Android app on Google Play

 

अध्याय पंधरावा

 

॥ श्रीगणेशाय नमः ॥
ऋषी म्हणे देवी त्रिगुणतामसी ॥ सात्त्विकीही म्हणती तियेसी ॥ सर्वही ते चंडिका दुर्गा ऐसी ॥ भद्राभगवती तीशींच म्हणावें परा ॥१॥
योगनिद्रा हरीची जे बोलिली ॥ ते तमोगुणीं महाकाळी ॥ मधुकैटभा कराया होळी ॥ जे तोषविली ब्रह्मदेवें ॥२॥
दहा भुजा दश आननें ॥ दशपाद कांती काजळासमान ॥ विशाल शोभती जाण ॥ तीस नयन मालाकार ॥३॥
दांतदाढाची प्रभा फांके जाण ॥ रूप राजा अतिभीषण ॥ कांति सौभाग्य रूप गहन ॥ रूपें सुंदर जाण अत्यंत ते ॥४॥
खङ्ग बाण गदा शूल देख ॥ चक्र भृशुंडी धरी हातीं शंख ॥ परिघकार्मुक मस्तक ॥ रुधिरश्रावक धरिती झाली ॥५॥
हे वैष्णवीते जाण माया ॥ महाकाळी दुरत्यया ॥ आराधिती वश्य कराया ॥ चरांचरीं या करिती पूजन ॥६॥
ऋषी म्हणे सर्व देव शरीरापासून ॥ जे प्रकट झाली तेजोघन ॥ महालक्ष्मी ते त्रिगुण ॥ महिषासुरालागुन वधकर्ती ॥७॥
नीलभूजा वदनश्वेत ॥ स्तनमंडलही शुभ्र अत्यंत ॥ रक्त कटी पाद आरक्त ॥ नील मांड्यापोटर्‍या उन्मत्त अतिशयें ॥८॥
विचित्र जघन सुचित्र पुष्पमाळा गळा शोभत ॥ विचित्र चंदन चर्चित ॥ सौभाग्यरूप ते धारणकर्ती ॥९॥
अष्टादश भुजा पूज्य ॥ तेचि जाण सहस्रभुज ॥ आयुधेंही सांगों सहज ॥ तळहाता उजव्यापासून क्रमें ॥१०॥
अक्षमाळा कमळबाण ॥ खङ्गकुलिश गदा जाण ॥ चक्रशूल फरश आन ॥ शंख घंटा दारुण पाशही ॥११॥
दंड चर्म चापशक्ती ॥ पानपात्र कमंडूल हातीं ॥ भुजा येणें आयुधें शोभती ॥ कमळावरी स्थिती जियेची ॥१२॥
सर्व देवमय ईश्वरी ॥ राजा महालक्ष्मी हेचि खरी ॥ सर्वभूता पूज्य बरी ॥ ते सर्वांचे वरी प्रभुत्व ॥१३॥
गौरीदेहापासून उत्पन्न ॥ जे सत्त्वगुणा आश्रय करून ॥ तिसी सरस्वती म्हणती संपूर्ण ॥ शुंभासुराचा जाण नाशकर्ती ॥१४॥
अष्टादशभुजा बाण करीं ॥ मुसळचक्र करीं धरी ॥ शंख घंटा नांगरधारी ॥ कार्मुक करी भूपाळा ॥१५॥
तियेसी पूजितां भक्ती करून ॥ ते सर्वज्ञत्व करी प्रदान ॥ मथनकर्ती निशुंभ शुंभालागुन ॥ दैत्या दोघां जाण मारिलें जिनें ॥१६॥
स्वरूपें सांगितलीं ऐसीं ॥ मूर्तीचीं राजा तुजसी ॥ तिची उपासना कैसी म्हणसी ॥ करावें तुजसी सांगेन ॥१७॥
जेव्हां महालक्ष्मीसी पूजिती ॥ महाकाळी आणि सरस्वती ॥ दक्षिणोत्तर पूज्य होती ॥ आपुलाल्या पतीसह आणिका ॥१८॥
विरिंची सरस्वती मधें जाण ॥ गौरीशंकर स्थापावे दक्षिणे ॥ वामभागीं लक्ष्मीनारायण ॥ पुढें देवता तीन मांडाव्या ॥१९॥
महालक्ष्मी केल्या मधें स्थापन ॥ वामभागीं महाकाळी जाण ॥ दक्षिणे सरस्वती स्थापावी त्यानें ॥ ऐसें पूजन करावें त्यांचें ॥२०॥
जवें पूजावें लक्ष्मीसी ॥ राजा अष्टादशभुजेसी ॥ पूजावें जवें काळीसी ॥ उत्तर दक्षिणेसी जे काळी ॥२१॥
पूजितां काळमृत्यू पाही ॥ शांती होय अरिष्ट सर्वही ॥ जेव्हां सरस्वती पूजिल्या पाही ॥ शुंभासुरा नाहींसे केलें जिणें ॥२२॥
पूजावें जवें नऊ शक्ती ॥ तंवें पूजावा रुद्र गणपती ॥ नमो देवी ऐशा स्तुती ॥ महालक्ष्मीप्रती पूजावें ॥२३॥
अवतारत्रयाचें अर्चन ॥ त्या त्या स्तोत्रमंत्रें करून ॥ अष्टादशभुजेचें पूजन ॥ महिषासुरा जिणें मारिलें ॥२४॥
महालक्ष्मी महाकाळी ॥ सरस्वतीही तेचि बोलिली ॥ सर्व देवांची ईश्वरी झाली ॥ सर्व लोकीं म्हणविली महेश्वरी ते ॥२५॥
