'शिक्षक' नवयुगाचा शिल्पकार! – सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव
असं म्हणतात, आयुष्यात शिकणे कधी थांबत नसते. आपण सर्वच येणाऱ्या अनुभवातून काहीना काही शिकतच असतोच. आपल्याला घडविण्यात आपल्या पालकांबरोबर शिक्षकांचा अर्धा वाटा असतो. आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम एक शिक्षकच करीत असतो. म्हणूनच शिक्षकांना गुरु म्हणतात. नव पिढी निर्मितीची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते.
शाळा म्हणजे विद्येचे मंदिर त्या मंदिरात विद्येचे दान होत असते. विद्येची देवता म्हणजेच सरस्वती आणि प्रत्येक शिक्षकांच्या मुखातून विद्यार्थ्यांसाठी निघालेले शब्द म्हणजेच सरस्वतीच्या हातातील लेखणीतून निघालेले काव्य . हेच सुर नवपिढी निर्मितीचे कार्य करीत असतात.
असं म्हणतात ज्ञाना पेक्षा श्रेष्ठ दान नाही. हे दान देण्याचे भाग्य शिक्षकांना लाभलेले असते. आईवडिलांनंतर बालकांवर संस्कार घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. ती जबाबदारी कुशलतेने पारपाडण्या साठी प्रत्येक शिकक्षक झटत असतो. माझ्याकडून प्रत्येकवेळी विद्यार्थ्यांच्या बुध्दी ला कोणते नवनवीन भोजन मिळेल! जेणे करून विद्यार्थ्यांच्या बुध्दिचा विकास होईल यासाठी सतत प्रयत्नशील असतो. बदलत्या काळानुसार शिक्षण पध्दतीत सतत बदल होत असतात. सतत अभ्यासक्रम बदलत असतो. नवनवीन विषयांची त्यात भर पडत असते. म्हणून प्रत्येक शिक्षकाला सतत नवनवीन अभ्यासक्रम व शिकवण्याच्या नवनवीन पध्दतींचा सतत अभ्यास करत रहावे लागते. नवीन पिढी घडवून नवं राष्ट्र निर्माण करण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो.
इथे मला आमच्या दहावीच्या वर्गाला शिकविणाऱ्या सहस्रबुद्धे मँडमांचा उल्लेख करावासा वाटतो. माझ्या मते त्या एक आदर्श शिक्षिका आहेत. आजही तीस वर्षांनी सुद्धा त्या मला आठवणीत आहेत एक आदर्श शिक्षिका म्हणूनच. घरची जबाबदारी पारपाडून लोकलचा धकाधकीचा दीड ते दोन तासाचा प्रवास करुन त्या शाळेत येत असे. सतत वर्गात उभे राहून शिकविणे, धावपळ करून लोकल पकडणे या मुळे त्यांना वयाच्या पंन्नासाव्या वर्षी पाठ दुखीचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांना दाखविले असता त्यांच्या पाठीचे काही मणके थोडे तिरपे झाल्याचे आढळले. त्यांच्याकडे नववी व दहावी च्या संस्कृत आणि मराठी या विषयाची जबाबदारी होती. त्या आम्हाला वर्गशिक्षिका म्हणून लाभल्या होत्या आणखी तीन वर्गांना त्या मराठी शिकवत. त्यांना होणाऱ्या त्रासामुळे संस्कृत विषय दुसऱ्या सरांकडे देण्यात आला. पण मराठी हा विषय त्यांच्या कडेच होता. नववी आणि दहावी हे महत्त्वाचे वर्गांना मराठी विषय त्या आधीपासूनच कुशलतेने शिकवत असे. त्यांचे मराठी आणि संस्कृत विषयाला आवश्यक असणारे अवांतर वाचनही खुप होते.
