प्रेरणा कथा: अंधारातूंन प्रकाशाकडे - नीला पाटणकर, शिकागो
सुखदा व सुधाकर यांचे नुकतेच लग्न होऊन,सुखदाचे पोलीस वसाहतीत नव्याने आगमन झाले होते.सुखदा एकदम खुषीत होती.सुखदाला पोलीस वर्दी पद्दल खूप अभिमान,कौतुक व आकर्षण होते. त्यामुळे पोलीसी करीयर मधीलच तिला नवरा हवा होता.तसा तो मिळाला होता.तिचे लहानपणा पासूनचे स्वप्न सत्यात उतरले होते.
लहानपणा पासून सुखदा आत्या व वडीलांच्या अंगा खांद्यावर वाढली होती. आईचे डोक्यावरच छत्र ती जन्माला आल्या आल्याच गमावून बसली होती. खेडेगावात बाळंतपणात आलेल्या कांही अडचणींमुळे तिचा मृत्यु झाला होता.आत्या प्रौढ अविवाहित असल्याने तिने तिची जबाबदारी अंगावर घेतली होती.वडीलांनीही आपल्या गोड चेहऱ्याच्या मुलीला सावत्र आई न आणण्याचा निर्णय घेतला होता.मुलीकडे पाहुन सुखद आनंद त्यांना मिळे,म्हणूनच त्यांनी तिचे सुख देणारी ती सुखदा असे नांव ठेवले होते.
तिचे वडिलही या पोलीसी क्षेत्रात होते. ती पाच वर्षाची असतांना तिचे हे ही सुख नियतीला बघविले नाही.ते कामावर असतांना त्यांच्यावर दहशतवादींनी प्राणघातक हल्ला केला.त्यात ते मृत्युमुखी पडले होते.या घटनेने लहान वयात तिचे मन हादरून गेले होते.त्यांचे शौर्य व धाडस तिला नेहमीच आकर्षित करीत असे.भावाच्या आलेल्या पैशावर व इतर सटरफटर काम करून बहीण दोघींचा उदरनिर्वाह करीत होती.तिला हवा तसा नवरा शोधून आत्याने तिचा सुधाकरशी विवाह करून दिला.व ती एकटी मोलमजुरी करून गावाकडे राहात होती.
सुखदाचे सासू-सासरे गांवा कडील शेती करत होते.व एक धाकटा दीर आणि छोटी नणंद गांवी शालेय शिक्षण घेत होते.सुधाकरची नुकतीच कोकणात तालुक्याच्या ठिकाणी हवालदार म्हणून नेमणूक झाली होती.नवनवाळ राजा-राणीचा संसार थाटला होता.कुठली वस्तु कुठे ठेवावी यांचे नियोजन व विचार डोक्यात घोळत असतांनाच सकाळी झोपेतूंन सुखदा दचकून जागी झाली.
घड्याळ पाहता सकाळचे सहा वाजले होते.ती लगबगीने उठून कामाला लागली.चहा करता,करता तिने सुधाकरला हांक मारली.अरे उठ सहा वाजून गेले.कामावर जायचंय ना ? आटप लवकर उशिर होईल.
साखर झोपेतूंन ताडकन् जागा होऊन,सुधाकर आवरूं लागला.इकडे सुखदाने चहा,नास्ता व डबा करायला सुरूवात केली.इतक्यात आलेला पेपर वाचतच सुधाकरने चहाचा पहिला घोट घेतला.पेपरच्या पहिल्याच पानावर ठळक अक्षरात बातमी होती.रात्रभर पडलेल्या धुव्वाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते, अनेक ठिकाणी दरडी कोसळुन लोक मृत्युमुखी पडले होते.
कामात सुखदाचा हात एकदम जलद होता.तिने रात्रीच भाजी चिरून-कापून ठेवली होती.तिचा नास्ता व भाजी पोळीचा डबा तयार सुध्दा झाला.तो पर्यंत सुधाकर वर्दी घालुन तयार होऊन नास्ता करूं लागला.इतक्यात सुधाकरचा फोन खणखणला त्याला ताबडतोब कामावर रूजु होण्याचा हुकुम साहेबांनी कळवला.सुधाकर कसाबसा नास्ता-पाणी करूंन व डबा घेऊन,सुखदाला बाय करून गेला.
