वलय - प्रकरण ४२
सूरजशी भांडण होऊन तो अलग झाल्यानंतर आणि त्यांची हक्काची सिरीयल मधली कलाकार रागिणी जी त्यांची सून होऊ शकणार होती, तिने आत्महत्या केल्यानंतर डी. पी. सिंग काही दिवस अस्वस्थ होते.
रागिणी गेल्यानंतर जणू काही त्यांच्या सिरीयल मधली जान निघून गेली होती. लोक सिंग फॅमिलीकडे संशयाने बघायला लागले होते. दुसऱ्या कलाकारांना घेऊन ती सिरीयल त्यांनी चालवली पण त्या सिरीयलची टीआरपी रेटिंग दिवसेंदिवस घसरत चालली होती.
ज्या चॅनेलवर ती सिरीयल प्रसारित होत होती त्यांनी एक महिन्यांत सिरीयलची टीआरपी वाढवण्याची मुदत दिली अन्यथा ती सिरीयल "ऑफ एयर" करण्याची वॉर्निंग दिली, कारण त्या सिरीयलचा फायनान्सर चिडला होता आणि जाहिराती मिळणे कमी झाले होते.
हॉरर व्यतिरिक्त अन्य विषय निवडून नवीन प्रकारची सिरीयल बनवणे सोपे काम नव्हते, कारण त्यासाठी पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार होती. विविध माध्यमांनी ही बातमी छापली होती आणि टीव्हीवर सुद्धा दाखवली होती:
"प्रसिद्ध हॉरर मालिकेचे सर्वेसर्वा सिंग संकटात. मालिका बंद पडण्याच्या मार्गावर! टीव्ही चनेलने दिली नोटीस!"
एके दिवशी घरी चिंताग्रस्त डी. पी. सिंग सोफ्यावर डोक्याला हात लावून बसले होते तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली,
"दिनकर, एवढे टेन्शन घेऊ नका. तुमच्याप्रमाणेच मलाही दुःख वाटते आहे. सूरज घर सोडून गेला. रागिणी जग सोडून गेली. आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण शांत मनाने विचार केल्यास काहीतरी मार्ग निघेलच!"
"माझं काही डोकच चालेनासं झालंय! सूरजचे मला काही खरे दिसत नाही. त्याने आता एक नवी गर्लफ्रेंड ब्राझीलहून आणली आहे म्हणे! तिच्यासोबत आता लिव्हिन मध्ये राहणार आहे! आणि पठ्ठा भरपूर कामावतोय आणि आता चित्रपटनिर्मितीत उतरणार आहे! मला विचारले असते तर मीपण कोप्रोड्यूस केला असता त्याचा पिक्चर! पण एनिवे, तो रागिणीला नीट हँडल करू शकला नाही! आणि आपल्याशी भांडून गेला तो! कोणत्या मार्गाने जातोय काही कळत नाही! त्याचा मार्ग वेगळा आहे! जाऊदे!"
तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता.
"हॅलो? कोण?"
पलीकडून एका स्त्रीचा सुंदर आवाज आला, "तुम्ही सिरीयल बंद करू नका! तशी पाळी तुमच्यावर येणार नाही."
"क क कोण आपण?", आवाज थोडा ओळखीचा वाटत होता, पण नक्की ओळखू येत नव्हता.
"उद्या तुमच्या ऑफिसमध्ये मी येते, तेथेच तुम्हाला माझी ओळख होईल आणि तुमची चिंता पण नाहीशी करते!"
"हॅलो, हॅलो, कोण? तुमचं नाव तर सांगा आधी?"
"उद्या सकाळी दहा वाजता! शार्प! बाय!" असे म्हणून फोन कट् झाला.
"कुणीतरी लेडीज आहे. म्हणतेय की आपली सिरीयल बंद करायची पाळी येणार नाही! उद्या भेटायला बोलावलंय!"
"जाऊन पाहा! बघू काहीतरी सोल्युशन असेल तिच्याजवळ! चान्स घ्यायला काय हरकत आहे? नाहीतरी आपल्याकडे काय ऑप्शन आहे?"
दहा वाजता सिंग आणि त्यांची पत्नी (जी सिंग यांच्या प्रोडक्शन हाऊसचे काही व्यवहार सांभाळायची) दोघेही ऑफिसमध्ये वाट बघत बसले. दरवाजा टक टक करून अभिनेत्री रिताशा आत आली तसे सिंग पती पत्नी आश्चर्याने उभे राहिले आणि शेक हँड करून तिला बसायला सांगितले. मीडियाने ओळखू नये म्हणून ती गॉगल घालून थोड्या वेगळ्या गेटअप मध्ये आणि भाड्याची कॅब करून आली होती.
