Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय दुसरा

॥ श्रीगणेशाय नमः ॥
श्रीगणेशशारदा सद्गुरु ॥ ग्रंथारंभीं नमस्कारूं ॥ नमूनि वाल्मीकादि कविश्वरू ॥ मध्यमचरित्र वाखाणिन ॥१॥
ऋषी म्हणे असुरयुद्ध दारुण ॥ झालें पूर्वीं शतवर्षें संपूर्ण ॥ महिषासुर - इंद्र दोघेजण ॥ युद्ध महान तेही केलें ॥२॥
असुरसेना ते महाबळी ॥ देवसेना असुरें जिंकिली ॥ सकळ देवा जिंकूनि बळी ॥ इंद्र झाला ते काळी महिषासुर ॥३॥
देवते सर्वही मिळून ॥ ब्रह्मयाई पुढें करून ॥ जेथें गरुडध्वज नारायण ॥ तयासी शरण गेले देव ॥४॥
महिषासुराचे चेष्टित ॥ जैसा झाला वृत्तांत ॥ देवें सांगितला यथावत ॥ पराभव विस्तृत देवाचा ॥५॥
चंद्र सूर्य अग्नी इंद्र यांचा ॥ आणीकही यमवरुणाचा ॥ अन्य अधिकारी जे तयाचा ॥ आपणचि त्याचा अधिकार करी ॥६॥
स्वर्गीं देवगणा नाही थार ॥ येऊनि सर्व पृथ्वीवर ॥ संचार करिती जैसे पामर ॥ महिषासुरें दवडिले जे ॥७॥
हा सर्वही सांगितला वृत्तांत ॥ महिषासुराचा यथावत ॥ शरणागता रक्षी आम्हांप्रत ॥ वध त्याचा मनांत योजिजे ॥८॥
ऐसें ऐकूनि देव वचन ॥ दयाळू स्वामी मधुसूदन ॥ त्या अति कोप आला दारुण ॥ भृकुटी वदन भयानक ॥९॥
अत्यंत कोपतांच चक्रधर ॥ त्याच्या मुखातूनि अपार ॥ तेज तें निघाले भयंकर ॥ ब्रह्मरुद्रतेजही तें निघालें ॥१०॥
इंद्र आदिकरूनि देवगण ॥ या सर्वांच्याही देहापासून ॥ अद्भुत तेज निघालें जाण ॥ तें तेज संपूर्ण येकवटलें ॥११॥
अत्यंत तेजाचा कल्लोळ ॥ पर्वती जैसा दावानळ ॥ कौतुक पाहती देव सकळ ॥ दिगंत रातज्वाळ व्यापिल्या ॥१२॥
ज्याते ज्यासि नाही तुळणं ॥ सर्व देवदेहींचें संपूर्ण ॥ येकवटूनि झाली स्त्री उत्पन्न ॥ स्वतेजें जाण त्रैलोक्य व्यापिलें ॥१३॥
शंभूतेजापासूनि तें देख ॥ तेणें घडलें तियेचें मुख ॥ यमतेजें केश ते अनेक ॥ विष्णुतेजें देख बाहू झाले ॥१४॥
चंद्राचें तेज तें स्तनद्वय ॥ मध्य भागीं इंद्रतेज पाहे ॥ वरुणतेजें जांघेमांड्या हे ॥ पृथ्वीतेजें तें नितंब ॥१५॥
ब्रह्मतेजें पादद्वय जाण ॥ सूर्यतेज पादांगुळी संपूर्ण ॥ करांगुळ्या वसूच्या तेजानें ॥ नासिक जाण कुबेरतेजें ॥१६॥
तिच्या दंतपंक्तीची उत्पत्ती ॥ प्रजापती तेजें शोभती ॥ पावकतेजें अत्यंत दीप्ती ॥ त्रिनयन पंक्ती तेजःपुंज ॥१७॥