पोलीस चौकीवर पोहचल्यावर सुधाकर साहेबांची आॅर्डर मिळाल्या प्रमाणे पोलीस पथक घेऊन
त्वरीत दरडीच्या ठिकाणी पोहोचला.सर्वत्र हाहाःकार झाला होता.लोकांच्या केविलवाण्या किंकाळ्या काना वर पडत होत्या.सुधाकर व त्याच्या सहकाऱ्यांनी मिळुन लोकांना मदतीचा हात देऊन जीवीत व्यक्तींना बाहेर
काढुन जीवदान दिले. मृत व अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यांत त्यांना बऱ्यापैकी यश आले. डॉक्टर व रूग्णवाहीनींना पाचारण करून रूग्णांना हाॅस्पिटल मधे नेण्यात आले.लहान कच्चे-बच्ची,जखमी,भितीने घायाळ झालेल्यांवर प्रथमोपचार करण्यांत आले.मृतव्यक्तींना घोषित करणे फार दु:खद व कष्टांचे काम होते.कांही चिखलात रूतलेले होते.त्यांना हात देऊन वर काढण्यांत यश येत होते.
सर्व स्थिरस्थावर होत होते इतक्यात सुधाकरला लहान बाळाचा हात ढिगाऱ्यातून बाहेर आलेला दिसला.शरीर माती खाली व खोल बारीक बाळाच्या रडण्याचा आवाज ही सुधाकरच्या कानावर आला. त्याने
पटकन जाऊन त्या बाळाला काढण्याचा प्रयत्न केला.तो सफल ही झाला.बाळाला हातावर घेऊन तो हात पुढे करून पुढील व्यक्तीला ते बाळ देतोय तोच अचानक त्याच्या डोक्यावर दरड कोसळुन मोठा कातळ अंगावर पडला.सहकारी धावत येऊन बाळ हातात घेतले व त्याला सावरत होते, तोवर सुधाकर खाली पडला. बाळ सहीसलामत बाहेर येऊन त्याला सुधाकरमुळे जीवदान मिळाले.त्याची आयुष्याची दोरी बळकट होती.
नशिबाने अनेक रूग्णवाहिनी पैकी एक रूग्णवाहिनी परत येत होती त्यातून सुधाकरला नेत असतानाच त्याने अखेरचा श्वास सोडला होता.परंतु श्वास सोडतांना तो म्हणाला,बाळाचे आई-वडील जीवीत नसतील तर त्याला अनाथालयात ठेऊ नका.हे बाळ सुखदाला द्या.तिला लहान मुलांची खूप आवड आहे.एवढे बोले पर्यंत तो पूर्ण जीवनांतून कोसळलाच म्हणायला हरकत नाही.कारण तो असे बोलून जो बेशुद्धावस्थेत गेला तो पुन्हां शुध्दीत आलाच नाही.त्याला मृत घोषित करण्यात आले.
सुधाकरने प्राण सोडतांना जी इच्छा व्यक्त केली होती ती सहकाऱ्यांनी रेकाॅर्ड करूंन नोंद करून ठेवली होती.सुधाकरच्या अपघाताची बातमी हाहा म्हणतां वाऱ्या सारखी पसरली.पण अपघाती व्यक्ती आपलाच नवरा आहे.हे सुखदाचे मन मान्य करायला तयार नव्हते.प्रत्यक्ष जाऊन तिला सांगून सहकाऱ्यानी समजावले.तेव्हां कुठे तिने ग्राह्य धरले.तिला वाटले आपल्या ललाटी सुखच नाही.प्रथम आई,वडील अन् आता नवरा आयुष्यावरचा विश्वासच उडला.
बाळाची वैद्यकिय तपासणी करून बाळ निकोप व सुदृढ असल्याचे जाहीर करण्यात आले. बाळाला फारशी दुखापत झाली नव्हती ही एक ईश्वरी लीलाच म्हणावी लागेल.चौकशी अंती बाळाचे आई-वडील,नातेवाईक कुणीच हयात नव्हते असे कळले.त्यामुळे ते बेवारस,अनाथ घोषित करण्यात आले.त्याची रवानगी अनाथालयात करावी असे ही जाहीर करण्यात आले.बाळ सात ते आठ महीन्यांच होत.व मुलगी होती.