गॉगल काढून टेबलावर ठेवत ती म्हणाली,
"सिंग साहेब! ही एंटरटेनमेंट इंडस्ट्री खूप वाईट आहे असे नाही! एकदा का तुम्ही मेहनत करून जम बसवला की ती आपल्याला भरभरून देते! सगळं देते! मान, सम्मान, प्रसिद्धी, पैसा, घर, सोशल लाईफ! पण जर का आपल्याला आपले "वलय" अनेक वर्षे टिकवता आले नाही तर मात्र आपली हालत ‘ना घर का ना घाट का’ अशी होते!", रिताशा पाणी प्याली. तिला हे बोलतांना भर एसी मध्ये घाम फुटलेला दिसत होता.
"हो! मान्य आहे! रिताशाजी! तेच तर घडतेय माझ्यासोबत आता!", हताश होऊन सिंग म्हणाले.
रिताशा हसली आणि म्हणाली, "सिंग साहेब, हे सगळं मी तुमच्याबद्दल नाही तर माझ्याबद्दल बोलते आहे! आणि जास्त खोलात न शिरता मी सांगू इच्छिते की खरं तर मला तुमची गरज आहे! तुम्ही मला वाचवू शकता आणि त्या बदल्यात कदाचित तुमची सिरीयल वाचू शकते असा प्रस्ताव मी घेऊन आलीय! पूर्वी मी छोट्या पडद्याला महत्व देत नव्हते पण आज मला त्याचीच मदत घ्यावी लागतेय!"
"नक्की तुमच्या मनात काय ते सांगा!"
"सांगते! हे बघा! मला तुमच्या हॉरर सिरीयल मध्ये काम करण्याची इच्छा आहे!"
"ओह! पण मला तुमचे मानधन परवडणार नाही रिताशाजी!", असे म्हणून सिंगनी पत्नीकडे बघितले, तिने आश्वासक नजरेने त्यांना हो खुणावले.
"मी मानधनाबद्दल बोलले का काही? याचा अर्थ असा नाही की मी मानधन घेणार नाही! एक बॉलिवूड मधली प्रसिद्ध हॉररपटातील हिरोईन टीव्ही मालिकेत काम करणार म्हटल्याबरोबर तुमच्या मालिकेला नवचैतन्य लाभणार! टीआरपी वाढणार! नंतर तुमचा फायदा झाल्यावर तुम्हाला वाटलं तर मग मला पैसा द्या!"
"नाही नाही! रिताशा जी! तुमचे कारण कोणतेही असो, तुम्ही आमच्या सिरीयल मध्ये काम करणार हीच खूप मोठी गोष्ट झाली, मी तयार आहे! मी तुम्हाला सुरुवातीपासून तेवढेच मानधन देणार जेवढे रागिणीला देत होतो!"
"खरंच! खूप चांगली अभिनेत्री होती ती, सिंग साहेब! माझ्यानंतर तीच बॉलिवूड हॉरर क्वीन व्हायला लायक होती, पण सुभाष भटनी सोनी बनकर नावाच्या सुमार आणि अभिनय न येणाऱ्या नाचऱ्या नटव्या बाईला ती संधी दिली याचे खूप आश्चर्य वाटते! रागिणीबद्दल ऐकून खूप वाईट वाटले! ती तुमच्या मुलाची गर्लफ्रेंड होती नाही का?"
सिंग पती पत्नी थोडे भावूक झाले पण लगेच रिताशा म्हणाली, "आय एम सॉरी! बरं, माझी आणखी एक विनंती आहे! सिरीयल मध्ये काही बदल करण्याचे आणि सिरीयलचे काही कलाकार निवडण्याचे स्वातंत्र्य तुम्ही मला दया!"
"हरकत नाही!"
"मला तातडीने तुमच्याकडून त्याबद्दल मदत हवी आहे!"
"कोणती?"
"मला भूषण ग्रोवर आपल्या मालिकेसाठी माझ्यासोबत हवा आहे! मुख्य पुरुष पात्र!"
"भूषण ग्रोवर? अच्छा! तो BEBQ मधला पार्टीसिपेंट? जो मागील एका पार्टीत सोनी बनकर सोबत दिसून आला होता तो?"
"एक्साक्टली! तोच! कसेही करुन त्याला राजी करा! माझेकडे एक कथा आहे त्यात तोच फक्त फिट बसेल!"
"ठीक आहे! काम होऊन जाईल!" सिंग पती पत्नी राजी होत म्हणाले.
सिंग यांच्या ऑफिसमधून कॅब मधून परत जातांना रिताशा मनातल्या मनात खुश होत म्हणाली, "सोनी बनकर! माझी बॉलिवूडमधली जागा लायकी नसतांना तू पटकवतेस काय? आता जर का तुझा बॉयफ्रेंड नाही गटवला तर नावाची रिताशा नाही मी!"