भृकुटी संधीचें तेज जाण ॥ अग्नीचें तें देदीप्यमान ॥ आणीकही जे जे देवगण ॥ कल्याणरूपी तेज तें झालें ॥१८॥
आणीकही समस्त देवाचे ॥ तेजोराशी रूप तियेचें ॥ तीशीं पाहून मन देवाचें ॥ आनंदले महिषादितजे ॥१९॥
त्यानंतरें सकळ देवांनीं ॥ स्वशस्त्रें दिली तिजलागुनी ॥ शूलांतून शूल काढुनी ॥ पिनाकपाणी तिजला अर्पीं ॥२०॥
कृष्ण आपुलें आयुध जाण ॥ चक्रापासून चक्र काढुन ॥ देवीसी करी अर्पण ॥ देदीप्यमान तिखट धार ॥२१॥
वरुण तिजला शंख देत ॥ हुताशन तो शक्ति अर्पित ॥ वायू तियेसी चाप देत ॥ भातेही देत बाण पूर्ण ॥२२॥
वज्रांतून वज्र काढून ॥ देत झाला सहस्रनयन ॥ आणीकही घंटाप्रदान ॥ ऐरावताचे जाण करीतसे ॥२३॥
यमकाळ दंडातें देत ॥ समुद्रपाश तियेसी अर्पित ॥ प्रजापती अक्षमाळ देत ॥ ब्रह्मा अर्पित कमंडलू ॥२४॥
देहाचे रोम जे कां समस्त ॥ गभस्ती रश्मी प्रदान करित ॥ खङ्गही तो काळ देत ॥ ढलसहीत तियेसीं ॥२५॥
देतां झाला तो क्षीरसमुद्र ॥ हार आणि दिव्यांबर ॥ अनघ्य चूडामणी रत्न थोर ॥ स्वर्णमय कुंडलेंही अर्पिलीं ॥२६॥
अर्धचंद्र अतिशुभ्र जाण ॥ केयूरादिजें बाहूभूषण ॥ नूपुर मंगळसूत्र प्रदान ॥ तेही करी अर्पण अंबिकेसी ॥२७॥
समजा त्या करांगुळीसी ॥ रत्नमुद्रिका घाली तियेसी ॥ विश्वकर्मा तो फरश देवीसी ॥ तिखटधारेशी करी अर्पण ॥२८॥
निर्मूनियां कवच अभेद्य ॥ आणिक शस्त्रअस्त्रेंही विविध ॥ पंकजमाळही अर्पिली शुद्ध ॥ अपादलंबिनी आम्लान ॥२९॥
समुद्र देता झाला देवीसी ॥ सुवर्णवर्ण पंकजासी ॥ हिमवंत सिंहवाहिनी ॥ विविध रत्नांही अर्पिता झाला ॥३०॥
पानपात्रसुरा ऐसें ॥ कुबेर तो करी समर्पण ॥ शेष देता झाला नागरत्न ॥ शोभार्थ जाण जगदंबेसी ॥३१॥
पृथ्वीही देत महाथोर ॥ गळा घालावया नागहार ॥ भूषणें आयुधें तें अपार ॥ आणीकही सुरवरे अर्पिले ॥३२॥
देवी करितसे ते आपण ॥ अति कठोर शब्दें करून ॥ वारंवार अट्टहास्यें जाण ॥ अंबर संपूर्ण दुमदुमिलें ॥३३॥
पडिसादांहूनी तो अत्यंत ॥ प्रतिशब्द झाला अत्युद्भुत ॥ हडबडिलें सर्व भूतजात ॥ समुद्र उचंबळत तयेवेळीं ॥३४॥
कसुधा कांपे थरथरा ॥ कंप सुटला समस्त गिरिवरा ॥ जयजयकारें देवगिरा ॥ गर्जे सिंहवाहिनी अंबेसी ॥३५॥
सर्व मुनिगण आनंदले ॥ भक्ती करूनि नम्र झाले ॥ शब्दसरिसे भय उपजलें ॥ देवशत्रू भ्याले असुर ते ॥३६॥