सुखदा दु:खातून सावरल्यावर सहकाऱ्यांनी सुधाकरची शेवटची इच्छा सांगून,त्यांनी रेकोर्ड करून ठेवलेली नोंद तिला ऐकवून व दाखवून पुढे काय करायचे विचारले.बाळ मुलगी आहे.हे तिच्या निर्दर्शनास आणून दिले.त्याला सुखदाचा होकार होता.तिने ही दुसरा विवाह न करण्याचा निर्धार केला होता.तिच्या मान्यतेने पुढील सोपस्कार करून बाळ तिला देण्याचे ठरले.नंतर थोड्याच दिवसात कायद्यानुसार प्रक्रिया करून सुखदाच्या संमत्तीने आणि साक्षीदारांच्या साक्षीने बाळ तिच्याकडे सोपविण्यात आले.
सुखदाची मनस्थिती स्थिरस्थावर झाल्यावर ती रीतसर सुधाकरचे नोकरीतील पैसे घेऊन पोलीस वसाहत सोडून आत्याकडे मुलीसह गावी गेली.जमीनीतून ती मिळाली म्हणून तिने तिचे नांव अवनी ठेवलं. ती खेड्यात लहानाची मोठी झाल्यामुळे व इंग्रजी शाळा नसल्यामुळे ती सातवी नंतरचे पुढील शिक्षण घेऊ
शकली नव्हती.शेतीची,मजुरीची काम करत होती.शहरा सारखे दुसरे व्यवसाय ही तेथे उपलब्ध नव्हते. मुलीला मोठी करून शिकवायचे म्हणजे जास्त पैसे मिळवणे गरजेच होते.शेतीवर अवलंबून निभावणे शक्य नव्हते.असा विचार करून तिने तालुक्याला यायच ठरवलं.सुधाकर होता ते गांव ओळखीच झाल होत म्हणून ती तेथेच आली.माहितील एकीने तिला लहान खोली मिळवून दिली.
श्रावणाचा महिना होता.पाऊस नुकताच थांबला होता. डॉ.सुरेश व सुलभा मध्यमवयीन जोडपे गांवा
तील घर सोडून गावा बाहेर उच्चभ्रू वस्तीत व आलिशान फ्लाट मधे दोन मुलांच्या आग्रहास्तव अलिकडेच राहायला आले होते.सोळाव्या मजल्या वरून हिरवीगार वनश्री खूपच छान दिसत होती. श्रावणसरी नुकत्याच थांबल्या होत्या. दोघ ही सकाळी चक्कर मारायला व कुणी ओळखीचे दिसतोय का बघायला खाली उतरले. आजुबाजुचा परिसर त्यांना नवीनच होता.सुंदर रंगी-बेरंगी फुलांचा बगीचा लक्षणीय दिसत होता.
पाऊस कमी झाल्यामुळे आबाल-वृध्द पाय मोकळे करायला बाहेर पडले होते.पुढे गेल्यावर भाजीचे मळे डौलात डोलतांना दिसत होते.गवताच्या तृणपातीवर फुलपाखंरू स्वच्छंदी विहरत होती. पानावरील जलबिंदू मोत्या सारखे नितळ दिसत होते.आकाश संमिश्र रंगाने खुलुन दिसत होते. क्षितीजा पलीकडे इंद्रधनु हळुंच डोकावत वर येत होते.कोवळी सोनेरी किरणे झाडातूंन डोकावून दोघांना खूणावूं लागली. चला आता माघारी फिरा म्हणून! त्या दोघांनी परतीची वाट धरली.
सुरेश डॉक्टर असल्याने व मधला वार असल्याने त्याला नऊ वाजता दवाखान्यात सर्व आटोपून
जायचे होते.थोड्या अंतरावर त्याचे खास स्नेही त्याला भेटले.
"अरे तुम्हीं इथे कुठे ?"
