Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय अकरावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥
ऋषी म्हणे देवीनें ज्या वेळीं ॥ महाअसुरा मारुनि टाकिले ॥ इंद्रासहित देवमंडळ । अग्नीप्रमुख अंबेसी ॥१॥
कात्यायनी संतोषविती ॥ पावोनि इष्ट लाभ प्राप्ती ॥ प्रफुल्लित होऊनि स्तविती ॥ विकसित अरविंदमुखी जगदंबे ॥२॥
देवी शरणागताचें दुःखनाशके ॥ रक्षी रक्षी वो जगन्नायके ॥ अखिल लोका तूंचि एक ॥ जननी देख सुखदाती ॥३॥
सर्वत्रांचें रक्षण करी ॥ जगदंबे विश्वेश्वरी ॥ विश्वसंरक्षी ईश्वरी ॥ तूं परमेश्वरी चराचराची ॥४॥
तूंचि अंबे आधार देख ॥ जगासी सकळा एक ॥ पृथ्वीरूपें तूंचि अंबिके ॥ अससी व्यापक सर्वत्र ॥५॥
आपरूपें तूंचि जाण ॥ स्थिति करिसी व्यापकपणें ॥ सर्वत्राचें करिसी पालन ॥ तुझ्या पराक्रमासमान नसे कोणी ॥६॥
तूंचि जाण वैष्णवी शक्ती ॥ अनंतवीर्य तूं सर्वार्थीं ॥ बीजरूप या त्रिजगती ॥ पराशक्ती महामाये ॥७॥
देवी केलें तुवां मोहित ॥ हे समस्त जे कां जगज्जात ॥ तुझीच कृपा यथार्थ ॥ मुक्ति हेतू भूमंडळीं ॥८॥
समस्तही विद्या जाण ॥ भेदरूपें तूंचि आपण ॥ तैसेचि स्त्रियाही संपूर्ण ॥ सकळपणें जगामाजी ॥९॥
तूंचि एक सकळही ॥ अंबे संपूर्ण जगीं पाहीं ॥ तेथें करावेत कांई ॥ स्तुतिस्तव्य कांही परापरी नसे ॥१०॥
सर्वभूतालागीं जाण ॥ देवीव्याप्त तूं समस्ता लागून ॥ भक्तीसहित मुक्ती संपूर्ण ॥ करिसी प्रदान स्वभक्तासी ॥११॥
स्तुत्यही तुझी तूंची ॥ स्तवनी बुद्धि तेही तुझीची ॥ ऐसी मती हो आमुची ॥ होऊनी वाचाची वाचा वदविसी तूं ॥१२॥
सर्वांच्या बुद्धिरूपें करून ॥ जगाच्या हृदयीं तूं राहसी जाण ॥ स्वर्गमोक्ष देवी तूं करिसी प्रदान ॥ तुला नमन नारायणी ॥१३॥
कला काष्ठारूपें पाही ॥ तूंचि देशी मोक्ष तोही ॥ विश्वाची शक्ती हरिसी सर्वही ॥ नारायणी घेई नमन आमुचें ॥१४॥
सर्व मंगळामंगळकारी ॥ शिवेसर्वार्थ साधक तूंचि खरी ॥ रक्षकही तूं त्रिंबके गौरी ॥ नारायणनारी नमूं तुज ॥१५॥
सृष्टिस्थिति विनाशासी ॥ निरंतर शक्तिभूत तूंचि होसी ॥ गुणमये करिसी गुणाश्रयासी ॥ नारायणी तुजसी नमस्कार ॥१६॥
शरणागत आर्तदीन ॥ तयाचें करिसी संरक्षण ॥ करिसी सर्वत्राचें दुःखहरण ॥ करितों नमन नारायणी तुज ॥१७॥
हंसयुक्त विमानीं बैससी ॥ ब्राह्मणीरूप तूं धरिसी ॥ कुशोदकें प्रोक्षण करिसी ॥ नमन तुजसी नारायणी ॥१८॥
त्रिशूल चंद्रसर्प धरे ॥ वृषभवाहनीं बैसणारे ॥ माहेश्वरीरूप धरिसी अवसरे ॥ तुज नमस्कार नारायणी ॥१९॥
करूनि मयूराचें वाहन ॥ महाशक्तिधारी ज्ञानघन ॥ कौमारीशक्ति म्हणती तुजलागुन ॥ तुला नमन नारायणी ॥२०॥
गदाशार्ङ्गशंखचक्र ॥ धारण करिसी आयुधें थोर ॥ वैष्णवी रक्षी सर्व प्रकारें ॥ नारायणी नमस्कार करितों तुज ॥२१॥
