ध्यानाची धारणा उन्मनीचे ब...
ध्यानाची धारणा उन्मनीचे बीज । लक्षितां सहज नये हातां ॥ १ ॥
तें हें कृष्णनाम सखे नंदघरी । गौळियां माझारी ब्रह्म खेळे ॥ २ ॥
न दिसे पाहतां शेषादिका गति । यशोदे श्रीपति बाळ झाला ॥ ३ ॥
गुंतलें मायाजाळीं अनंत रचनें । तो चतुरानना खुणें न संपडे ॥ ४ ॥
नकळे हा निर्धारू तो देवकी वो देवी । शेखीं तो अनुभवीं भुलविला ॥ ५ ॥
निवृत्ति रचना कृष्णनामें सार । नंदाचें बिढार ब्रह्म झालें ॥ ६ ॥