"आम्हीं नुकतेच येथे "अभ्युदय " सोसायटीत राहायला आलोय."
"अरे वा छान ! सुरेश म्हणाला चल आता वर आपण आल्याचा गरमा,गरम चहा पिऊ या."
तिघेही लीफ्टने वर गेले.सुलभाने फक्कड आल्याचा चहा व जिंजर बिस्कीट डायनिंग टेबलावर ठेऊन सुरेशला हांक मारली.
तितक्यात न्युज पेपर आला.त्यावर ओझरती नजर फिरवतां ठळक बातमी व दु:खद घटनेची पावसाची क्षणचित्र दिसली.पावसाने दरड कोसळुन अनेक लोक मृत्युमुखी पडल्याचे वाचून मन विषण्ण झाले.सुरेश हळहळ व्यक्त करत म्हणाला डाॅक्टर म्हणून मला कर्तव्य बजावले पाहीजे. गप्पा गप्पात तो बोलुन गेला. दोन वर्षांपूर्वी अशीच घटना घडली तेव्हां मी जातीने लक्ष घालून रूग्णसेवा केली होती. एक लहान बाळ वाचल होत. देवाची अगाध लीला आहे.पण एक प्रमाणिक नवतरूण हवालदार मृत्युमुखी पडला होता. ही दोन मित्रांची बोलणी काम करता,करता एकीकडे सुलभा ऐकत होती.
डॉक्टर सुरेश स्वखुषीने नेहमी अपघात ग्रस्त व अडीअडचणींतल्या लोकांना डॉक्टरी उपचार
मोफत करून समाजकार्य करीत असे. नेहमीच्या सरावाने त्याला कल्पना होती.दवाखान्यात जखमींची
भरती झाली असेल.तितक्यात दवाखान्यातून व पोलीस चौकीतून त्याला फोन आलाच.तात्काळ तो मित्रा
सह खाली उतरला.व त्याने मित्राला बाय करून दवाखाना गाठला.
जखमींना व गरजूंना मलमपट्टी करून घरी पाठविले.यावेळी जीवीत हानी फार झाली नाही
ही देवाचीच कृपा होती.काम आवरून सुरेश दुपारी येऊन स्नान,जेवण आटपून पुन्हां जखमींना व इतर
पेशंटना व्हीजीट देण्यास गेला.
तेवढ्यात भारतातील बातमी वाचून अमेरिका व इंग्लंड मधुन अक्षय व अमेयचे फोन आले.नित्य नेमाने बाबा रूग्णाची सेवा करायला गेले असतीलच अशी चौकशी केली.सुलभाने हो सांगितले.मोठा अमेय इंग्लंड मधे डॉक्टर होता. (हाडांचा सर्जन ) व दुसरा अक्षय अमेरिकेत आय,आय,टी चा इंजिनियर होऊन
आय,टीत होता.नुकतीच दोघांची लग्न होऊन ते तेथेच स्थायिक झाले होते.या दोघांनीही बोलवित पण त्यांना तेथे येथील सोडून जायच नव्हत.मधूनच जाऊन येत असत.
मुलांचा फोन खाली ठेऊन सुलभा दुपारची वामकुक्षी करायला म्हणून बेडरूम मधे गेली. इतक्यात दारावरची बेल वाजली.सुरेश आताच गेलाय तोच कांही विसरला असेल म्हणून परत आला असेल अस वाटुन तिने दार उघडले.तर दारात दोन वर्षाची मुलगी हाताशी धरून एक तरूणी उभी होती. प्रथम अवेळी बेल वाजवली म्हणून तिने सुलभाची माफी मागितली.व नंतर आपले काय काम आहे हे सविस्तर सांगून आपली पूर्व कहाणी पूर्ण कथन केली.
हल्ली सुलभालाही कामाने क्षीण येऊ लागला होता.व सुखदाची कहाणी ऐकून तिला तिच्या
विषयी कणव आली. कारण दोन वर्षा पूर्वी अपघाताच्या वेळी सुरेशने बाळाला म्हणजे अवनीवर उपचार
केले होते तिच ही मुलगी असावी आणि दरड कोसळुन मृत्युमुखी पडलेला हवालदार हीचाच नवरा असावा
असा अंदाज वाटला. अस असेल तर काय हा दैवी योगायोग आहे. सुलभाने मनाशी ठरविले सुरेशला विचारू
व ठरवू.तूं उद्या सकाळी ये मी तुला काय ते सांगते.अस सुखदाला सांगून परत पाठविले.