सकळ सेना सिद्ध करून ॥ निघाले ते आयुधें घेऊन ॥ आहा हें काय आहे म्हणें ॥ क्रोधें दारुण महिषासुर ॥३७॥
शब्दासरिसा महिषासुर ॥ संगें घेऊनि सेना अपार ॥ तेव्हां देवीसी पाहे समोर ॥ तेज अपार फांकलें लोकीं ॥३८॥
चरणें आक्रमिलें भूमीई ॥ किरीट लिहीतसे अंबराशीं ॥ सप्तपाताळ पावले क्षोभासी ॥ धनुष्याचा टणत्कार ऐकतां ॥३९॥
सहस्रभुजा दिशा ते जाण ॥ आक्रमोनि राहिल्या संपूर्ण ॥ मग युद्ध प्रवर्तले दारुण ॥ असुर कात्यायनी दोघांचें ॥४०॥
शस्त्रअस्त्रें सुटलीं बहुत ॥ तेणें दशदिशा लखलखीत ॥ महिषासुराच्या सेनेंत ॥ चिक्षुरनामा दैत्य महाबळी ॥४१॥
युद्ध करिती चामरादिक ॥ चतुरंगसेना घेउनी देख ॥ रथायुतें साहसी प्रमुख ॥ उदग्र देख युद्ध करी ॥४२॥
आयुताचे जे कां सहस्र ॥ महाहनू योद्धा थोर ॥ पंचाशतनियुत दळभार ॥ अशिलोमा असुर झुंजे रणी ॥४३॥
अयुताचे जे का सहाशत ॥ बाष्कळ घेऊनि तो युद्ध करीत ॥ गजवाजीसंगें असंख्यांत ॥ घेऊनि रणांत भयंकर ॥४४॥
कोटिश हा रथ घेऊन ॥ युद्धीं करी रणकंदन ॥ अयुताचे पंचाशत जाण ॥ रथ घेऊनी बिडाल तो ॥४५॥
युद्ध करी तो अपार ॥ संगें घेऊनि दळभार ॥ आणीक सहस्रावधी वीर ॥ गजवाजी रथ असुर घेऊनि ॥४६॥
देवीसी युद्ध दारुण ॥ येकेच काळी असुरगण ॥ कोटिकोटि सहस्रसंख्या जाण ॥ रथावारण असंख्य ॥४७॥
अश्व संगें अपार ॥ युद्धीं तोही महिषासुर ॥ भिंडिपाल तोमर ॥ मुसळ मुद्गल शक्ति आदि ॥४८॥
येकेच काळीं युद्धीं देवीस ॥ खङ्गपट्टा आणि फरश ॥ चंडिकेश्वरी टाकि पाश ॥ कोण्ही शक्तीसही टाकिती ॥४९॥
देवीवरी खङ्गप्रहार जाण ॥ करूं लागले अतिदारुण ॥ मग देवीही आपण ॥ शस्त्रास्त्रें संपूर्ण चंडिका ते ॥५०॥
छेद करूनि अनायासें ॥ स्वशस्त्रास्त्र वृष्टी करीतसे ॥ देवऋषीही चंडिकेस ॥ करिती स्तवनास वारंवार ॥५१॥
टाकी असुराच्या देहावरी ॥ अस्त्रशस्त्रें परमेश्वरी ॥ देवीवाहन तो केसरी ॥ केस पिंजारी वेगें सकोप ॥५२॥
करी असुरसेनेंत संचार ॥ जेवी शुष्कवनी वैश्वानर ॥ निःश्वास टाकी महाथोर ॥ रणी युद्ध अपार करी अंबिका ॥५३॥
असंख्यात प्रथमगण ॥ येकेच समयीं संपूर्ण ॥ फरश पट्टा खङ्ग घेऊन ॥ हाणिती गोफण महायुद्धीं ॥५४॥
राक्षसाचा नाश करिती ॥ आश्रयूनि देवीची शक्ति ॥ नाना वाद्यांचा गजर करिती ॥ शंखपटह वाजवीती आदिकरून ॥५५॥
मृदंग वाजती घणघण ॥ महाउत्साहें युद्ध दारुण ॥ त्या काळीं देवी त्रिशूल जाण ॥ गदाशक्ती तीक्ष्ण वृष्टी करी ॥५६॥