उग्र चक्र धारण करून ॥ पृथ्वी दाढेवरी केलीसी धारण ॥ घेसी वराहरूप आपण ॥ तुज नमन नारायणी ॥२२॥
नृसिंहरूप उग्र अतिशय ॥ दैत्य मारावया घेतलीसी पाहे ॥ त्रैलोक्या या होसी साह्य ॥ नारायणी पाय वंदू तुझे ॥२३॥
वज्र करीं कीरीटभूषण ॥ सहस्रनेत्र देदीप्यमान ॥ हरणकर्ती वृत्रासुराचा प्राण ॥ तुज नमन नारायणी ॥२४॥
घेऊनि तूं शिवदूतीस्वरूप ॥ दैत्य मारिले तुवां अमूप ॥ तुझें अत्यंत घोर रूप ॥ नारायणीस्वरूपें नमस्कारूं ॥२५॥
मुख तुझें दौंष्ट्राकराळ ॥ गळा घालिसी मुंडमाळ ॥ चामुंडेमुंड मर्दिला सबळ ॥ नारायणी सकळ नमूं तुज ॥२६॥
लक्ष्मीलज्जा विद्या जाण ॥ श्रद्धापुष्टी ध्रुवा म्हणून ॥ महारात्री महामाया नामें येणें ॥ नारायणी नमन तुजसी ॥२७॥
सरस्वती बुद्धि वरिष्ठ ॥ भूतिबाभ्र तामसी उद्भट ॥ नियंते रक्षक ईशश्रेष्ठ ॥ नारायणी संतुष्टें नमूं तुज ॥२८॥
सर्वेशे तूं सर्वस्वरूप ॥ सर्व शक्तीसहित अमूप ॥ भय न यावें आम्हांसमीप ॥ देवी दुर्गारूपें नमूं तुज ॥२९॥
सौम्य ऐसें तुझें वदन ॥ नयन तिन्हीं शोभायमान ॥ रक्षी आम्हा सर्वभूतांपासून ॥ कात्यायनी नमन आमुचें तुज ॥३०॥
ज्वाळा कराळ भयंकर ॥ अशेष मारिलें तुवां असुर ॥ त्रिशूलें करी भय आमुचें दूर ॥ भद्रकाळी नमस्कार असो तुज ॥३१॥
दैत्या केलें तेजहीन ॥ नादें कोंदविलें भुवन ॥ घंटा रक्षो देवी आम्हां संपूर्ण ॥ पापापासून जाण पित्यावरी ॥३२॥
असुरमांसरक्ताचा चिखल ॥ लागला ऐसा करीं उज्वळ ॥ शुंभालागी खङ्ग असो सबळ ॥ चंडिके सकळ नमूं तुज ॥३३॥
रोग जे कां अशेष ॥ रागें रागें करी नाश ॥ लाभ आम्हां सर्वांस ॥ मनोरथ सर्वस्व पूर्ण करी ॥३४॥
तुझाचि जे आश्रय करिती ॥ तयासी नाहीं विपत्ती ॥ त्वद्भक्त आणिका आश्रय होती ॥ दोघेही सद्गती पावती ते ॥३५॥
हें केलें जें आजि तुवां कर्दन ॥ धर्मद्वेष्ट्या असुरामर्दन ॥ रूपें अनेक केलीं तुवां धारण ॥ ऐसें तुजवांचून कोण कर्ता ॥३६॥
शास्त्रविद्याप्रकाशक ॥ तुझेनि वेदावक्तव्य देख ॥ तुजवांचूनि आणिक ॥ दुजा अंबिके न दिसे कोणी ॥३७॥
ममत्वाचा अतिदारुण ॥ अंधकूप तो महान ॥ तयामाजी परि भ्रमण ॥ विश्व संपूर्ण करीतसे ॥३८॥
रक्षण करावीं भय जेथें ॥ विषसर्पापासूनि समस्त ॥ शत्रू जेथें वास करीत ॥ चोरभय जेथें तें ठाई ॥३९॥
जेथें पडला दावानळ ॥ अथवा हो का समुद्रीं केवळ ॥ हे विश्व बुडतां तत्काळ ॥ रक्षी ते वेळें सर्वस्वेसी ॥४०॥
विश्वेश्वरी तूं आपण ॥ करी विश्व हें संरक्षण ॥ विश्वेरूपें तूंचि संपूर्ण ॥ विश्वाही धारणकर्ती तूंची ॥४१॥
विश्वेशाही वंद्य होसी ॥ वंद्याही वंद्य अससी ॥ जो आश्रय या विश्वासी ॥ भक्ती तुजसी होत नम्र ॥४२॥
देवी व्हावें तुवां प्रसन्न ॥ सोडवी आम्हां शत्रूभयापासुन ॥ दुष्ट राक्षसाचा वध संपूर्ण ॥ सध्यांचि जाण केला तुवां ॥४३॥
जगाचीं पापें सर्व ॥ कांहीं एक नाहींसें करावें ॥ उत्पातापासोनि झालें सर्व ॥ दोष व्हावे दूर मोठमोठे ॥४४॥