संध्याकाळी चहा पिताना सुलभाने सुरेशच्या कानावर दुपारची सर्व हकीकत घातली.सुरेशला सगळे पक्क आठवले.तीच ही मुलगी व तरूणी आहे.ही खात्री वाटली.
सुखदालाही बहुतेक आशेचा किरण दिसला असावा.कारण ती दुसऱ्या दिवशी मुलगी अवनी सह घरून जरा लवकरच सकाळी सुलभाकडे येण्यास निघाली.तिच्या मनांत अनेक विचारांच काहुर माजल होत. आपल्याला अवनी सह कामाला येण्यास परवानगी देतील कां ? अवनी तिला सारखी विचारत होती.आपण कालच्या मावशींकडे जातोय कां ? सुखदा हो म्हणाली.हो पण तिथं शहाण्या सारख वागायचं.अवनीने त्यावर मान डोलावली.विचार चक्रात ती कधी दारापाशी आली तिला कळलेच नाही.दबकतच तिने दारावरील बेल वाजवली.
सुरेश व सुलभा नुकतेच फेर-फटका मारून आले होते.व चहा पित सुखदा विषयी चर्चा करत होते इतक्यात दारावरील बेल खणखणली.सुलभा त्वरीत उठली व सुरेशला म्हणाली, थांबा मी बघते. तिला वाटले दूधवाला अजून आला नव्हता तोच असावा. कारण त्यांना आज कालच्या दूधाचा चहा प्यावा लागत होता.
त्याला जरा दमच भरते, म्हणतच तिने दार उघडले तर दारात या दोघी मायलेकी उभ्या होत्या.सुलभाकडे बघून सुखदा म्हणाली,माफ करा हं मी थोडी लवकरच आले.अस म्हणून सुखदाने अदबीने हात जोडले. सुलभा म्हणाली ठीक आहे. या दोघी आत,सुरेशला सुखदाला दवाखान्यात पाहील्याचे आठवले कारण बाळ बघायला ती आली तेव्हां सुरेशने तिला धीर देऊन चार शब्द आपुलकीचे सांगितले होते.
सुखदाने विचारणा केल्यावर,सुलभाने होकार दिला.व तिला काय येत.काय काम करणार ते सर्व व मोबदला ठरवून कामाला आज पासूनच सुरूवात कर सांगितले.अवनीला बरोबर आणलस तरी चालेल. एकटीला घरी ठेवण योग्य नाही.आत्याबाई मधून येत. पण त्यांना आताशा काम होत नसे. सुखदा नेमाने मुलीसह कामाला येऊं लागली.सुखदाला नवीन,नवीन पदार्थ शिकून करण्याची खूप आवड होती. तसेच घर नीट-नेटके ठेवणे.शिवणकाम यांत ही तिला गोडी होती.ते तिचे कसब पाहुन सुलभा तिला सूचना देऊन करून घेत असे. त्यामुळे सुखदाचा उत्साह वाढला. दिवसें दिवस तिच्या स्वयंपाकाची चव स्वदिष्ट होत गेली. सर्व चवीने
अन्नग्रहण करू लागले.त्याचा तिच्या मुखावर आनंद दिसे.
दरम्यानच्या काळात अवनीला बेबी क्लासला घातले.सुखदाला काम करून ही मधे थोडा वेळ मिळे.तेव्हां व रात्री ती साड्यांना फॉल,पिको करून देऊ लागली.सुलभा ही त्यात माहीर होती. तिने ब्लाऊज लहान मुलांचे कपडे शिवण्याची कला सुखदाला शिकविली.सुखदा सर्व पटापट आत्मसात करत होती पाहुन सुलभाला पण हुरूप आला.सुलभाने तिला मशीन घेण्यास पैसे दिले.आता ती जोमाने फॉल,पिको,कपडे ब्लाऊज शिवून पैसे मिळवून लागली.दिवाळीचे खाद्य पदार्थ करून त्याची ही विक्री करून ऑर्डर घेऊ लागली.
