जसे आपण तसे जग? आशू लॅमोस, मस्कत
storybonds@gmail.com
(लेखिका मुळच्या मुंबईच्या असून त्या होम मेकर आहेत आणि लहान मुलांसाठी नियमित गोष्टी लिहितात)
एक मुलगा आणि एक मुलगी खूप चांगले मित्र होते. ते नेहमी एकत्र आणि सोबत खेळत.
एके दिवशी त्या मुलाकडे मार्बल्स म्हणजे गोट्या यांचा संग्रह होता.
काही छोटे मार्बल्स, काही मोठे मार्बल्स आणि त्यात एक इंद्रधनुष्याच्या रंगाचा मार्बल होता. हे सगळे एका बॉक्स मध्ये बंद होते.
इंद्रधनुषी रंगाचा मार्बल त्या मुलाला खूप आवडायचा. त्याच्या पूर्ण मुठीत मावेल एवढा तो मोठा होता.
त्या मुलीकडे त्यादिवशी मिठाईचा बॉक्स होता.
मार्शमेलो, शुगर कॅण्डी, जेलीबीन आणि हृदयाच्या आकाराचे चॉकलेट हे सगळे प्रकार त्यात होते. तिच्या संपूर्ण मुठीत मावेल एवढे मोठे ते हृदयाच्या आकाराचे चॉकलेट होते. ते तिच्या सर्वात आवडीचे चॉकलेट होते. इतर सर्व चोकलेट्स चांदीच्या वेष्टनात गुंडाळलेली तर हृदयाच्या आकाराची चॉकलेट सोन्याच्या वेष्टनात गुंडाळलेले होते. हे सगळे एकाच बॉक्स मध्ये बंद होते.
त्यादिवशी खेळतांना त्या दोघांनी एकमेकांना विचारले तुझ्याकडे बॉक्समध्ये काय आहे? मुलगा म्हणाला माझ्याकडे बॉक्समध्ये मार्बल्स आहेत आणि मुलीने सांगितले तिच्याकडे बॉक्समध्ये मिठाई आहे.
दोघांनी एकमताने ठरवले की आज त्याने तिला सगळे मार्बल द्यायचे आणि ती त्याला तिच्या जवळची सगळी मिठाई देईल.
त्या मुलाने त्याच्या आवडीचा इंद्रधनुषी मार्बल मुलीच्या नकळत स्वतःच्या खिशात लपवला आणि इतर सर्व मार्बल असलेला बॉक्स त्या मुलीच्या स्वाधीन केला.
त्या मुलीने तिच्या आवडीच्या हृदयाच्या आकाराच्या चॉकलेट सहित संपूर्ण मिठाई असलेला बॉक्स त्या मुलाच्या स्वाधीन केला.
त्यादिवशी मुलाने दिलेले मार्बल्स खेळून आनंदाने ती मुलगी रात्री झोपून गेली.
त्या मुलाने मुलीची बॉक्स मधली सगळी मिठाई खाऊन टाकली तरी त्याला त्या रात्री झोप आली नाही.
तो मुलगा रात्रभर हाच विचार करत राहिला की त्याने जसे इंद्रधनुषी मार्बल लपवले होते प्रमाणे त्या मुलीने सुद्धा तिची नेमकी कोणती फेवरेट मिठाई त्याच्यापासून लपवली असेल?
हाच प्रश्न त्याला सतावत राहिला.