वलय - प्रकरण शेवटचे (५२)
"मुंबईतच काय, मी म्हणतो पूर्ण आशिया खंडात कुठेही अशा प्रकारचे लेखकांसाठी असलेले थीम पार्क नसावे!" श्री. वामनराव विभुते म्हणाले.
"खरे आहे तुम्ही म्हणता ते! मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या थीम पार्क मध्ये बसून महिन्याची फक्त माफक नाममात्र फी भरून कुणीही नवोदित लेखक अगदी शांततेत लिखाण करू शकतो. काहींना लिहिण्यासाठी लॅपटॉप सुध्दा मोफत उपलब्ध करून दिले जाईल किंवा ज्यांना कागदावर लिहायचे आहे त्यांना वह्या पेन दिले जातील. विशेषत: फिल्म क्षेत्रात लिहिणाऱ्या लेखकांना प्राधान्य दिले जाईल!" राजेश म्हणाला.
"वा! कल्पना आवडली तुमची. काही आणखी मदत लागली तर सांगा मला!" विभुते.
राजेश पुढे म्हणाला, "धन्यवाद सर! शेजारच्या या दोन मजली बिल्डिंगमध्ये मुंबई बाहेरच्या नवोदित लेखकांना माफक पैशांत राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे! वरच्या मजल्यावर एक मोफत लायब्ररी आहे! आणि फक्त लेखकच नाही तर ज्यांना शांततेत वाचन करायचे आहे अशा पुस्तक प्रेमी मंडळींसाठी सुद्धा हे थीम पार्क एक पर्वणी आहे."
त्या थीम पार्क मध्ये छोटेसे तळे, छोटी हॉटेल्स, हिरवेगार गवत, हिरवीगार झाडे, फुलझाडे लावलेली होती. तसेच काही ठिकाणी झाडाऐवजी खोडाच्या आकाराएवढ्या उभ्या पेन्सिल्स आणि त्यांच्या अणीच्या टोकांवर फांद्या उगवून पसरलेल्या होत्या पण फांद्यांवर पाने फळे यांच्या ऐवजी कॉम्प्युटरच्या कीबोर्डच्या किज (कीबोर्डची बटणे) जोडलेली होती आणि पारंब्यांच्या ऐवजी फिल्म स्ट्रीपस लटकावलेली होती. ही अशी पेन्सिल झाडे एकत्र ओळीने लावली होती. झाडांच्या बाजूला अनेक खोडरबर ओळीने पेरून त्यांना जाळीने बांधून त्याचे कुंपण केले होते. तसेच रस्त्याने अनेक बाके ठेवलेली होती. खाली हिरवळीवर बसण्याची व्यवस्था होती.
हे बघून विभुते म्हणाले, "राजेश, तुमच्या कल्पनाशक्तीला मनापासून दाद द्यावीशी वाटते!"
"धन्यवाद!" राजेश म्हणाला.
अचानक तेथे अंधार झाल्याचे राजेशला दिसले. विभुते कुठे दिसत नव्हते. आता त्या थीम पार्कमध्ये विभुतेच काय तर इतर दुसरे कुणी चिटपाखरूसुध्दा नव्हते! पक्ष्यांची किलबिल अचानक थांबली. पानांची सळसळ बंद झाली. कुठे गेले सगळे? असा विचार करून राजेश त्याच्या जवळ असलेल्या मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात पुढे पुढे सरकू लागला. वर आकाशात चंद्र सुध्दा नव्हता!
दूरच्या एका पेन्सिल झाडाजवळ ठक ठक असा आवाज येत होता. कुणीतरी पाठमोरा माणूस पेंसिलीच्या झाडावर कुऱ्हाडीने घाव घालत होता. राजेशला ते सहन झाले नाही. तो टॉर्चच्या उजेडात त्या माणसाजवळ जाऊ लागला. खाली कीबोर्डचे बटणं इकडे तिकडे विखुरलेले होते.
"ए! कोण आहेस तू?" राजेशने त्याच्या जवळ जात दरडावून विचारले.
तो अद्याप पाठमोराच होता. कुऱ्हाडीचा घाव घालणे त्याने चालूच ठेवले. त्या घावांमुळे पटापट कीबोर्डचे बटन खाली पडत होते. त्या फिल्म स्ट्रीप खाली कोसळत होत्या.
"मी तुला विचारतोय माणसा! कोण आहेस तू? काय करतोयस येथे? कुणाच्या परवानगीने अलास? ही झाडे का तोडतोयस?" राजेश एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
तो माणूस घाव घालायचे थांबवून हसायला लागला. अजून पाठमोरा होता तो!
"मी कोण? हा हा हा हा! मी आहे विमा! विचारांचा मारेकरी!" अजूनही तो पाठमोरा होता.
"विचारांचा मारेकरी? म्हणजे नेमका कोण आहेस तू?"
"एखादा विचार आवडला नाही तर मी त्या विचारांना नष्ट करतो आणि ते विचार निर्माण करणाऱ्या लोकांना सुध्दा!" असे म्हणून त्याने आपली मान 360 डिग्री कोनातून स्वतःच्या पाठीमागे म्हणजे समोर राजेशकडे फिरवली आणि जबरदस्त घाम येऊन राजेश स्वप्नातून जागा झाला..
