Android app on Google Play

 

वलय - प्रकरण १६

 

ही घटना राजेश जवळ जवळ विसरून गेला.

आर्ट्सला शिकत असतांना राजेशने सहज म्हणून एक छोटी थरारक आणि रहस्यमय कादंबरी लिहिली: "खेळ हा नशिबाचा!.

त्याचे हस्तलिखित त्याने एका मुंबईच्या नवीनच सुरु झालेल्या दिवाळी अंकाला पाठवले ("कथामंथन").

काही दिवसांनी संपादक विभागाचे पत्र त्याला आले. कथा संपादकाना आवडली आहे. पण ती थोडी आणखी मोठी करावी असे त्याला सांगण्यात आले. त्यात आणखी जास्त संवाद टाकावे असेही त्याला सांगण्यात आले.

मग त्याने आणखी संवाद टाकून त्याने ती एक दीर्घ कादंबरी बनवली आणि पुन्हा पाठवली:

ती कथा थोडक्यात अशी होती –

"एका खेडेगावातला १५ वर्षांचा मुलगा त्याच्या वडिलांसह तालुक्याच्या गावी यात्रेत एका कार्यक्रमांचं तिकीट लकी ड्रॉ जिंकल्यामुळे जातो. तो कार्यक्रम बघून आणि यात्रेतला बाजार फिरून झाल्यानंतर मुलगा वडिलांचे लक्ष नसतांना त्याच्या धुंदीत एका स्टॉल वरच थांबतो. वडील सहज फेरफटका मारायला पुढे जाऊन परत येतात तर तो मुलगा तिथे नसतो. तो मुलगा यात्रेत घुसलेल्या एका स्मगलर्सच्या टोळीच्या तावडीत योगायोगाने सापडतो. त्यानंतर त्याचा एक चित्तथरारक प्रवास सुरु होतो - अचानक एका अशा जगाशी त्याची ओळख होते ज्या जगाचा त्याने आपल्या आयुष्यात कधी विचार सुद्धा केला नसता. मग आणखी एका योगायोगाच्या घटनेत त्याचेकडून टोळीतल्या एकाचा खून होतो आणि तो तेथून निसटतो. मग गुंड त्याचे मागे लागतात.. इकडे त्याचे वडील पोलिसांत तक्रार करतात. अनेक दिवस जाऊनही काहीच थांगपत्ता न लागल्याने ते स्वत:च जीव धोक्यात घालून मुलाला शोधायचे ठरवतात. तो सापडत नाही. नंतर दोन वर्षांनी एका विचित्र प्रसंगात त्यांची आपल्या मुलाशी भेट होते पण तो पार बदललेला असतो…."

संपादकांचे उत्तर आले - "आणखी संवाद टाकण्याची आमची विनंती मान्य करून कथेची सुधारित आवृत्ती पाठवल्याबद्दल धन्यवाद! आता मुख्य संपादकांच्या फायनल सिलेक्शनची फेरी होईल. त्यात तुमची कादंबरी सिलेक्ट झाली की मग दिवाळी अंक प्रकाशित होण्याच्या एक महिना आधी तुम्हाला निर्णय कळवला जाईल. कादंबरी सिलेक्ट होईलच याबद्दल खात्री बाळगा. साहित्य पाठवत राहावे ही विनंती!"

बरेच दिवस वाट बघितल्यावर कुठलाच पत्रव्यवहार न आल्याने त्याने एक दोनदा दिवाळी अंक कार्यालयाला एसटीडी बूथ वरून फोन केला. फोन सतत बिझी यायचा. चार महिन्यांनी दिवाळीच्या एक आठवडा आधी त्याने पेपर स्टॉल्सवर चौकशी केली तर त्याला कळले की तो अंक बाजारात आलाच नाही. अनेक पेपर स्टॉल आणि न्यूजपेपर व्हेंडर्सकडे तो जाऊन आला. त्याचे हस्तलिखित सुद्धा पोस्टाने परत आले नव्हते. त्याची झेरॉक्स सुद्धा त्याने काढली नव्हती. पुन्हा त्याच्या मेंदूत शाळेतली घड्याळाची घंटा वाजली. खारकाते सर त्याला अचानक आठवून गेले.

कथेचे काय झाले याचा छडा लावण्यासाठी तो तडक मित्रासोबत मुंबईला गेला. दादर पश्चिमला दिवाळी अंकाच्या कार्यालयाचा पत्ता शोधत शोधत तो आणि त्याचा मित्र विनीत भर दुपारी एक वाजता घामाने चिंब होत एका गल्लीत पोहोचले.

पत्त्यानुसार ते कार्यालय वरच्या मजल्यावर होते. लोखंडी गोल वळणाच्या पायऱ्या चढून ते वर गेले. तेथे छोटे ऑफिस होते - "येथे स्टँप पेपर मिळतील" असे लिहिलेले होते.

