Android app on Google Play

 

प्रकरण २

 

अमेयने आपल्या कडील चाबीने कुलुप उघडून दरवाजा उघडला. दरवाजा उघडताक्षणी एक थंड वाऱ्याची झुळूक त्या तिघांच्याही अंगावर शहारे आणून गेली. अमेय, शारदा आणि किमया यांनी घरात प्रवेश केला. "येssss आपल मोठ्ठ घर" अस म्हणून किमया आनंदाने बागडत घरभर फिरू लागली. सामान अगोदरच घरात शिफ्ट करण्यात आला होता. फक्त थोडी धूळ साचल्याने सफाईची गरज होती. शारदाने सर्वात आधी आपला मोर्चा किचन कडे वळवला. अमेय हॉलमध्ये उभ राहुन घराच निरीक्षण करत होता. अचानक त्याच लक्ष मागे दरवाज्या बाहेर ब्याग घेऊन उभ्या असलेल्या बंंगल्याच्या केअरटेकर कडे गेले. "रामूकाका, काय झाल, असे बाहेर का उभे राहीलात, आत या." अमेय म्हणाला. रामूकाका हळूहळू आत आले. त्यांच्या हातातल्या ब्यागा त्यांनी बाजुला ठेवल्या. आणि म्हणाले, "साहेब हे घर तुम्ही घ्यायला नको होत." 

"का?" अमेयने चमकुन विचारल.

रामूकाकाः साहेब, या घरात काहीतरी आहे. 

अमेयः हो, बरोबर या घरात खूप धूळ आहे. साफसफाई करावी लागेल. 

रामूकाकाः ते नाही साहेब. या घरात काहीतरी अघोरी शक्ती आहे.

अमेयः काय. अघोरी शक्ती. रामूकाका तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला तरी कळतय का?

रामूकाकाः साहेब, तुमच्या इथे येण्याआधी अनेक विचित्र घटना घडल्या आहेत. 

अमेयः कसल्या घटना ?

रामूकाकाः काही घटनांच स्पष्टीकरण देता येत नाही साहेब. फक्त अनुभव घेता येतो.

अमेय काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलला. "हा बोल जयंता" 

जयंताः अम्या, कुठेस तू ?

अमेयः नवीन घरी. का ?

जयंताः अबे यार, आपल्या हिटलर बॉसने आपल्याला ऑफिसला बोलावलय. काहीतरी महत्त्वाच काम आहे म्हणे.

अमेयः अरे पण आज तर रविवार आहे ना

जयंताः ते माहीतये. पण बॉसने बोलावलय म्हणजे जाव लागेल.

अमेयः बर ठिक आहे येतो मी.

अस म्हणून त्याने फोन ठेवला. अचानक त्यांच्या कानावर शारदाची किंचाळी ऐकू आली. 

                                                                क्रमशः