"बापरे! काय भयंकर स्वप्न!" असे म्हणून बघतो तो काय पूर्ण बंगल्यातील लाईट गेलेले होते. त्याने मोबाईलची बॅटरी लावली आणि तो पाण्याचा ग्लास शोधू लागला. रात्रीचे दोन वाजले होते.
पाण्याचा ग्लास शोधत असताना त्याला त्याचा लॅपटॉप चालू असलेला दिसला पण तो टेबलापासून थोड्या वर उंचीवर होता. पाणी प्यायचे सोडून तो टेबलजवळ गेला तर त्याला एक काळा कोट घातलेला माणूस दिसला ज्याचा चेहरा कोटाच्या टोपीमुळे डोळ्यापर्यंत झाकलेला होता! आणि अंधार सुध्दा असल्याने चेहरा नीट दिसत नव्हता.
त्या माणसाने राजेशचा लॅपटॉप एका हातात धरला होता आणि दुसऱ्या हातात लाकडे कापायची करवत होती. लॅपटॉपला चार्जिंगची वायर तशीच जोडलेली होती.
स्वप्न आठवून राजेशला अजून जास्त भीती वाटली.
"क क कोण आहेस तू?" राजेशने गर्भगळीत होऊन विचारले आणि त्या माणसाकडे जाऊ लागला.
"मी कोण? हा हा हा हा!" असे म्हणून त्याने राजेशच्या लॅपटॉपला हवेत जोराने छताकडे भिरकावले. जोराच्या झटक्याने प्लग सॉकेट मधून निघाला आणि लॅपटॉप छताला वेगाने आपटून फुटला आणि सीलिंग फॅन वर जाऊन अर्धा उलटा हवेत लटकला. वायर एका पात्यात आणि लॅपटॉप एका पात्यामध्ये अडकून हवेत लटकू लागला.
अचानक झालेल्या या विचित्र घटनेने राजेश घाबरला. त्या माणसाने वेगाने राजेशच्या हाताला झटका दिला आणि राजेशच्या हातातला मोबाईल खाली पडला. मग बुटाने तो मोबाईल त्याने तोडला आणि तो माणूस आता ती इलेक्ट्रिक करवत (पण लाईट नसल्याने बंद असलेली) दोन्ही हातात घेऊन राजेशकडे येऊ लागला. राजेश मागे सरकला आणि त्याचा धक्का लागून लटकणारा लॅपटॉप खाली पडून आणखी फुटला आणि राजेश बेडवर पडला. त्या माणसाने वेगाने बेडवर मुसंडी मारली आणि राजेशचा उजवा हात एका हाताने दाबून धरला आणि त्याच्या हाताची बोटे करवतीने कापायला सुरुवात केली. अंगठा जवळपास अर्धा कापला गेल्याने वेदनेने राजेश ओरडला आणि त्याने त्या माणसाच्या पोटात जोराची लाथ हाणली.
तो माणूस भेलकांडून दूर झाला तोपर्यंत राजेश बेडवरून उठला. राजेशने पाण्याचा काचेचा जग उचलला आणि त्या माणसाच्या डोक्यावर भिरकावला. तो त्याच्या टाळक्यावर आदळला आणि थोडेसे रक्त आले आणि खाली पडून काचेचे तुकडे झाले. त्यामुळे तो बावचळला आणि खवळला.
त्याने खालचा लॅपटॉप उचलला आणि राजेशच्या डोक्यावर नेम धरून फेकला पण राजेश बाजूला झाला आणि लॅपटॉप खाली पडला. पण राजेशच्या पायात त्या फुटलेल्या काचेचे तुकडे गेले आणि तो विव्हळू लागला. मात्र त्या माणसाच्या पायात बूट असल्याने त्या काचेच्या तुकड्यांवरून तो पुढे राजेश कडे येऊ लागला.
त्याने राजेशचा उजवा हात एका हाताने पुन्हा दाबून धरला आणि त्याच्या हाताची बोटे करवतीने कापायला सुरुवात केली. अंगठ्या जवळची बोटे कापली जाऊ लागली. राजेश वेदनेने ओरडू लागला आणि डाव्या हाताने राजेशने त्याच्या गळ्याला नख लावून कुरताडले. त्या माणसाच्या नरड्यातून रक्त वाहू लागले तसा तो बिथरला आणि करवत फेकून देऊन त्याने राजेशच्या कानाफडात दोन थपडा लगावल्या आणि राजेशला तो एका पाठोपाठ एक तोंडावर बुक्के मारत राहिला आणि म्हणाला, "साल्या, तुझी दहा पैकी दहा बोटे तोडल्याशिवाय मी राहणार नाही!"
मग दोघेही एकमेकांना भिडले. जवळपास कुस्ती खेळतात तसे ते एकमेकांना उचलून हवेत फेकू लागले. तो माणूस करवत पडली होती तिथे जायला निघाला तर जमिनीवर पडलेल्या राजेशने दुखणाऱ्या हातानेच त्याचे पाय जोराने ओढले आणि तो माणूस तोंडावर आपटला. मग तितक्याच त्वेषाने तो उठला आणि त्याने राजेशच्या छातीवर बुटाची लाथ मारली आणि पुन्हा पुन्हा मारू लागला. राजेशने त्याला जोराने ढकलले. तो पडला!!
बराच वेळ त्या अंधाऱ्या एकाकी बंगल्यात हे द्वंद्व सुरू होते. मग काही वेळाने त्या बंगल्यातून एक जोराची किंकाळी ऐकू आली...!!
(समाप्त)