प्रकरण ४
संध्याकाळ होत आली होती. अमेयचा अजुन पत्ता नव्हता. दुपारची भयानक घटना शारदाच्या डोक्यातून जात नव्हती. तिने स्वतःला कामात गुंतवून घ्यायच ठरवल. अचानक तिला आठवल की तिने दुसरा तिसरा मजला अजुन पाहीलाच नव्हता. ती दुसर्या मजल्यावर आली. त्या मजल्यावर तीन बेडरूम्स होत्या. त्याच निरीक्षण करत करत ती तिसर्या मजल्यावर आली. इथे आल्या आल्या तिला अस्वस्थ वाटायला लागल.ह्या मजल्यावर एकच दरवाजा होता. त्याला एक भलमोठ कुलूप ठोकलेल होत. त्या कुलूपाला वेगवेगळे रंगीबेरंगी धागेदोरे बांधलेले होते. शारदा नकळतच त्या बंद दरवाज्याकडे आकर्षिली गेली. हळू हळू पावले टाकीत ती दाराजवळ आली. तिने दाराला हात लावला. अचानक पलीकडून ते बंद दार जोरजोरात ठोकल जाऊ लागल! त्या बंद दाराच्या मागुन कोणीतरी ते दार ठोकत होत. या विचित्र घटनेने शारदा इतकी घाबरली की तिने एक भयानक किंचाळी ठोकली.
शारदाची किंचाळी ऐकून बाहेर काम करत असलेले रामूकाका धावतच घरात आले. त्यांना जिन्यावरून शारदा घाबरलेल्या अवस्थेत खाली येतांना दिसली. "काय झाल बाईसाहेब? अश्या का ओरडल्या तुम्ही." त्यांनी शारदाच्या जवळ जात विचारल. "रामू......काका.....ति....तिथे.....वरती." ती इतकी घाबरली होती की तिला धड बोलता सुध्दा येत नव्हत. तिच सर्वांग थरथरत होत.रामूकाकांनी तिला सोफ्यावर बसवल आणी ग्लासभर थंडगार पाणी आणून दिल. तिने पाणी गटागटा घशात ओतल. काही वेळाने ती शांत झाल्या नंतर रामूकाकांनी वरील प्रश्न पुन्हा विचारला. शारदाने स्वतःला सावरत वरील हकीकत त्यांना सांगितली. ते ऐकल्यावर आता घाबरण्याची पाळी रामूकाकांची होती. "म्हणजे आता हे सर्व पुन्हा सुरु होणार आहे." रामूकाकांनी भयावह चेहरा करत म्हटल. "काय सुरू होणार आहे रामुकाका?" शारदाने विचारल. "त्या वाईट शक्तीला कळाल आहे की तुम्ही इथे राहायला आला आहात म्हणून. आता म्रुत्युच तांडव सुरू होईल. तो दरवाजा ठोठावण हा त्याचाच एक संकेत होता. ती शक्ती सुटण्यासाठी धडपडते आहे. बाईसाहेब चुकुनही तो दरवाजा उघडु नका. नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल आणी जमल तर हा बंगला कायमचा सोडून द्या." अस बोलून आणी शारदाला संभ्रमात टाकुन रामूकाका बाहेर निघून गेले.
कुठेतरी दूर एका गुहेमध्ये तपश्चर्येत लीन असलेल्या साधूने खाडकन डोळे उघडले.कदाचित येणार्या घोर संकटाची चाहूल त्याला लागली असावी.
क्रमशः