतिभा प्रदीप महिला सक्षमीकरण: ती वांझ नाहीच - सरिता भोसले महिला सक्षमीकरण: रूढी परंपरा आणि तिचं सौभाग्य - सरिता भोसले लिहिणाऱ्या उत्सवात गझल, कवितांना बहर - प्रकाश क्षीरसागर, गोवा विनोदी: शेवटी मी मत कोणाला दिले? - शरणप्पा नागठाणे विनोदी: फिस्कटलेला फराळ – निखील शेलार जागरूकता: मानवा, ते येत आहेत! - निमिष सोनार, पुणे तत्वज्ञान: बाकी दुःख - उदय जडिये तत्वज्ञान: समाधान - रोहन केदारे, भांडूप गणेश विशेष: प्रथम तुला वंदितो गजानना - निखील शेलार गणेश विशेष: ग्लोबल बाप्पा..सबळ बाप्पा! - जुईली अतितकर सामाजिक: गोतवळ्यातील माणूस! - मंजुषा सोनार पुस्तक परीक्षण: एका दिशेचा शोध - ओंकार दिलीप बागल बापाचं काळीज - किशोर चलाख अन् गुलाबाला काटे मिळाले - प्रकाश क्षीरसागर चित्रपट परीक्षण: फत्तेशिकस्त - निमिष सोनार, पुणे विडंबन: बंड्या आणि टूथपेस्ट – निमिष सोनार, पुणे रेसिपी: निनाव – नीला पाटणकर रेसिपी: बिरडे - नीला पाटणकर कोडे: प्याला आणि आशा निराशा – निमिष सोनार नाटक परीक्षण: देहभान - वैष्णवी कारंजकर, सातारा मायेचे अन्न - मंजुषा सोनार, पुणे || कविता विभाग || कविता: आम्हांला सोडून - योगेश रामनाथ खालकर कविता: आभार मानले मी - नीला पाटणकर, शिकागो चारोळ्या: नीला पाटणकर, शिकागो कविता: एक असावा नवरोबा (भाग १) - नीला पाटणकर, शिकागो कविता: एक असावा नवरोबा (भाग २) - नीला पाटणकर, शिकागो गझल: तू - प्रकाश क्षीरसागर चारोळी: दु:ख आणि जिद्द - विलास गायकवाड, लातूर कविता: किंमत आसवांची - विलास गायकवाड, लातूर कविता: माणूसकी जळते आहे - विलास गायकवाड, लातूर कविता: ओढ तुझी - मयुरी घग कविता: आठवणी - सुवर्णा कांबळे कविता: काय मी शोधत गेलो ? प्रा.गायकवाड विलास कविता: आस - मयुरी घाग || कथा विभाग || विनोदी कथा: संशयाचे शरसंधान - सविता कारंजकर, सातारा विज्ञान कथा: 31 डिसेंबर - निमिष सोनार प्रेरणा कथा: अंधारातूंन प्रकाशाकडे - नीला पाटणकर, शिकागो भय कथा: त्या वळणावर - निमिष सोनार प्रेम कथा: सरप्राईज - राहुल दवे, मिशिगन बोध कथा: असा हा जगदीश! - प्रणाली कदम || कला विभाग || अक्षता दिवटे पेंटिंग शरण्या गिर्जापुरे पेंटिंग सिद्धेश देवधर व्यंगचित्रे हेमंत बेटावदकर पेंटिंग सद्गुरू वाक्ये (ईशां फौन्डेशन) तीन कविता: धगधगते वास्तव - स्वप्नील धने