सुलभाने सुखदाला अवनीसाठी व तिला स्वत:साठी बचत करण्यास शिकविले.सुखदाला बॅंक व्यवहार कसा करायचा ते जाणून देऊन,थोडे जुजबी इंग्रजी शिकविले. अशा प्रकारे तिला स्वावलंबी केले!
इकडे जसं जसे दिवस जाऊं लागले तशी अवनीची शिक्षणातील गती वाढली. उत्तम मार्क मिळवून ती
वरच्या वर्गात जात होती. एक हुषार विद्यार्थीनी म्हणून शाळेत तिला ओळखू लागले. हळुहळु सुखदाची आर्थिक परीस्थिती सुधारूं लागली. तिने सुलभाच्या सहकार्याने छोटंस दोन खोल्यांचे एक घर घेतले. तिने जसे मिळतील तसे अत्यंत प्रामाणिकपणे सोयीनुसार सुलभाचे पैसे परत केले.
मध्यंतरीच्या काळात सुखदाचे सासू-सासरे पुत्र वियोगाने जे आजारी पडले ते दिवसें दिवस
खंगतच गेले. सुखदा जमेल तसे गावी जाऊन पैशाची मदत करीत असे.धाकटा दीर आठवी पर्यंत शिक्षण
घेऊन घरची शेती होती, ती करत होता. तो शेती सोडून शहरात येण्यास कबूल नव्हता. लहान नणंदेला सातवी
पर्यंत शिक्षण देऊन गावच्याच एका मुलाशी सासू सासऱ्यानी लग्न लावून दिले.त्या नंतर हाय खाऊन दोघही
मृत्युमुखी पडले. कांही दिवसा पूर्वी सुखदाच्या आत्याचेही म्हातारपणा मुळे निधन झाले. तेव्हां शक्यतोपरी
सुलभाने औषध-पाणी करून तिला आधार दिला व तिने तिचे कर्तव्य बजावले होते.
अवनीला दहावीला नव्वद टक्के मार्क मिळालेले पाहुन सुलभा व सुरेशने स्वखुषिने अवनीच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली.सुखदाचे पोलीसी पेशावर आरंपार पहिल्या पासून प्रेम होत म्हणून तिने अवनीला त्याच क्षेत्रात घालायची ठरविले.लहानपणापासून ती अवनीला रोज एक शौर्याची गोष्ट सांगत असे.जेणे करून अवनीच्या मनांत ही स्फुर्ती निर्माण व्हावी.त्यावरचे सिनेमा दाखवी. चित्रकथा शूरव्यक्तींची पुस्तक वाचायला आणून देई. त्याप्रमाणे तिची वाटचाल चालूं असतांनाच तिला ट्रेनिंगचा कॉल आला व तिची गाडी पोलीसी मार्गावर वळली.
सुलभा व सुरेशच्या डोक्यात घरबसल्या कांही व्यवसाय करावा असे आले. सुखदाला हाताशी धरून
घरगुती भाजी-पोळी सेंटर काढायच ठरलं. सुखदाला ते देवा समान होते.तिने झटकन होकार दिला. हल्ली सुरेश वयोमाना प्रमाणे डॉक्टरी व्यवसाय कमी करत होता.तेव्हां दवाखान्यातील एक रूम त्याने नव्या उद्योगास दिली.जागा मोक्याची व रहदारीची होती.एकटेच राहणाऱ्या नव-विवाहित दांपत्यांना ऑफिसला जाता,जाता घरगुती भाजी-पोळी नेण सोयीस्कर पडेल ही कल्पना होती. आणखी एक मदतनीस ठेऊन दसऱ्याच्या शुभ मुहर्तावर सेंटर सुरू केले. पहील्या दिवसा पासून अफाट मागणी आली.नियमित घेणारे रोजचे ग्राहक मिळाले.