"इथे दिवाळी अंकाचे कार्यालय होते ना?"

"होय, पण ते दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी सोडले"

"काय? त्यांनी कार्यालय सोडले?"

"होय! माझे ऑफिस आधी खाली होते. मग त्यांनी सोडल्यावर आम्ही वर शिफ्ट झालो! वर भाडे कमी आहे!"

"बरं, ते ऑफिस कुठे शिफ्ट झाले ते कळू शकेल काय?"

"नाही बुवा. पण एक गोष्ट म्हणजे ऑफिस सोडताना त्यांनी घरमालकाशी खूप वाद घातला होता. पैसे पण दिले नाहीत शेवटच्या महिन्याच्या भाड्याचे!"

"काय?"

"होय! पण तुम्हाला कुणाला भेटायचं होतं का?"

"नाही. ठीक आहे. धन्यवाद! फक्त चौकशी करायची होती!"

राजेश आणि विनीत परत जायला निघाले आणि काहीतरी आठवून राजेश पुन्हा वर चढून आला आणि त्याने त्या माणसाला विचारले - "बरं, इथे असणारी माणसे दिसायला कशी होती? किती माणसे ऑफिसमध्ये काम करत होती?"

त्या माणसाला संशय आला, म्हणाला, "तुम्ही सीआयडीवाले आहात की "एक शून्य शून्य" ही पोलिसांवरची टीव्ही मालिका जास्ती बघता? नक्की काय समजू मी?"

विनीत म्हणाला, "नाही हो काका! आता काय सांगणार तुम्हाला!! याने एक कथा पाठवली होती छापायला! त्याबद्दल विचारायचे होते, बाकी काही नाही!"

"बरं! बरं! सांगतो! एकजण इथला मुख्य कर्मचारी होता - त्याचे नाव …..?? एक मिनिट! हां आठवले!! त्याचे नाव होते - रत्नाकर रोमदाडे! आणि त्याचा साथीदार ?? त्याला सगळे गोप्या म्हणायचे! आणि दिसायला रत्नाकर हा टक्कल पडलेला आणि वर्ण सावळा. थोडे पोट पुढे आलेले आणि उजव्या गालावर कसलातरी मोठा काळा डाग आहे. अगदी लक्षात येण्यासारखा काळा डाग!

"ओके अंकल! धन्यवाद!" राजेश म्हणाला.

"अंकल! आपण चहा नाश्टा करूया का? चला जाऊ!" विनीत त्या माणसाला म्हणाला.

"नको नको! आता बरीच कामं पडलीत. बोलावल्याबद्दल धन्यवाद!"

"ओके अंकल! बरंय येतो आम्ही!"

दादर स्टेशनवर त्यांनी दोन दोन वडापाव खाल्ले. मग वेस्टर्न लाईनला जाऊन दोघांनी मरीन लाईन्सला जायचे ठरवले.

5:35 ची स्लो लोकल पकडून ते मरीन लाईन्सला आले. थोडा समुद्राच्या कडेने फेरफटका मारून घडलेल्या गोष्टीवर विचार करून काही तोडगा किंवा उपाय करता येईल असे त्यांना वाटले.

"काय करू विनीत मी आता?"

"तू त्या स्टोरीची झेरॉक्स सुद्धा काढून ठेवली नाहीस?"

"हो रे! जरा चुकलंच माझं!"

राजेश मनात म्हणत होता, "चुकलं? एकदा नाही तर दोनदा चुकलं! एकदा अनुभव नव्हता म्हणून फसलो आता मात्र दुसऱ्या वेळेस एक पहिला वाईट अनुभव पाठीशी असतांना सुद्धा पुन्हा फसलो! खूप विश्वास ठेवला..."

"काय झालं? कसल्या विचारात गाढ बुडाला आहेस?"

"काही नाही! मी ती कादंबरी पुन्हा लिहून काढणार! मी हार मानणार नाही. माझी ती कादंबरी त्या नालायक संपादकाने इतर कुठे त्याच्या स्वत:च्या किंवा इतर कुणाच्या नावाखाली छापायला दिली आहे का ते बघावे लागेल!"

"मग त्यासाठी तुला दिवाळी अंकांची लायब्ररी लावावी लागेल. मी तुला शोधायला मदत करेन! मला तुझी कथा घरी गेल्यावर थोडक्यात सांग!"

"ठीक आहे. जर ती कुठे छापून आली नसेल तर मी दिवस रात्र मेहनत करून ती कथा पुन्हा कागदावर लिहून काढेन. पूर्वीसारखं जसंच्या तसं आठवणार नाही मला पण मी लिहेन! आणि पुन्हा पाठवेन दुसरीकडे!", राजेश निर्धाराने म्हणाला.

"आणि जर का ती इतर कुणाच्या नावाने या वर्षीच छापून आली असेल तर? तर मग काय करायचे आपण?", विनितची शंका बरोबर होती.