खङ्गदि आयुधीं शताचे शत ॥ राक्षस मारिले असंख्यात ॥ घंटानादें करूनि मोहित ॥ पाडिले रणांत कितियेक ॥५७॥
असुर भूमीवरी पाशें ॥ बांधूनि वोढी आणिकास ॥ रणीं द्विखंड करी कोणास ॥ सतेज खङ्ग घेऊनी ॥५८॥
गदेचा घात वाजतां शिरीं ॥ पटाटा पडती भूमीवरी ॥ कोणी मुखें वमूनि रुधिरीं ॥ मुसळघातें वरी निमाले ॥५९॥
कोणी पडले त्रिशूलघातें ॥ हृदयीं भेदूनि कितियेक ते ॥ शरवृष्टी करूनि असंख्यात ॥ असुरा निःपात करी रणीं ॥६०॥
सेवकजनाचा गतप्राण ॥ देवीच्या आघातें अतिदारुण ॥ कोणाचे गेले बाहू तुटून ॥ माना छेदून पाडिले अनेक ॥६१॥
कितियेकांचीं तुटली शिरें ॥ बहुतांचीं तोडिलीं शरीरें ॥ तुटोनि पडले उदंड फरे ॥ असुर अपार पडले रणीं ॥६२॥
कोणा येका मधेंचि जाण ॥ देवीनें टाकिलें चिरून ॥ कोण्हीं शिरें तुटल्याही जाण ॥ तैसेंच रणीं उठती ते ॥६३॥
कबंध करिती देवीसीं युद्ध ॥ हातीं घेऊनि परमा युद्ध ॥ नाचती कितियेक कबंध ॥ युद्धीं वाद्यलया आश्रयूनी ॥६४॥
कबंध ते तुटकें मस्तक ॥ खङ्गशक्ती वृष्टि करिती अनेक ॥ उभें राहे म्हणती देख ॥ देवी अन्यत्र अणीमहासुरासीं ॥६५॥
अश्व गजरथ पृथ्वीवर ॥ असुरही पाडिले दुर्धर ॥ तेथें गम्य नव्हें अपार ॥ ऐसें जुझ भयंकर झालें ॥६६॥
रक्तवोघाची नदी पूर्ण ॥ वाहूं लागली दुथडी भरून ॥ असुरसेना मधें जाण ॥ रथ अश्वगज संपूर्ण वाहती त्यांत ॥६७॥
येक्या क्षणमात्रें महासैन्य ॥ असुराचें त्या अंबिकेन ॥ नाश करी जैसा हुताशन ॥ पर्वती तृणकाष्ट संपूर्ण ज्यापरी ॥६८॥
सिंह तो अत्यंत दीर्घश्वर ॥ आरोळी मारी मोठी थोर ॥ राक्षसशरीराचें अपार ॥ रुधिर हुडकीत ते काळीं ॥६९॥
देवीचे गण तेही तेथ ॥ असुरासीं युद्ध केलें बहुत ॥ देव संतोषले अत्यंत ॥ पुष्पवृष्टी बहुत करीते झाले ॥७०॥
ऐसी कथा सुमेधा ऋषी ॥ सांगतां झाला सुरथ राजासी ॥ मार्कंडेय भागोरी ऋषीसीं ॥ कथा त्यासी ऐक म्हणे ॥७१॥
श्रोत्यासि म्हणे नित्यानंद ॥ पुढें ऐका महिषासुरवध ॥ माझी वाणी अबद्धसुबद्ध ॥ न ठेवितां बाध क्षमा करा ॥७२॥
इति श्रीदेवीविजय ग्रंथ ॥ मार्कंडेयपुराण संमत ॥ भक्त भावीक परिसोत ॥ द्वितीयाध्याय सुरस हा ॥७३॥
इतिश्री देवीविजय ग्रंथ द्वितीयाध्याय समाप्तः ॥श्री॥        ॥         ॥
॥ इति श्रीदेवीविजय द्वितीयाध्याय समाप्त ॥