अवनी प्रत्येक परीक्षेत अव्वल दर्जात पास होत होती. तिचे भविष्य उज्वल होते.एके दिवशी आनंदाचं मोहळ घरात आलं. अवनीची फौजदार या हुद्यावर नेमणूक झाली. सुखदाच स्वप्न पूर्ण झाल. लहान वयात तिला हे यश मिळाल म्हणून तिचा "होतकरू महिला" मधे जाहीर सत्कार झाला. टी.व्ही वर तिला बघतांना सुरेश, सुलभा व सुखदाचा उर भरून आला. योग्य ठिकाणी व योग्य व्यक्तीला मदत केल्याच सार्थक झाले. सुखदाला तर स्वर्ग दोन बोट उरली. "अंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन डोळे" अशी अवस्था सुखदाची झाली. त्या दोघी ही आता सुरेश व सुलभाच्या घरातीलच सदस्य झाल्या होत्या.
भाजी-पोळीच केंद्र धो,धो चालत होत. अनेक ठिकाणी शाखा उघडण्याचे संदेश येत होते. आता ती सर्व जबाबदारी सुरेश व सुलभाने सुखदावर सोपविली होती.ती ते सांभाळत होती.ते दोघे त्यातून निवृत्त झाले होते.तिने आणखी दोन मोक्याच्या ठिकाणी शाखा उघडल्या नवीन होतकरू मुलांची नेमणूक केली.ती आता एकदम व्यवहारी निपुण धंदेवाईक व लघु उद्योजीका झाली होती. छान सांभाळत होती.
सुखदाचा फॉल, पिको, कपडे शिवण्याचा व्यवसाय ही एका टपरीत भाडे तत्वावर चालूं होता. तेथून
तिला दरमहा पैसे मिळत असत. सुखदा रोज एक फेर-फटका मारून लक्ष ठेवत असे. सूचना देत असे.कारण तिने मिळविलेल्या विश्वासावर गिऱ्हाईक तेथे येत असत.आता तिने मुली साठी मोठा फ्लॅट बुक केलाय.
अवनी नको, नको म्हणत होती. मी घेईन तू खूप केलस आता विसावा घे म्हणत होती.पण सुखदाला ते मान्य
नव्हत.सुखदा आता लघु उद्योजिका झाली होती.तिला ही कर्तृत्वान स्रिचा पुरस्कार जाहीर झाला होता.
बॅंकेतही बऱ्यापैकी शिल्लक जमा झाली होती. सुरेश व सुलभा उतारवयात मुलांकडे अमेरिकेस स्थायिक न होता आरामात उर्वरित आयुष्य सुखदा, अवनी बरोबर सोबतीने घालविणार होते. वारंवार सुखदाचा बॅंकेशी संबंध येत असे तेव्हां तिने अवनी साठी एक मुलगा हेरून ठेवला होता.तो सुरेश,सुलभा व अवनीच्या संमत्तीने मंजुरी मिळवून पक्का करून टाकला. थोड्याच कालावधीत दोघांच स्वत:च्या कमाईच्या पैशाने लग्न करून दिले.
काळाची पावलं ओळखुन पुढे जाणारी वृत्ती असावी लागते.ती हवीच.त्याला कांहीच कमी पडत नसत या जगात एवढ लक्षात ठेवलं तरी पुरेस आहे. योग्य वेळी योग्य सुचवण्याची क्षमता, मानसिकता असणे गरजेच असत.योग्यवेळी योग्य माणसाची भेट होणे.हा ही एक नशिबाचा भाग असतो. दुसऱ्याचे कलागुण ओळखण्याची नजर व मनाचा मोठेपणा असावा लागतो.व तो मोठ्या मनाने मान्य करावा लागतो.तो सुरेश व सुलभा दोघां मधे होता,म्हणून सुलभा व सुरेशला सुखदाच्या रूपाने म्हातारपणीचा "आधारस्तंभ" मिळाला आणि त्यांचा दोघांचा व सुखदाचा जीवन प्रवास गोड झाला.व सुखदाने ही जिद्दीने तो पुढे नेला." अंधारातूंन प्रकाशाकडे तिला रस्ता मिळाला. तसा तुम्हांला पण मिळो.हीच सदिच्छा !
दि.६ ऑक्टो.२०१९.
© नीला पाटणकर