शरणा गताचें करी रक्षण ॥ विश्वाचें देवी करी दुःखनिरसन ॥ लोकत्रयीं स्तुतियोग्य तूं आपण ॥ वरदजाण व्हावें तुवां ॥४५॥
देवी म्हणे देवहो प्रसन्न झालें ॥ मनीं वर जो तुम्ही इच्छाल ॥ देईन मी तो मागा सकळ ॥ जगा होईल उपकार जेणें ॥४६॥
देव म्हणती दुःखनाश करी ॥ या त्रैलोक्याचें विश्वेश्वरी ॥ इतुकें करावें लौकरी ॥ आमुचे वैरी मारी तूं ॥४७॥
देवी म्हणे वैवस्वत मन्वंतरीं ॥ आठविसाव्या युगाभीतरीं ॥ शुंभनिशुंभ अन्यही भारी ॥ उत्पन्न असुर होतील ॥४८॥
नंदगोपकुळीं उत्पन्न ॥ यशोदागर्भीं येऊन ॥ तेव्हा मी नाश करीन ॥ विंध्यवासिनी होवोनी ॥४९॥
पुन्हां अत्यंत घोर ॥ रूपें करूनि पृथ्वीवर ॥ अवतार धरुन मारीन थोर ॥ महाअसुर विप्रचित्ती ॥५०॥
उग्र तयासी भक्षीन ॥ विप्रचित्ती असुरा जाण ॥ दंत होतील आरक्त संपूर्ण ॥ डाळिंब पुष्पासमान ते काळीं ॥५१॥
स्वर्गींचे देव सर्वही ॥ मर्त्यलोकींचे मानव सर्वही ॥ स्तवनी म्हणतील सर्वही ॥ रक्तदंतिका पाही मजलागीं ॥५२॥
पुन्हां शतवर्षेंपर्यंत ॥ पर्जन्य जाईल उदकही ते ॥ पृथ्वीवरी मुनी स्तवितील माते ॥ अयोनी तेथें जन्मेन मी ॥५३॥
तेव्हां शतनेत्रें करून ॥ मुनीशीं मी अवलोकिन ॥ ते वेळीं मनुज संपूर्ण ॥ शताक्षी जाण म्हणतील ॥५४॥
तेव्हां मी सकळ लोक । स्वदेहापासूनि झाले देख ॥ पोषण करीन सुरहो शाकें ॥ वृष्टि होय सम्यक तंववरी ॥५५॥
शाकंभरी म्हणूनि विख्यात ॥ मी होईन पृथ्वीवर ते ॥ तेव्हां मारीन निश्चित ॥ दुर्गनामा दैत्य महाअसुर ॥५६॥
विख्यात दुर्गादेवी म्हणून ॥ मला म्हणतील सकळ जन ॥ पुन्हां भयंकर रूप धरीन ॥ हिमाचळीं जाण निश्चयेसी ॥५७॥
भक्षण करीन राक्षसाचें ॥ रक्षण करीन मुनिगणांचें ॥ तेव्हां समुदाय मुनींचें ॥ स्तवितील साच होऊनि नम्र ॥५८॥
भीमादेवी म्हणून विख्यात ॥ नाम माझें होईल सत्य ॥ तेव्हां अरुणनामा त्रैलोक्यांत ॥ मोठा आकांत करील तो ॥५९॥
भ्रामरीरूप मी ते काळीं ॥ सहा पायांची होईन अळी ॥ त्रैलोक्यहितार्थ ते वेळीं ॥ महाअसुरा होळी करीन मी ॥६०॥
भ्रामरी ऐसें लोक मला ॥ स्तवन करितील ते वेळां ॥ ऐसी बाधा लोक सकळा ॥ दैत्याची जे जे वेळां होईल ॥६१॥
ते ते काळीं अवतार धरून ॥ करीन शत्रूचा नाश संपूर्ण ॥ सुमेधा ऋषी सुरथराजा म्हणे ॥ पुढील कथन अवधारी ॥६२॥
सुमेधा ऋषी राजा सुरथा ॥ संवाद झाला तेचि कथा ॥ भागोरी झाला ऐकतां ॥ मार्कंडेय सांगतां झाला त्यासी ॥६३॥
नित्यानंद यती आपण ॥ श्रोत्या करी विनवण ॥ पुढील कथा करा श्रवण ॥ एकाग्र मन करूनी ॥६४॥
इति श्रीदेवीविजय ग्रंथ ॥ मार्कंडेयपुराणसंमत ॥ एकादशाध्याय झाला समाप्त ॥ असो जगन्न्माते अर्पण हा ॥६५॥
इतिश्रीदेवीविजय ग्रंथ एकादशाध्याय समाप्त ॥श्री॥श्री॥श्री॥
॥ श्रीदेवीविजय एकादशाध्याय समाप्त ॥