महिषासुरा अंतकारी जाण ॥ करितां राजा तिचें पूजन ॥ पूजितां जगधात्री निधान ॥ चंडिका भक्तालागुन दयाळू ॥२६॥
अर्घ्याअदि करूनि अलंकृत ॥ गंधपुष्प आणि अक्षतें ॥ धूपदीप नैवेद्य समस्त ॥ नानाभक्षयुक्त तियेसी ॥२७॥
रक्तस्रावक मांस जाण ॥ राजा करावें बलिदान ॥ नमस्कार आचमन ॥ वंदन आणि सुगंधें ॥२८॥
तांबूल आणि कापूर ॥ भक्तिभावें उपचार ॥ देवी पूजाव्या सर्व प्रकारें ॥ ब्रह्माणी पुरस्कार क्रमानें ॥२९॥
देवीपुढें वामभागीं जाण ॥ छिन्न शिर असुरालागुन ॥ जो करी महिषासुर पूजन ॥ सायुज्य आपण ईशत्व पावें ॥३०॥
पुढें दक्षिंभागीं सिंहासी ॥ ईश्वरधर्म समग्रतेसी ॥ पूजावें देवीवाहनासी ॥ चराचरासी धरिलें जेणें ॥३१॥
तो वाहन अत्यंत शुक्ल ॥ चंदनही श्वेतचि लाविलें ॥ गळाही पुष्पमाळ ॥ बैसला निश्चळ घालूनी ॥३२॥
अष्टदळ पद्म लिहून ॥ अगरू कुंकुम चंदनानें ॥ षट्कोणी तेथें जाण ॥ मध्यभागीं पूजन करावें ॥३३॥
श्रद्धेनें करूनि स्थापन ॥ राजा करावें पूजन ॥ मृत्तिकेची मूर्ति करून ॥ आसनावरीं बैसवावें ॥३४॥
ऐसें करूनि देवीआवाहन ॥ पूजा करावी धर्म जाणत्यानें ॥ अंगउपांग मंत्र जाण ॥ धारणाध्यान तत्पर ॥३५॥
करावी जरी पूजा विशेष ॥ ब्रह्माणी आदि आठही विशेष ॥ आवाहन करूनि तयास ॥ पुष्पधूप आणि तर्पणास करावें ॥३६॥
पूजा करूनिया देवीसी ॥ नमस्कारूनि करी म्हणावें क्षमेसी ॥ प्रथम करूनि भूतशुद्धीसी ॥ करन्यासासी करावें ॥३७॥
अर्घ्यपात्र अर्चनमुद्रा देख ॥ इच्छावें दर्शनपूजा द्रव्यादिक ॥ आचार्य परंपरा विनायक ॥ पीठार्चन सम्यक करावे क्रमें ॥ ३८॥
अर्घ्य आसन आवाहन ॥ स्वशरीर अर्चाध्यानचिंतन ॥ अंगन्यास अर्घ्यपात्रजाण ॥ अस्त्रमंत्रें प्रोक्षून करावी पूजा ॥३९॥
मग जोडूनियां हात ॥ स्तवन करावें येणें चरित्रें अद्भुत ॥ अथवा मध्यगत चरित्र ॥ ना तरी समस्त स्तवावें ॥४०॥
अर्धें चरित्र न जपावें ॥ जप करील तो नाश पावे ॥ स्तोत्रमंत्रें स्तवन करावें ॥ अथवा भावें अंबिकेसी ॥४१॥
प्रदक्षिणा नमस्कार करून ॥ स्वशिरावरी दोन्हीं हात जोडून ॥ क्षमा करी जगदंबे ऐसें जाण ॥ वारंवार स्तवावें ॥४२॥
प्रतिश्लोकीं करावें हवन ॥ पायस आणि घृततिळानें ॥ हवन करावें स्तोत्रमंत्रानें ॥ चंडिकेसी जाण होमद्रव्यें ॥४३॥
देवीनामपदें आणिक ॥ स्वस्थ मनें पूजावी देख ॥ एकाग्र अंजली बद्धे नम्र मस्तक ॥ हृदयीं स्थापन सम्यक करावें नमूनी ॥४४॥
सर्वकाल देवीची भावना जो करील ॥ तो देवीसीचि तन्मय होईल ॥ ऐशा भक्तीनें पूजील ॥ प्रतिदिनी कृपाळ परमेश्वरीसी ॥४५॥
तो इच्छिला भोग भोगुन ॥ चंडिका सुखासी पावेल जाण ॥ जो नित्य न करी पूजन ॥ भक्तवत्सलपूर्ण चंडिकेचे ॥४६॥
त्याच्या पुण्याची बोहरी ॥ जाळून करील परमेश्वरी ॥ यथोक्त विधी जो पूजा करी ॥ सुख लौकरी पावे देवीचें ॥४७॥
ऐसी कथा पुण्यपावन ॥ सुमेधा ऋषी सज्ञान ॥ सुरथ राजासी आपण ॥ करी कथन स्वाश्रमीं ॥४८॥
भागोरी ऋषीसी तेच कथा ॥ मार्कंडेय सांगतां ॥ नित्यानंद म्हणे श्रोत्या ॥ पुढील कथा अवधारा ॥४९॥
इति श्रीदेवीविजय ग्रंथ ॥ मार्कंडेयपुराणसंमत ॥ पंचदशाध्याय समाप्त ॥ झाला येथपर्यंत देवीकृपें ॥५०॥
इतिश्रीदेवीविजय ग्रंथ पंचदशाध्याय समाप्त ॥श्री॥श्री॥श्री॥
॥ श्रीदेवीविजय पंचदशाध्याय समाप्त ॥