"ते मलाही माहीत नाही, पण आधी आपण जे ठरवलं आहे ते करूया!" राजेश म्हणाला.

तिकडे अरबी समुद्र अधून मधून खवळत होता आणि मोठमोठ्या लाटा दगडांवर आदळत होता. हे दोघे मरिन लाईन्स वर चालत होते.

"आणि समजा छापून आली तर? तू तुझी कथा पुन्हा लिहेपर्यंत ती दुसरीकडे छापली गेली तर?", विनितची ही शक्यताही नाकारता येत नव्हती.

"तर मग मी सांगेन की ही माझी कथा आहे!" राजेश आवेगाने म्हणाला आणि चालायचा थांबला.

"पण, छापलेली कथा पाहून पाहून कुणीही पुन्हा कागदावर लिहू शकतो आणि म्हणू शकतो की ही माझी कथा आहे! कोण विश्वास ठेवेल?", विनित म्हणाला तशी एक लाट जोराने दोघांच्या अंगावर आदळली. दोघेजण ओले झाले.

"तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे. पण मला काही सुचत नाही आहे! पण आपण एक करूया! तू येत्या काही दिवसातल्या पेपरमध्ये ‘कथमंथन’ दिवाळी अंकासदर्भात काही बातम्या येतात का त्या तपासत राहा आणि दिवाळी अंकांची लायब्ररी लावून माझ्या कथेसारखी कथा कुठे छापली गेलीय का ते तपासत राहा! तोपर्यंत मी युद्धपातळीवर माझी कादंबरी पुन्हा लिहायला सुरुवात करतो!"

पुढच्या क्षणी निर्धाराने ते दोघे ओल्या कपड्यांसह झपाझप चालत स्टेशन वर गेले आणि घरी जायला लोकल पकडली. लोकलच्या डब्याच्या खडाखड हलणाऱ्या काही रिकाम्या कड्या बघत तो विचार करत होता. त्या कड्यांचा आवाज सहन न होऊन त्याने हलणाऱ्या दोन कड्या मुठीत पकडल्या.

विक्रोळी स्टेशनवर गाडी थांबली. एवढया भयानक गर्दीत त्याची आई अचानक पाण्याचा ग्लास हातात घेऊन सहजपणे लोकलमध्ये शिरली आणि त्याला गदागदा हलवू लागली, "राजेश! अरे असा रात्रभर बसून छताकडे बघून काय विचार करतोयस? हे घे पाणी पी!" तो तंद्रीतून जागा झाला. आई लोकलमध्ये आली नसून आपली तंद्री भंग पावली हे त्याला कळले.

"बरा आहेस ना?"

"हो बरा आहे ! झोप तू!" पलंगावर बसलेला राजेश पाण्याचा ग्लास घेऊन म्हणाला.

(क्रमश:)

 

वलय (कादंबरी)

Nimish Navneet Sonar
Chapters
लेखकाचे मनोगत
सिद्धेश प्रभूगांवकर यांची प्रस्तावना
वलय - प्रकरण १
वलय - प्रकरण २
वलय - प्रकरण ३
वलय - प्रकरण ४
वलय - प्रकरण ५
वलय - प्रकरण ६
वलय - प्रकरण ७
वलय - प्रकरण ८
वलय - प्रकरण ९
वलय - प्रकरण १०
वलय - प्रकरण ११
वलय - प्रकरण १२
वलय - प्रकरण १३
वलय - प्रकरण १४
वलय - प्रकरण १५
वलय - प्रकरण १६
वलय - प्रकरण १७
वलय - प्रकरण १८
वलय - प्रकरण १९
वलय - प्रकरण २०
वलय - प्रकरण २१
वलय - प्रकरण २२/२३
वलय - प्रकरण २४
वलय - प्रकरण २५
वलय - प्रकरण २६
वलय - प्रकरण २७
वलय - प्रकरण २८
वलय - प्रकरण २९
वलय - प्रकरण ३०
वलय - प्रकरण ३१
वलय - प्रकरण ३२
वलय - प्रकरण ३३
वलय - प्रकरण ३४
वलय - प्रकरण ३५
वलय - प्रकरण ३६
वलय - प्रकरण ३७
वलय - प्रकरण ३८
वलय - प्रकरण ३९
वलय - प्रकरण ४०
वलय - प्रकरण ४१
वलय - प्रकरण ४२
वलय - प्रकरण ४३
वलय - प्रकरण ४४
वलय - प्रकरण ४५
वलय - प्रकरण ४६
वलय - प्रकरण ४७
वलय - प्रकरण ४८
वलय - प्रकरण ४९
वलय - प्रकरण ५०
वलय - प्रकरण ५१
वलय - प्रकरण शेवटचे (५२)
लेखकाची साहित्यिक ओळख