मराठी विषयातील प्रत्येक संदर्भ त्या योग्य उदाहरण देऊन स्पष्ट करण्यात पारंगत होत्या नवनवीन वाचनातील अनुभव सांगून त्यांनी विद्यार्थ्यांची मनं जिंकली होती. वर्गाचा मराठी विषय त्यांच्या कडे असला की प्रत्येक विद्यार्थी स्वतःला भाग्यवान समजत असे. आमच्या दहावी 'ब' या वर्गाची वर्गशिक्षिका म्हणून जबाबदारी त्यांना देण्यात आली. त्यांना होणारा पाठदुखीचा त्रास दिवसेंदिवस वाढतच होता. पण दहावीच्या मराठी विषयाची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यामुळे त्यांनी कधीही रजा घेतली नाही. त्यांना डॉक्टरांनी सुरवातील सहा महीने संपूर्ण बेडरेस्ट चा सल्ला दिला होता त्यावेळी त्यानी तो नाकारला गोळ्या औषधे घेऊन शाळेत येणे हा त्यांचा नित्यनियम होता. पण एक जबाबदार शिक्षक म्हणून त्यांनी रजा नकारली. असं नाही की दुसरे कोणी मराठी विषय शिकवू शकत नव्हते. पण विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका होत्या. प्रत्येक वर्ग आम्हाला मराठी साठी त्याच शिक्षक पाहीजे म्हणून हट्ट करीत असे. त्यांनाही विद्यार्थ्यांचा लळा लागला होता. घरची मंडळी त्यांना राजीनामा देण्यासाठी आग्रह करत होते पण त्यांनी त्यांच्या आग्रहाकडे दुर्लक्ष केले.
दहावीच्या वर्गाची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि माझ्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले मला आवडणार नाही. असे सांगून घरच्या मंडळींना गप्प केले. दोन महीने उलटले त्यांचा त्रास दिवसेंदिवस जास्तच वाढू लागला. त्यांनी विद्यार्थ्यांना जास्तीचे तास घेऊन पोर्षण पुर्ण करून आणि मग मी राजिनामा देईल असे सांगितले. त्यांना होणारा त्रास त्यांनी आम्हाला सांगितला आता मला पाठीत असह्य वेदना होत आहेत डॉक्टरांनी पाठीच्या मणक्यांचे अॉपरेशन केले तरच हा त्रास कमी होईल पण तुम्हाला जास्त वेळ उभे राहणे आणि जास्त दगदग करता येणार नाही असे सांगितले आहे वर्गात एक दिवस त्यांनी सांगितले. पोर्षण पूर्ण झाला पण अजून विद्यार्थ्यांची मराठी विषयाची रिव्हिजन अजून बाकी आहे. माझ्यामुळे तुमचे कुठलेही नुकसान होऊ देणार नाही मी राजीनामा देण्याआधी तुमच्यासाठी एक मराठी मार्गदर्शक लिहून काढते.
त्यांची आमच्यासाठीची तळमळ आणि त्यांना होणाऱ्या वेदनाही आम्हाला जाणवत होत्या. सहामाही परीक्षा झाल्या शाळेला दिवाळीच्या सुट्टया लागल्या आणि त्या पंधरादिवसात त्यांनी पाठदुखीचा असह्य त्रास सहन करून त्यांच्या सहज आणि सोप्या भाषाशैली मध्ये 'मराठी सुलभ मार्गदर्शक' नावाचे प्रश्नोत्तरांचे पुस्तक प्रकाशित केले आणि प्रत्येक विद्यार्थ्याला परवडेल अशाच किंमतीत बाजारात प्रत्येक दुकानात उपलब्ध करून दिले. आणि त्यांनी राजीनामा दिला. त्यांची विद्यार्थांसाठीची धडपड ही खरचं प्रत्येकाच्या आठवणीत राहण्यासारखीच आहे.
आजही सहस्त्रबुद्धे मँडम मला एक आदर्श शिक्षिका म्हणूनच आठवणीत आहेत. अशा गुरूंचे ऋण कितीही गुरू दक्षिणा दिली तरी फिटणार नाही. अशा. विद्यार्थ्यांना दैवत मानणाऱ्या सर्वच शिक्षकांना माझा कोटी कोटी प्रणाम.